मुंबईः जगभरात हैदोस घातलेल्या कोरोनाने भारतात शिरकाव केला आहे. कोरोना व्हायरस जगातील 100 देशांमध्ये फोफावला आहे. या व्हायरसमुळे आतापर्यंत जगभरात चार हजारांहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्याच दरम्यान कॅनडाचे पंतप्रधानांच्या पत्नीला कोरोनाची लागण झाली आहे. चीन कोरोनाशी सामोरे जाण्याचा दावा करत असताना, इटली आणि जर्मनी युरोपमध्ये जास्त प्रभावित झाले आहेत. त्याबरोबर इराणमध्येही ही बाब गंभीर आहे.
आता जगभरामध्ये फैलाव झालेल्या करोनामुळे काही देशांमधील प्रमुख व्यक्तींचाही समावेश आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांची पत्नी सोफी यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून सोफी यांना सर्दी, ताप आणि खोकल्याचा त्रास होत होता. याच पार्श्वभूमीवर त्यांची कोरोनाची चाचणी करण्यात आली. या चाचणीचे निकाल नुकतेच हाती आले असून सोफी यांना कोरोना झाल्याचं स्पष्ट झालं आहे. यासंदर्भातील माहिती कॅनडाच्या पंतप्रधान कार्यालयानेच दिली आहे.
सोफी यांना कोरोनाची लागण झाली असली तरी जस्टिन ट्रुडो यांच्यामध्ये कोरोनाची कोणतीच लक्षणे दिसून येत नसल्याचंही पंतप्रधान कार्यालयानं स्पष्ट केलं आहे. सध्या सोफी यांना कोरोना झाल्यानंतर ट्रुडो कुंटुंबाला इतरांपासून वेगळं ठेवण्यात आलं आहे. त्यांच्यावर डॉक्टरांची 24 तास नजर असणार आहे.
तर ट्रुडो पुढचे 14 घरातून काम करणार असल्याची माहितीही समोर आली आहे. ट्रुडो शुक्रवारी आणि शनिवारी काही अधिकाऱ्यांना भेटणार होते. मात्र ट्रुडो यांनी आपल्या सर्व बैठक रद्द केल्या आहेत. संबंधित अधिकाऱ्यांशी ते फोनवरुनच चर्चा करणार असल्याचे पंतप्रधान कार्यालयानं स्पष्ट केलं आहे.
जगभरात कोरोनाचे 1 लाख 26 हजारांपेक्षा जास्त रुग्ण आहेत. त्यापैकी 4 हजार 633 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 68 हजार 286 जण यातून बरे झाले आहेत. या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोरोना व्हायरसने जगात महामारी म्हणून घोषित केलं आहे.