Countdown begins, IAC Vikrant to be commissioned by PM Modi in Indian Navy on Friday, a glimpse of India's first indigenous aircraft carrier : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या म्हणजेच शुक्रवार २ सप्टेंबर २०२२ रोजी पहिली भारतीय बनावटीची विमानवाहक नौका IAC विक्रांत (Indigenous Aircraft Carrier Vikrant) नौदलाला सुपूर्द करतील. IAC विक्रांत सेवेत दाखल होताच नौदलाच्या क्षमतेत मोठी वाढ होईल. विक्रांत नौदलाच्या सेवेत दाखल करण्याचा कार्यक्रम कोच्ची (कोचीन) येथील बंदरात पार पडेल. IAC विक्रांत नौकेला कोच्ची येथील कोचीन शिपयार्ड लिमिटेडमध्ये पंतप्रधान कमिशन करतील.
भारताची संरक्षण क्षेत्रातील निर्यात १३ हजार कोटींच्या घरात
भारतीय बनावटीची विमानवाहक नौका नौदलाच्या सेवेत दाखल होणे ही देशासाठी मोठी बाब आहे. हे आत्मनिर्भर भारत करण्याच्या स्वप्नाकडे टाकलेले आणखी महत्त्वाचे पाऊल आहे. याच कारणामुळे IAC विक्रांत ही देशाचा गौरव आहे. भारतीय नौदलाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्वीट करून ही माहिती देण्यात आली. तसेच एक व्हिडीओ ट्वीट करून नौदलाने IAC विक्रांतची झलक दाखविली आहे.
भारतीय नौदलाच्या सेवेतील INS विक्रांत या विमानवाहक नौकेने पाकिस्तान विरुद्ध १९७१च्या युद्धात महत्त्वाची भूमिका बजावली होती. आता IAC विक्रांत नौदलात कमिशन झाल्यानंतर INS विक्रांत हे नाव धारण करेल. विक्रांत या विमानवाहक नौकेवर एकावेळी १६०० नौसैनिक कार्यरत असतील. ३० लढाऊ विमानं आणि हेलिकॉप्टर यांचा ताफा या विमानवाहक नौकेवर सज्ज ठेवला जाईल. INS विक्रांत सेवेत आल्यामुळे भारतीय नौदलाकडे कार्यरत असलेल्या विमानवाहक नौकांची संख्या दोन होणार आहे. भारताच्या समुद्रातील सीमा बंगालचा उपसागर, हिंद महासागर आणि अरबी समुद्र या तीन समुद्रांशी जोडलेल्या आहेत. यामुळे मोठ्या युद्धासाठी किमान दोन आणि कमाल तीन विमानवाहक नौका भारताकडे असाव्या अशा स्वरुपाची सूचना अनेक संरक्षणतज्ज्ञांनी केली आहे. आता भारताकडे विक्रमादित्य आणि विक्रांत या दोन विमानवाहक नौका उपलब्ध असतील. यामुळे देशाच्या नौदलाच्या क्षमतेत वाढ होईल, असे तज्ज्ञांचे मत आहे.