नवी दिल्ली: केरळ आणि महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रत्येकाला कोरोना चाचणीचे बंधन इतर राज्यांनी घातले आहे. कोरोना निगेटिव्ह असल्याचा मेडिकल रिपोर्ट असेल तरच राज्यात प्रवेश मिळेल, अशी कठोर भूमिका इतर राज्यांनी घेतली आहे. कोरोना पसरू नये यासाठी ही खबरदारी घेतली जात आहे. केरळ आणि महाराष्ट्राच्या शेजारी राज्यांनी आपापल्या राज्यांमध्ये रस्त्यांवरचे तपासणी नाके, रेल्वे स्टेशन, विमानतळ या ठिकाणी विशेष व्यवस्था केली आहे. जे नागरिक केरळ अथवा महाराष्ट्रातून येत आहेत त्यांचे ताजे कोरोना चाचणीचे रिपोर्ट तपासले जात आहेत. रिपोर्ट निगेटिव्ह असला तरी थर्मल स्कॅनिंग करुन नंतर राज्यात प्रवेश दिला जात आहे. (all states screen people entering from Maharashtra and Kerala)
देशात सर्वाधिक कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण केरळ आणि महाराष्ट्र या दोन राज्यांमध्ये आहेत. भारतात १ लाख ४७ हजार ३०६ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यापैकी एक लाखांपेक्षा जास्त रुग्ण केरळ आणि महाराष्ट्र या दोन राज्यांमध्ये आहेत. यामुळे देशातील इतर राज्यांनी खबरदारीचे उपाय सुरू केले आहेत.
कर्नाटकने खबरदारीचे उपाय करण्यात आणखी एक पाऊल पुढे ढाकले. केरळ आणि महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रत्येकाची आरटी-पीसीआर चाचणी करण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला आहे. ताजे कोरोना चाचणीचे रिपोर्ट निगेटिव्ह असले तरीही आरटी-पीसीआर चाचणी नंतरच राज्यात प्रवेश देण्याबाबतचा निर्णय घेऊ, अशी कठोर भूमिका कर्नाटक सरकारने घेतली आहे.
सध्या भारतात सर्वाधिक कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण केरळ, महाराष्ट्र आणि कर्नाटक या तीन राज्यांमध्ये आहेत. यापैकी केरळ आणि महाराष्ट्रात ५० हजारांपेक्षा जास्त कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर कर्नाटकमध्ये दहा हजारांपेक्षा कमी कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. याच कारणामुळे राज्यातले कोरोना संकट वाढू नये म्हणून कर्नाटक सरकारने कठोर उपाय सुरू केले आहेत.
भारतात १६ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लस देण्याची मोहीम सुरू आहे. या मोहिमेत सोमवार, २२ फेब्रुवारी २०२१ रोजी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत १ कोटी १४ लाख २४ हजार ९४ नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. लस घेतलेल्यांमध्ये ७५ लाख ४० हजार ६०२ जण आरोग्य सेवेशी संबंधित आहेत. तसेच ३८ लाख ८३ हजार ४९२ फ्रंटलाइन वर्करना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली.
आरोग्य सेवेशी संबंधित ७५ लाख ४० हजार ६०२ जणांपैकी ६४ लाख २५ हजार ६० जणांना कोरोना प्रतिबंधक लसचा पहिला डोस देण्यात आला. तर आरोग्य सेवेशी संबंधित ११ लाख १५ हजार ५४२ जणांना कोरोना प्रतिबंधक लसचे दोन्ही डोस देऊन झाले. देशातील ३८ लाख ८३ हजार ४९२ फ्रंटलाइन वर्करना कोरोना प्रतिबंधक लसचा पहिला डोस देण्यात आला.
भारतात सध्या कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध आहेत. यातील कोणत्याही एका लसचा पहिला डोस दिल्यानंतर दुसरा डोस २८ दिवसांनी द्यावा लागतो. लसचे दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तीच्या शरीरात दुसरा डोस घेतल्यापासून एक ते दोन आठवड्यात कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी पुरेशी रोगप्रतिकारक क्षमता विकसित होते. काही व्यक्तींच्या बाबतीत रोगप्रतिकारक क्षमता विकसित होण्याचा कालावधी दुसरा डोस घेतल्यानंतर दोन आठवडयांपेक्षा थोडा जास्त असू शकतो. प्रत्येक व्यक्तीच्या प्रकृतीनुसार हा फरक पडू शकतो. याच कारणामुळे लसचा पहिला डोस घेतला किंवा दोन्ही डोस घेतले म्हणून कोविड प्रोटोकॉलचे उल्लंघन करत विना मास्क सार्वजनिक ठिकाणी फिरणे, सोशल डिस्टंस न राखणे असा हलगर्जीपणा करणे हिताचे नाही.
कोरोना विषाणूचे वेगवेगळे अवतार जगभर सक्रीय आहेत. यापैकी काही अवतारांवर भारतीय लस प्रभावी ठरल्या आहेत. पण आपल्या आसपास कोरोना विषाणूचा नक्की कोणता अवतार सक्रीय आहे हे सामान्य व्यक्ती ओळखू शकत नाही. याच कारणामुळे लस घेतली तरीही कोविड प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन केंद्रीय आरोग्य मंत्रालायाकडून नागरिकांना करण्यात आले आहे.
ताज्या आकडेवारीनुसार भारतात आतापर्यंत १ कोटी १० लाख १६ हजार ४३४ जणांना कोरोनाची बाधा झाली. यापैकी १ कोटी ७ लाख १२ हजार ६६५ जण कोरोनामुक्त झाले. कोरोनामुळे देशात १ लाख ५६ हजार ४६३ मृत्यू झाले. भारतात सध्या १ लाख ४७ हजार ३०६ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण केरळ, महाराष्ट्र आणि कर्नाटक या तीन राज्यांमध्ये आहेत. यापैकी केरळ आणि महाराष्ट्रात ५० हजारांपेक्षा जास्त कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर कर्नाटकमध्ये दहा हजारांपेक्षा कमी कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.