Curd name controversy in Tamil Nadu : दही एरवी पदार्थ आणखी रुचकर करण्यासाठी वापरला जाणारा पदार्थ. अनेकजण दही साखर किंवा नुसते दही खाणे पसंत करतात. अनेक पदार्थांसोबत दही खाणे लोकांना आवडते. पण या दह्यामुळे दक्षिण भारतातले राजकारण ढवळून निघाले आहे. दह्याच्या मुद्यावरून हिंदी विरुद्ध स्थानिक भाषा असे राजकारण पेटल्याचे चित्र आहे.
या सगळ्याची सुरुवात झाली ती तामीळनाडू या दक्षिण भारतातील एका राज्यात. तामीळनाडूतील दूध उत्पादक संघ 'आविन'ने त्यांच्या दह्याच्या पाकिटांवर हिंदी शब्द दही (Dahi) वापरण्याऐवजी तामीळ शब्द तायिर (Thayir) वापरण्याची भूमिका घेतली आहे. यावरूनच वादाला तोंड फुटले आहे. कारण भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या नियमानुसार दह्याच्या पाकिटावर सहज वाचता येईल अशा पद्धतीने दही हा शब्द लिहिणे आवश्यक आहे. हा नियम वादाचे कारण ठरला आहे.
तामीळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी दह्याबाबतचा नियम म्हणजे हिंदी थोपविण्याचा प्रकार असल्याचा आरोप केला आहे. मुख्यमंत्र्यांनी दह्याबाबतच्या सरकारी नियमाविषयी नाराजी व्यक्त करत केंद्र सरकारवर टीका केली आहे.
तामीळनाडूवर हिंदी थोपविण्याचा प्रकार खपवून घेणार नाही. तामीळनाडूतील दूध निर्मात्यांकडून दह्याच्या पाकिटांवर दही हा हिंदी शब्द नाही तर तायिर हा तामीळ शब्दच वापरला जाईल, अशी भूमिका तामीळनाडूच्या सरकारने आणि प्रशासनाने घेतली आहे. 'आविन'ने पत्र लिहून भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाला त्यांचा निर्णय कळवला आहे.
तामीळनाडू भाजप तसेच डीएमकेनेही भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या नियमाला विरोध केला आहे. स्थानिकांवर हिंदी थोपवणे योग्य नाही अशी राजकीय भूमिका दोन्ही पक्षांच्या तामीळनाडूतील नेतृत्वाने घेतला आहे. तामीळनाडू भाजपचे नेते के. अण्णामलाई यांनी दह्याबाबतचा नियम मागे घेण्याची मागणी केली आहे.
केंद्र सरकारने देशातल्या स्थानिक भाषांना चालना देण्याचे धोरण घेतले आहे. हे धोरण असतानाच दह्याचा नियम करणे हा एक विरोधाभास आहे; असे सांगत के. अण्णामलाई यांनी दह्याबाबतचा नियम मागे घेण्याची मागणी केली आहे.
निरोगी राहण्यासाठी चिमुरड्यांनी खाण्याचे पदार्थ
भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या नियमानुसार दह्याच्या पाकिटावर सहज वाचता येईल अशा पद्धतीने दही हा शब्द लिहिणे आवश्यक आहे. स्थानिक भाषेत दह्याला वेगळा शब्द वापरला जात असेल तर तो शब्द शेजारी कंसात लिहिण्याची मुभा प्राधिकरणाने दिली आहे. नियम असा असूनही तामीळनाडूत हिंदी विरुद्ध तामीळ असा भाषावाद पेटवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे चित्र आहे.