नवी दिल्ली: भारतात आतापर्यंत १ कोटी २८ लाख १ हजार ७८५ जणांना कोरोना या संसर्गजन्य आजाराची बाधा झाली. यापैकी १ लाख ६६ हजार २०८ जणांचा मृत्यू झाला तर १ कोटी १७ लाख ९२ हजार १३५ जण कोरोनामुक्त झाले. सध्या देशात ८ लाख ४३ हजार ४४२ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. वाढत्या कोरोना संकटामुळे महाराष्ट्र आणि दिल्लीसह देशातील अनेक राज्यांमध्ये कठोर निर्बंध अथवा मर्यादीत काळासाठी लॉकडाऊन लागू झाले आहे. जाणून घेऊ कोणत्या राज्यात काय स्थिती आहे. COVID19 effect, lockdown and night curfew imposed in many cities of the india
महाराष्ट्रात दर आठवड्याच्या शुक्रवारी रात्री आठ वाजल्यापासून सोमवारच्या सकाळी सात वाजेपर्यंत वीकेंड लॉकडाऊन आहे. या वीकेंड लॉकडाऊनची सुरुवात शुक्रवार ९ एप्रिल पासून होणार आहे. वीकेंड लॉकडाऊन पुढील निर्णय होईपर्यंत अथवा ३० एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे. तसेच सकाळी सात ते रात्री आठ जमावबंदी म्हणजे पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई आहे. रात्री आठ ते सकाळी सात कोणत्याही व्यक्तीस योग्य कारणाशिवाय बाहेर पडता येणार नाही, संचारबंदी असेल. किराणा, औषधे, भाजीपाला आदी जीवनावश्यक व आवश्यक वस्तू सोडून इतर सर्व प्रकारची दुकाने, मॉल्स, बाजारपेठा, ३० एप्रिलपर्यंत बंद. शेतीशी संबंधित कामं आणि व्यवसाय सुरू आहेत. बागा, चौपाट्या, समुद्र किनारे बंद करण्यात आले आहेत. रिक्षात चालक आणि दोन प्रवासी तसेच टॅक्सीत चालक आणि दोन प्रवासी, इतर वाहनात क्षमतेच्या ५० टक्के प्रवासी, बसमध्ये उभ्याने प्रवासाला मनाई आहे. मनोरंजन व करमणुकीची स्थळे बंद आहेत. चित्रपटगृहे, मल्टिप्लेक्स, नाट्यगृहे, व्हिडीओ पार्लर्स, क्लब्स, जलतरण तलाव, क्रीडा संकुले, सभागृहे, वॉटर पार्क्स, जिम बंद आहेत. प्रार्थनास्थळे बंद आहेत. उपाहारगृहे व बार बंद आहेत.
दिल्लीत दररोज रात्री दहा ते दुसऱ्या दिवशी पहाटे पाच पर्यंत संचारबंदी आहे. अत्यावश्यक सेवांना यातून वगळले आहे. लग्न, अंत्यसंस्कार अशा स्वरुपाच्या कार्यक्रमांकरिता कोविड प्रोटोकॉल जाहीर झाला आहे.
पंजाबमध्ये ३० एप्रिलपर्यंत दररोज रात्री नऊ ते दुसऱ्या दिवशी पहाटे पाच पर्यंत संचारबंदी आहे. अत्यावश्यक सेवांना यातून वगळले आहे. राजकीय सभा, संमेलन, मोर्चा, आंदोलन यावर बंदी आहे.
कोरोना संकटामुळे मध्य प्रदेशच्या शाजापूरमध्ये सात एप्रिल रोजी रात्री आठ वाजल्यापासून १० एप्रिल रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत लॉकडाऊन आहे. भोपाळ, इंदूर, जबलपूरसह राज्यातील १३ शहरांमध्ये शनिवार आणि रविवार या दोन्ही दिवशी वीकेंड लॉकडाऊनची चिन्ह आहेत. राज्य सरकारने स्थानिक जिल्हा प्रशासन आणि पालिका प्रशासनाला यासंदर्भातल्या निर्णयांचे अधिकार दिले आहेत. सध्या भोपाळ, इंदूर, जबलपूर, ग्वाल्हेर, उज्जैन, विदिशा, छिंदवाडा, नरसिंहपूर, बडवानी, बैतूल, खरगोन, मुरैना आणि रतलाममध्ये रविवारी लॉकडाऊन आहे.
गुजरातच्या २० शहरांमध्ये रात्रीची संचारबंदी लागू आहे. रात्री आठ ते सकाळी सहा या वेळेत संचारबंदी असेल. विवाह सोहळा, अंत्यसंस्कार अशा कार्यक्रमांसाठी कोविड प्रोटोकॉल जाहीर झाला आहे. लग्नात १०० जणांनाच उपस्थित राहता येईल. मोठे समारंभ ३० एप्रिलपर्यंत बंद आहेत. जी सरकारी कार्यालये बंद ठेवणे शक्य आहे त्यांना ३० एप्रिलपर्यंत शनिवार आणि रविवार या दोन्ही दिवशी बंद ठेवण्याचा निर्णय झाला आहे.
झारखंडमध्ये अंशतः लॉकडाऊन जाहीर झाले आहे. सर्व सरकारी, अनुदानीत आणि विना अनुदानीत तसेच खासगी शिक्षण संस्था बंद करण्यात आल्या आहेत. बागा, व्यायामशाळा, क्रीडा संकुल, सिनेमागृह बंद आहेत.
जम्मू काश्मीरमध्ये सर्व शाळा, कॉलेज बंद आहेत. डॉक्टर आणि मेडिकल स्टाफच्या सुट्या रद्द झाल्या आहेत.
छत्तीसगडच्या दुर्ग, राजनांदगाव अशा निवडक ठिकाणी लॉकडाऊन सुरू आहे. रायपूरमध्ये दहा दिवसांचे लॉकडाऊन आहे. रायपूर जिल्हा नऊ एप्रिलच्या संध्याकाळी सहा वाजल्यापासून १९ एप्रिलच्या सकाळी सहापर्यंत कंटेनमेंट झोन होणार आहे. जिल्ह्याच्या सर्व सीमा बंद केल्या जातील.
उत्तर प्रदेशमध्ये सर्व शाळा, कॉलेज बंद आहेत. लवकरच राज्यात रात्रीच्या संचारबंदीची घोषणा होण्याची शक्यता आहे.
बिहारमध्ये ११ एप्रिलपर्यंत सर्व शिक्षणसंस्था बंद आहेत.
दक्षिण भारतातील राज्यांमध्ये कोरोना संकट वाढत आहे. पण निवडणुकांवर सर्व पक्षांनी लक्ष केंद्रीत केले आहे. यामुळे अद्याप लॉकडाऊन जाहीर झालेले नाही.