कोरोना लशींची खासगी हॉस्पिटलसाठी किंमत निश्चित, कोविशील्ड ७८० रुपये तर कोव्हॅक्सीन १,४१० रुपये

कोरोना लशींची किंमत निश्चित करत त्यासंदर्भातील अधिसूचना आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाने जाहीर केली आहे. केंद्र सरकारने खासगी हॉस्पिटलसाठी कोरोना लशींच्या डोसची किंमत निश्चित केली आहे.

corona vaccine price fixed
कोरोना लशींची किंमत केंद्राकडून निश्चित 

थोडं पण कामाचं

  • कोरोना लशीच्या किंमतीच्या मार्गदर्शक सूचना आरोग्य मंत्रालयाकडून जाहीर
  • कोविशील्ड ७८० रुपये तर कोव्हॅक्सीन १,४१० रुपये
  • प्रत्येक डोससाठी जास्तीत जास्त १५० रुपये सेवा शुल्क

नवी दिल्ली : कोरोना लशींची किंमत निश्चित करत त्यासंदर्भातील अधिसूचना आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाने (Ministry of Health and Family Welfare) जाहीर केली आहे. कोरोना लसीकरणातील (National COVID Vaccination Program) किंमतीबाबतचा (corona vaccine price) गोंधळ दूर करत केंद्र सरकारने खासगी हॉस्पिटलसाठी कोरोना लशींच्या डोसची किंमत निश्चित केली आहे. आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाने कोविशील्ड (Covishield), कोव्हॅक्सीन (Covaxin) आणि स्पुटनिक V (Sputnik V) या कोरोना लशींची खासगी हॉस्पिटलने आकारायची किंमत जाहीर केली आहे. अधिकृत कोरोना लसीसाठी प्रत्येक डोससाठी किती किंमत असणार, त्यावर सेवाशुल्क किती आकारले जाणार याबाबत स्पष्टीकरण देण्यात आले आहे. खासगी हॉस्पिटलमध्ये कोरोना लसीच्या प्रत्येक डोससाठी ५ टक्के जीएसटी आणि कमाल १५० रुपये सेवाशुल्क आकारण्यात येणार आहे. त्यातही कोविशील्डसाठी जीएसटी शुल्क ३० रुपये, कोव्हॅक्सीनसाठी ६० रुपये आणि स्पुटनिक Vसाठी ४७ रुपये निश्चित करण्यात आले आहे. (Maximum price per dose of the authorized vaccines declared by health ministry)

कुटुंबकल्याण मंत्रालयाच्या अधिसूचनेत लसची किंमत आणि सेवा शुल्क जाहीर

कोरोना लस उत्पादक कंपनी लशीच्या डोसची किंमत बदलण्यापूर्वी ते जाहीर करणार आहे आणि किंमतीतील तो बदल आधीच नागरिकांना सूचित करण्यात येणार आहे. खासगी हॉस्पिटल प्रत्येक डोससाठी जास्तीत जास्त १५० रुपये सेवा शुल्क आकारू शकतील. राज्य सरकारांनी कोरोना लसींच्या किंमतीवर देखरेख करायची आहे, असे आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाच्या अधिसूचनेत म्हटले आहे. विविध कंपन्यांच्या लसीच्या एका डोसची किंमत पुढीलप्रमाणे असणार आहे,

  1. कोविशील्ड - ७८० रुपये
  2. कोव्हॅक्सीन - १,४१० रुपये
  3. स्पुटनिक V - १,१४५ रुपये

लसीकरणाच्या देखरेखेची जबाबदारी केंद्रशासित प्रदेश आणि राज्य सरकारांची

कोविन वेबसाईटवर लसीकरण केंद्र कमाल शुल्कापेक्षा जास्त किंमत वसूल करत नाहीत ना याची माहिती मिळणार आहे. कोरोना लशीसाठीची किंमत सरकारने औषध निर्मिती कंपन्यांनी प्रति डोस जाहीर केलेल्या उत्पादन खर्चाच्या आधारावर निश्चित केली आहे. भविष्यात औषध निर्मिती कंपन्यांनी त्यांच्या किंमतींमध्ये बदल केल्यास कोरोना लशीच्या किंमतीत त्यानुसार बदल केला जाईल, असे सरकारने स्पष्ट केले आहे. केंद्रशासित प्रदेश आणि राज्य सरकारांनी खासगी हॉस्पिटलमध्ये दिल्या जाणाऱ्या कोरोना लसींच्या किंमतीवर देखरेख करायची आहे.

प्राधान्यक्रम केंद्रशासित प्रदेश आणि राज्य सरकारांनी ठरवावा

१८ वर्षांवरील नागरिकांना कोरोना लस देताना राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेश यांनी कोरोना लसीकरण कार्यक्रमाचा प्राधान्यक्रम ठरवायचा आहे. नवीन नॅशनल कोविड व्हॅक्सीनेशन कार्यक्रमाच्या मार्गदर्शक सूचना २१ जूनपासून लागू होणार आहेत. राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेश यांनी कोरोना लसीची नासाडी टाळावी, जेणेकरून लशीच्या पुरवठ्यावर त्याचा परिणाम होणार नाही, अशी सूचनाही केंद्र सरकारने केली आहे.

देशात सर्वांना मोफत लस

कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना लसीकरणाबाबत मोठी घोषणा केली होती. देशातील १८ वर्षांवरील सर्व नागरिकांचे मोफत लसीकरण केले जाणार असून केंद्र सरकारने याआधी राज्य सरकारांना दिलेली जबाबदारी आपल्याकडे घेतली आहे, असेही मोदींनी स्पष्ट केले होते. त्यामुळे देशातील कोरोना लसीकरण कार्यक्रमासंदर्भात सुरू असलेल्या गोंधळावर एकदाचा पडदा पडणार असे दिसते आहे. एकूण लशींपैकी ७५ टक्के लशी भारत सरकार विकत घेऊन त्या नागरिकांना मोफत देणार आहे. यापुढे लसीकरणासाठी राज्य सरकारांना पैसे खर्च करण्याची वेळ येणार नाही, असे पंतप्रधान मोदींनी सांगितले होते. तर खासगी हॉस्पिटल ठरवलेल्या रकमेपेक्षा जास्त नफा कमावू शकणार नाहीत. देशातील एकूण लसीकरणातील २५ टक्के लसीकरण खासगी हॉस्पिटलमार्फत केले जाणार असल्याचेही मोदींनी सांगितले होते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी