कोविशिल्ड लस अडचणीत, स्वयंसेवकाचा गंभीर साईड इफेक्टचा आरोप

पुण्याच्या सीरम इन्स्टिट्युटची कोविशिल्ड लस अडचणीत सापडली आहे. एका स्वयंसेवकाने कोविशिल्ड ही लस टोचून घेतल्यानंतर गंभीर स्वरुपाचा त्रास झाल्याची तक्रार केली.

covid19-vaccine-covishield-vaccine-trial-participant-alleges-neuro-breakdown-impaired
कोविशिल्ड लस अडचणीत, स्वयंसेवकाचा गंभीर साईड इफेक्टचा आरोप 

थोडं पण कामाचं

  • कोविशिल्ड लस अडचणीत, स्वयंसेवकाचा गंभीर साईड इफेक्टचा आरोप
  • स्वयंसेवकाने केली न्यूरॉलॉजिकल ब्रेकडाऊन आणि कॉग्निटिव फंक्शंस बिघडल्याची तक्रार
  • लस निर्मात्यांकडे स्वयंसेवकाने मागितली ५ कोटींची भरपाई

नवी दिल्ली: पुण्याच्या सीरम इन्स्टिट्युटची कोविशिल्ड लस अडचणीत सापडली आहे. एका स्वयंसेवकाने कोविशिल्ड ही लस टोचून घेतल्यानंतर गंभीर स्वरुपाचा त्रास झाल्याची तक्रार केली. लशीमुळेच साईड इफेक्ट झाले, असा स्वयंसेवकाचा आरोप आहे. तामीळनाडूतील या ४० वर्षांच्या स्वयंसेवकाने न्यूरॉलॉजिकल ब्रेकडाऊन आणि कॉग्निटिव फंक्शंस बिघडल्याची तक्रार केली. या प्रकरणी तपास सुरू आहे. स्वयंसेवकाने भरपाई म्हणून लस निर्मात्यांकडून पाच कोटी रुपयांची भरपाई मागितली आहे तसेच ही कोविशिल्ड बाजारात आणण्यास विरोध दर्शवला आहे. (covid19-vaccine-covishield-vaccine-trial-participant-alleges-neuro-breakdown-impaired)

पुण्याची सीरम इन्स्टिट्युट (Serum Institute of India - SII), अॅस्ट्राझेनेका (AstraZeneca) आणि ऑक्सफर्ड विद्यापीठ संयुक्तपणे कोविशिल्ड (Covishield) ही कोरोनावर मात करणारी लस विकसित करत आहेत. या लशींच्या भारतातील चाचण्यांसाठी मर्यादीत प्रमाणात आयसीएमआर (Indian Council of Medical Research - ICMR) तसेच भारतातील वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत संस्था सहकार्य करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी संध्याकाळी पुण्यात सीरम इन्स्टिट्युटला भेट देऊन कोविशिल्डच्या संशोधनाचा आढावा घेतला. यानंतर सीरमच्यावतीने सीईओ अदर पुनावाला यांनी पत्रकार परिषद घेतली. लस विकसित झाल्यावर भारतात सर्वात आधी वितरण करणार असल्याचे ते म्हणाले होते. लस साठवणूक आणि कोल्ड स्टोरेजची पुरेशी व्यवस्था आहे. प्रत्येक महिन्याला ५ ते ६ कोटी डोसची निर्मिती सुरू आहे आणि जुलै २०२१ प्रर्यंत ३० ते ४० कोटी डोस उपलब्ध करणार अशी माहिती पुनावाला यांनी दिली होती. लवकरच लस बाजारात येईल, असे संकेत त्यांनी दिले होते. यानंतर २४ तासांच्या आत तामीळनाडूतील एका स्वयंसेवकाने कोविशिल्डमुळे गंभीर साईड इफेक्ट झाले, असा आरोप केला आहे.

कॉग्निटिव फंक्शंस बिघडल्यास विस्मरण, नवी गोष्ट समजून घेण्यात अडचणी येणे, उगाचच अस्वस्थ वाटणे, लक्ष केंद्रीत करणे अशक्य होणे, निर्णयक्षमता गमावणे अशा स्वरुपाचे त्रास होतात. हा त्रास कमी ते जास्त अशा वेगवेगळ्या तीव्रतेचा असतो. स्वयंसेवकाला नेमका किती त्रास झाला याचे तपशील अद्याप हाती आलेले नाही. मात्र हे साईडइफेक्ट होणार असतील तर घाईघाईने कोविशिल्ड बाजारात आणून नये असे तक्रारदार स्वयंसेवकाचे म्हणणे आहे. निर्मात्यांनी लस बाजारात आणली तर कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशारा स्वयंसेवकाने दिला. 

स्वयंसेवकाने पुण्याची सीरम इन्स्टिट्युट, अॅस्ट्राझेनेका, ऑक्सफर्ड व्हॅक्सिन ट्रायल चीफ इन्व्हेस्टिगेटर अँड्य्रू पोलार्ड, ऑक्सफर्ड विद्यापीठातील जेनर इन्स्टिट्युट लॅब, आयसीएमआर, रामचंद्र इन्स्टिट्युट ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च, ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया या सर्वांना नोटीस पाठवली आहे. लस निर्माते साईड इफेक्टविषयी बरीच महत्त्वाची माहिती लपवत आहेत, असा आरोप तामीळनाडूतील स्वयंसेवकाने केला. 

मी २९ सप्टेंबर २०२० रोजी नोंदणी केली आणि १ ऑक्टोबर रोजी मला लस देण्यात आली. यानंतर ११ ऑक्टोबर २०२० पासून त्रास सुरू झाला. भयंकर डोकेदुखी, सतत उलट्या होणे अशा स्वरुपात त्रासाला सुरुवात झाली. नंतर न्यूरॉलॉजिकल ब्रेकडाऊन आणि कॉग्निटिव फंक्शंस बिघडले. घरच्यांनी आयसीयूमध्ये दाखल केले. उपचारांनंतर २६ ऑक्टोबर रोजी घरी परतलो पण अद्याप पूर्णपणे बरा झालेलो नाही, अशा स्वरुपाची तक्रार स्वयंसेवकाने नोटीसच्या माध्यमातून नोंदवली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी