Good News: 'या' महिन्यापर्यंत भारतातील कोरोना आटोक्यात येणार, सरकार नियुक्त समितीचा दावा 

Covid19 control in India by February 2021: भारतातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना आता एक चांगली बातमी समोर आली आहे. सरकारने नियुक्त केलेल्या समितीने फेब्रुवारी २०२१ मध्ये कोरोना आटोक्यात येणार

corona_update
प्रातिनिधीक फोटो  |  फोटो सौजन्य: PTI

थोडं पण कामाचं

  • गेल्या तीन आठवड्यांत भारतातील कोरोना संसर्गाचे प्रमाण झालेय कमी
  • कोविड-१९ संदर्भात स्थापन केलेल्या तज्ञांच्या समितीनुसार भारतातील कोरोना फेब्रुवारीमध्ये आटोक्यात येण्याची शक्यता
  • हिवाळ्यात संसर्ग वाढू शकतात हे देखील समितीने नाकारले नाहीये

Coronavirus updates: भारतातील कोरोना (Corona) संसर्गाच्या दैनंदिन आकडेवारी आता घट होताना दिसत आहे. पण कोरोनापासून मुक्ती कधी होणार असा प्रश्न नागरिकांच्या मनात उपस्थित होत आहे. कोरोनावर लस कधी उपलब्ध होणार याबाबतही नागरिकांत उत्सुकता आहे. पण आता एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समितीनुसार पुढील वर्षाच्या सुरुवातीच्या महिन्यांत कोरोना नियंत्रणात येईल अशी अपेक्षा आहे.

कोरोना विषाणू संसर्गाविरुद्ध लढण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांच्या संदर्भात केंद्र सरकारने वैज्ञानिकांची एक समिती स्थापन केली आहे. या समितीने सांगितले की, फेब्रुवारी २०२१ पर्यंत कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात (Covid19 control in India by February 2021) येण्याची शक्यता आहे. समितीने कम्प्यूटर मॉडल्सच्या आधारावर हा अंदाज वर्तवला आहे आणि म्हटले आहे की, भारतात १.६ कोटींहून अधिक कोरोना बाधितांची संख्या होणार नाही. पण, या समितीने कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेची शक्यताही नाकारलेली नाहीये. तसेच हा संसर्ग टाळण्यासाठी आवश्यक आणि संरक्षणात्मक उपाय योजना सुरुच ठेवल्या पाहिजेत असे सांगितले.

लॉकडाऊनमुळे परिस्थिती नियंत्रणात 

सध्या देशभरात कोरोना बाधितांची एकूण संख्या ७४ लाखांहून अधिक आहे. यापैकी ६५,९७,२०९ रुग्णांनी कोरोनावर मात (१८ ऑक्टोबर २०२०) केली आहे. तर अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ७,८३,३११ रुग्णांवर (१८ ऑक्टोबर २०२०) उपचार सुरू आहेत. भारतात मार्च महिन्यात जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे कोरोना नियंत्रणात ठेवण्यात मदत झाली. जर हा लॉकडाऊन लागू केला नसता तर यावर्षी ऑगस्ट महिन्यापर्यंत कोरोना विषाणूच्या संसर्गाने मृत्यू पावलेल्यांची संख्या २५ लाखांहून अधिक झाली असती. समितीच्या मते, देशव्यापी लॉकडाऊन यापुढे आवश्यक नाहीये आणि केवळ आवश्यकता असेल तेथेच मर्यादित आणि प्रभावित क्षेत्रातच आणण्याची आवश्यकता आहे.

या समितीची स्थापना निती आयोगाचे सदस्य व्ही. पॉल आणि सरकारचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार के. विजयराघवन यांच्या अध्यक्षतेखाली मार्च महिन्यात करण्यात आली होती. आयआयटी आणि इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे तज्ञही या समितीत आहेत. कोरोना विषाणू संसर्गापासून मुक्त होण्यासाठी लस आणि वितरण याबाबत विचारले असता समितीचे अध्यक्ष पॉल म्हणाले, भारतात कोल्ड स्टोअरेजची संख्या मोठी आहे आणि ही संख्या गरज पडल्यास वाढता येऊ शकते. 

भारतातील कोरोनाची स्थिती 

  1. भारतात अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत होतेय घट 
  2. देशातील २२ राज्य/केंद्रशासित प्रदेशांमध्ये अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २०,००० पेक्षा कमी 
  3. भारतातील १ राज्य/केंद्रशासित प्रदेशातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २०,००० हून अधिक पण ५०,००० पेक्षा कमी आहे 
  4. भारतील तीन राज्य/केंद्रशासित प्रदेशात ५०,००० हून अधिक अॅक्टिव्ह रुग्ण आहेत 
  5. देशातील रिकव्हरी रेट म्हणजेच रुग्ण बरे होण्याचा दर सातत्याने वाढत आहे 
  6. महाराष्ट्रातही रुग्ण बरे होण्याचा दर वाढत आहे 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी