Crocodile Attack : तेरा वर्षांच्या चिमुकल्यावर मगरीचा हल्ला, नदीपात्रात शोध घेताना समजली धक्कादायक माहिती

नदीकिनारी खेळणाऱ्या लहान मुलावर मगरीने हल्ला करून त्याला नदीपात्रात खेचून नेले. हा मुलगा अजूनही बेपत्ता असून त्याचा शोध सुरू आहे.

Crocodile Attack
तेरा वर्षांच्या चिमुकल्यावर मगरीचा हल्ला  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • मगरीचा 13 वर्षांच्या मुलावर हल्ला
  • मगरीने मुलाला नदीत ओढले
  • ग्रामस्थांकडून शोधकार्य सुरूच

Crocodile Attack | नदीपात्राजवळ खेळण्यासाठी गेलेल्या चिमुकल्यावर एका मगरीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मगरीने 13 वर्षांच्या मुलावर हल्ला केला आणि त्याला ओढत नदीपात्रात नेलं. ही घटना समजताच मुलाच्या कुटुंबीयांनी आणि ग्रामस्थांनी नदीपात्रावर गर्दी केली आणि शोध सुरू केला. उत्तराखंडमधील खटीमा गावात ही घटना घडली. अजूनही मगरीचा शोध सुरू असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे. 

मुलाचा शोध सुरू

मगरीने मुलाला पकडून नदीत नेल्यानंतर तातडीने ग्रामस्थांनी नदीत होड्या घेऊन कूच केली. मगरीचा शोध घेण्यासाठी प्रत्येक होडीत जाळी घेऊन शोधकार्य सुरू करण्यात आलं आहे. या शोधकार्यादरम्यान एक मगर ग्रामस्थांच्या जाळ्यात अडकली, मात्र ती वेगळीच मगर असल्याचं लक्षात आल्यावर तिला सोडून पुन्हा शोधकार्य सुरू कऱण्यात आलं आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी पीडित कुटुंबीयांशी बातचित केली असून शोधकार्य सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सरकारकडून शक्य ती सर्व मदत केली जाईल, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे.

अधिक वाचा - Twitter चे मोदी सरकारला पुन्हा आव्हान, कर्नाटक उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला

अशी घडली घटना

खटीमा गावात असणाऱ्या नदीकिनारी एक तरूण गुरं चारण्यासाठी नेहमीप्रमाणे गेला होता. त्यावेळी तिथं दोन लहान मुलं खेळायला आली. ओळखीची मुलं असल्यामुळे तो तरुण मुलांना गायींकडे लक्ष ठेवायला सांगून अंघोळीसाठी नदीत गेला. दोन्ही मुलं एका म्हशीवर बसली होती आणि निसर्गाचा आनंद घेत मजामस्ती करत होती. त्याच वेळी एका मगरीनं पाण्याबाहेर येत म्हशीवर हल्ला केला. या झटापटीत दोन्ही मुलं म्हशीवरून खाली पडली. त्यातील एका मुलाला पकडून मगर पुन्हा पाण्यात गेली. काही क्षणात ही घटना घडल्यामुळे मुलाला वाचवण्यात तरुणाला अपयश आलं. त्यानंतर तरुणाने आजूबाजूच्या गावकऱ्यांना ही घटना सांगितली आणि मुलाचा शोध घेण्यासाठी पाण्यात उडी घेतली. मात्र या मुलाला शोधण्यात त्याला यश आलं नाही. 

अधिक वाचा - प्रसिद्ध वास्तू तज्ज्ञ चंद्रशेखर गुरुजींची हॉटेलमध्ये निर्घृण हत्या, घटना सीसीटीव्हीत कैद 

अद्यापही शोध सुरूच

अनेक तास होऊनही मुलाचा शोध न लागल्यामुळे कदाचित तो पाण्यात बुडाला असावा किंवा प्रवाहासोबत वाहून गेला असावा, अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने अद्यापही शोधकार्य सुरू ठेवलं आहे. या दरम्यान एक मगरही स्थानिकांना सापडली. मात्र मुलावर ज्या मगरीने हल्ला केला, ती मगर वेगळीच असल्याचं तरुणानं सांगितलं. त्यामुळे पुन्हा एकदा शोधकार्याला सुरुवात करण्यात आली आहे. रात्रीपर्यंत हे शोधकार्य सुरू राहणार असून दुसऱ्या दिवशीही ते सुरू ठेवण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत. या घटनेमुळे पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी