चीनच्या वरिष्ठ अधिकाऱ्याची अमेरिकेशी हातमिळवणी, दिली वुहान लॅबची गुप्त माहिती, गुप्तहेर संस्थांचा मोठा खुलासा

अमेरिका कोरोना व्हायरसच्या उगमाच्या शोधात आहेत. कोरोना व्हायरससंदर्भात एक गुप्त अहवाल समोर आला आहे आणि या अहवालात म्हटले आहे की चीनच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने वुहान लॅबसंदर्भातील गुप्त माहिती अमेरिकेला दिली

Wuhan Lab secret
वुहान लॅबचे सिक्रेट 

थोडं पण कामाचं

  • वुहान हाच कोरोनाच्या तपासाचा केंद्रबिंदू
  • कोरोना नैसर्गिक कि मानवनिर्मित
  • कोरोना महामारीच्या लाटा

वॉशिंग्टन : कोरोना विषाणू अखेर आला कुठून ? याचा उगम आहे तरी कुठे? हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे आणि यासंदर्भात तपास करून ९० दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (US President Joe Biden) यांनी दिले आहेत. अमेरिका कोरोना व्हायरसच्या (Corona virus) उगमाच्या शोधात आहेत. दरम्यान कोरोना व्हायरससंदर्भात एक गुप्त अहवाल समोर आला आहे आणि या अहवालात म्हटले आहे की चीनच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने वुहान लॅबसंदर्भातील गुप्त माहिती अमेरिकेला (USA) दिली आहे. या गुप्त अहवालात म्हटले आहे की चीनचे (China) उपराज्य सुरक्षामंत्री डोंग जिंग्ववेई (Dong Jingwei) अमेरिकेत निघून गेले आहेत आणि त्यांनी अमेरिकेला वुहान इन्स्टिट्युट ऑफ व्हायरोलॉजीशी (Wuhan Institute of Virology) संबंधित गुप्त माहिती दिली आहे. (Senior Chinese Officer runs away in USA, gives secret information of Corona virus)

वुहान हाच कोरोनाच्या तपासाचा केंद्रबिंदू

वुहान इन्स्टिट्युट ऑफ व्हायरोलॉजीशी (Wuhan Institute of Virology)हाच कोरोनाच्या उगमाच्या तपासाचा केंद्रबिंदू आहे. अनेक अहवालांमध्ये दावा करण्यात आला आहे की चीनमधील वुहान लॅबमधून कोरोनाचा विषाणू लीक झाला आहे. स्पाईटॉकच्या एका अहवालानुसार चीन विरोधी मीडिया डोंग आपल्या मुलीबरोबर हॉंगकॉंगमार्गे अमेरिकेत पळून गेल्याच्या माहितीने भरलेले आहेत. स्पाईटॉक हा एक संरक्षण, हेरगिरी आणि परराष्ट्र धोरणासंदर्भातील एक अमेरिकन मीडिया आहे. डोंग यांनी अमेरिकेला वुहानबद्दल गुप्त माहिती दिल्यामुळेच अमेरिकेचा या प्रकरणातील दृष्टीकोन बदलल्याचे म्हटले जाते आहे.

कोरोना नैसर्गिक कि मानवनिर्मित

स्पायटॉकच्या माहितीनुसार जर ही अफवा खरी असेल तर हे चीनच्या इतिहासातील गुप्तहेर खात्याचे सर्वात मोठे अपयश असेल. डोंग हे चीन सरकारच्या संरक्षण मंत्रालयात अनेक वर्षे अधिकारी होते. त्यांना चीनमध्ये गुओनबु या नावानेदेखील ओळखले जाते. जो बायडन यांनी अमेरिकन हेरखात्याला ९० दिवसांत तपास करून अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. कोरोना व्हायरसचा उगम नेमका कुठे आणि कसा झाला यासंदर्भात हा अहवाल सादर करायचा आहे. हा व्हायरस एखाद्या प्राणी किंवा पक्षाकडून संक्रमित झाला आहे की एका लॅबमधून लीक झाला आहे आणि त्यातून या भयानक महामारीचा जन्म झाला आहे, याचा रहस्यभेद या अहवालातून अपेक्षित आहे. अमेरिकन सरकारने राष्ट्रीय प्रयोगशाळेला तपास करणाऱ्या टीमला सहकार्य करण्याच्याही सूचना दिल्या आहेत. त्याचबरोबर अमेरिकेने चीनला आंतरराष्ट्रीय तपास कार्यात सहकार्य करण्याचीही अपील केली आहे.

कोरोना महामारीच्या लाटा

कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेनंतर आता तिसरी लाट येण्याचाही अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. त्याशिवाय तिसरी लाट ही दुसऱ्या लाटेपेक्षाही भयानक असेल अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने भारतात अभूतपूर्व संकट निर्माण केले होते. मागील काही दिवसात कोरोना संसर्ग कमी होण्यास सुरूवात झाली असली तरी अजूनही देशभरात कोरोना संक्रमितांची संख्या लक्षणीय आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरण्यास सुरूवात झाल्यानंतर देशातील अनेक भागात लॉकडाऊन काढून उद्योगधंदे पूर्ववत करण्यास सुरूवात झाली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी