कोलंबो: श्रीलंकेतील (Sri Lanka) राजकीय आणि आर्थिक संकट शनिवारी (9 जुलै, 2022) अधिक गडद झालं आहे. वास्तविक, राजधानी कोलंबोमध्ये राष्ट्राध्यक्ष गोटाबायो राजपक्षे (Gotabaya Rajapaksa) यांच्याविरोधात जोरदार निदर्शने सुरु आहेत. दरम्यान, देशभरातून लोक कोलंबोच्या दिशेने जात आहेत. या अभूतपूर्व परिस्थितीमुळे राष्ट्रपती गोटाबायो यांना राष्ट्रपती भवन सोडून पळून जावं लागलं आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, या काळात संतप्त आंदोलक राष्ट्रपती भवनात घुसले, तर अनेकांनी राष्ट्रपती भवनाला घेराव घातला. दरम्यान, राजपक्षे हे पळून गेल्याचं समजतं आहे. मात्र, याबाबत सध्यातरी अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. मात्र, राष्ट्रपती भवनाबाहेर लाखो लोकांचा जनसमुदाय पाहता राजपक्षे तिथे थांबण्याची शक्यता फारच कमी आहे.
दरम्यान, या सगळ्यात श्रीलंकेत विरोध वाढत असताना पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता लंकेत सर्वपक्षीय सरकार अस्तित्वात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अधिक वाचा: वाढत्या आर्थिक संकटामुळे श्रीलंकेत आणीबाणी जाहीर
दरम्यान, अशीही माहिती समोर आली आहे की, कोलंबोमधील निदर्शनांदरम्यान दोन पोलिसांसह 23 लोक जखमी झाले होते. ज्यांना तातडीने नॅशनल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. दरम्यान, ऑस्ट्रेलिया-श्रीलंका सामना सुरू असलेल्या क्रिकेट स्टेडियमवर गदारोळ झाला आहे.
दुसरीकडे, संरक्षण तज्ज्ञ मेजर जनरल (आर.) एके सिवाच यांनी टीएनएनला सांगितले की, 'श्रीलंकेची आर्थिक स्थिती अत्यंत वाईट झाली आहे. IMF त्यांना कर्ज देऊ शकत नाही. श्रीलंकेत संकट निर्माण व्हावे, अशी भारताची अजिबात इच्छा नाही. तिथली परिस्थिती चांगली व्हावी असं भारताचाही मनात आहे.'
अधिक वाचा: चीनमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या श्रीलंकेला भारताचा आधार
कशामुळे केलं जातंय आंदोलन
खरं तर, श्रीलंका गेल्या काही काळापासून गंभीर आर्थिक संकटाशी झुंज देत आहे. तिथे तेल, अन्न, औषध या जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती गगनाला भिडल्या होत्या. देशाच्या आर्थिक संकटात देशाच्या गलथान कारभाराविरोधात अनेक महिन्यांच्या निदर्शनांनंतर राष्ट्रपतींच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी देशभरातील आंदोलकांनी कोलंबोकडे मोर्चा वळवला आहे.
80 टक्के लोकांना झोपावं लागतंय उपाशी पोटी
श्रीलंकेतील आर्थिक संकट किती खोलवर आहे आणि खाण्यापिण्याची किती टंचाई आहे. हे संयुक्त राष्ट्रांच्या ताज्या मूल्यांकनावरून समजू शकते. त्यांच्या मते, श्रीलंकेतील 80 टक्के लोक महागाई आणि अन्नपदार्थांच्या कमतरतेमुळे त्यांना दोन वेळचं पोटभर अन्नही मिळेनासं झालं आहे. सध्या श्रीलंकेत पेट्रोल आणि डिझेलची उपलब्धता नगण्य आहे आणि सरकारने इंधन वाचवण्यासाठी अत्यावश्यक सार्वजनिक सेवाही बंद केल्या आहेत.