PM Modi : पेट्रोल डिझेलवर सर्वाधिक कर घेणार्‍या महाराष्ट्राला पंतप्रधान मोदींनी सुनावले, इंधनावरील कर कमी करण्याच्या सूचना

केंद्र सरकारसह अनेक राज्यांनी पेट्रोल डिझेलवर कर कमी करून सर्वसामान्यांना दिलासा दिला, परंतु महाराष्ट्राने कर कमी केले नाही असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. तसेच महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी पेट्रोल डिझेल दर कमी करावे अशा सूचनाही मोदींनी केल्या.

narendra modi
पंतप्रधान नरेंद्र मोदी  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • केंद्र सरकारसह अनेक राज्यांनी पेट्रोल डिझेलवर कर कमी करून सर्वसामान्यांना दिलासा दिला,
  • परंतु महाराष्ट्राने कर कमी केले नाही असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
  • महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी पेट्रोल डिझेल दर कमी करावे अशा सूचनाही मोदींनी केल्या.

Narendra Modi : नवी दिल्ली : केंद्र सरकारसह अनेक राज्यांनी पेट्रोल डिझेलवर कर कमी करून सर्वसामान्यांना दिलासा दिला, परंतु महाराष्ट्राने कर कमी केले नाही असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. तसेच महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी पेट्रोल डिझेल दर कमी करावे अशा सूचनाही मोदींनी केल्या. आज कोरोनावर पंतप्रधान आणि सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली होती. तेव्हा पंतप्रधान मोदी यांनी ही सूचना केली. 

गेल्या काही दिवसांत पेट्रोल डिझेलचे भाव वाढले आहेत. नोव्हेंबर महिन्यात केंद्र सरकारने कर कमी करून सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर अनेक भाजपशासित राज्यांनीही दर कमी केला होता. बिगर भाजपशासित राज्यांनी कर कमी केले नव्हते.  महाराष्ट्रात एलपीजीवरील कर कमी केल्याने एलपीजीचे दर कमी झाले होते. तसेच पेट्रोल डिझेलचे दर कमी करणे शक्य नाही त्यामुळे राज्यातील तिजोरीवर परिणाम होईल अशी भूमिका राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी विधीमंडळात घेतली होती. 


पंतप्रधान मोदी या बैठकीत म्हणाले की, रशिया युक्रेन युद्धामुळे पेट्रोल डिझेल पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे देशातील आव्हाने वाढली आहेत. हे जागतिक संकट असून त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होती. अशा वेळी केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये आर्थिक ताळमेळ असावा असे मोदी म्हणाले. 

पेट्रोल डिझेलवरून पंतप्रधान मोदी म्हणाले की, सर्वसामान्यांचा आर्थिक भार कमी करण्यासाठी नोव्हेंबर महिन्यात सरकारने पेट्रोल डिझेलवरील कर कमी केला. तेव्हा राज्य सरकारनेही कर कमी करून सर्वसामान्यांना दिलासा दिला होता. काही राज्यांनी कर कमी करून नागरिकांना दिलासा दिला, परंतु काही राज्यांनी कर कमी केला नाही.  विशेषतः महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, तेलंगाणा, आंध्र प्रदेश, केरळ, झारखंड आणि तमिळनाडूने केंद्र सरकारचे म्हणणे मान्य केले नाही. त्यामुळे या राज्यातील सर्वसामान्यांवर भार पडला. या निर्णयामुळे महसूलावर परिणाम होत असेल परंतु सर्वसामान्य जनतेला दिलासा देणे गरजेचे आहे असेही मोदी म्हणाले. 

पंतप्रधान मोदी म्हणाले की, कर्नाटकाने कर घटवला नसता तर गेल्या सहा महिन्यांत त्यांचा महसूल पाच हजार कोटींनी वाढला असता. गुजरात राज्याने कर घटवला. त्यांनी कर घटवला नसता तर त्यांचा महसूल तीन ते चार हजार कोटींनी वाढाल असता. परंतु या राज्यांनी कर कमी करून त्यांनी सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे. तर दुसरीकडे कर्नाटक आणि गुजरातच्या शेजारील राज्यांनी कर घटवला नाही आणि त्यांना चार ते पाच हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल मिळवला आहे. त्यामुळे या राज्यांच्या तुलनेत इतर राज्यांत पेट्रोल डिझेल स्वस्त आहे. यामुळे शेजारील राज्यांनाही याचे नुकसान सहन करावे लागत आहे, कारण सीमाभागातील लोक शेजारील राज्यांत पेट्रोल डिझेल भरत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रासह इतर राज्यांनी इंधनावरील कर कमी करावा आणि सर्वसामान्यांना दिलासा द्यावा अशी सूचना पंतप्रधान मोदींनी केली आहे. 

महाराष्ट्रात सर्वाधिक कर

देशात महाराष्ट्रात पेट्रोल डिझेलवर सर्वाधिक कर आकारला जातो. १०० रुपयांच्या पेट्रोलवर ६५ रुपये कर आकारला जातो. शेजारील आंध्र प्रदेशमध्येही हीच स्थिती आहे. १०० रुपयांच्या पेट्रोल डिझेलवर ६५ रुपयांचा कर आकारला जात आहे. मध्यप्रदेश आणि केरळमध्ये १०० रूपयांच्या पेट्रोलवर जवळपास ६१ रूपये, राजस्थानमध्ये ६० रूपये, छत्तीसगढ-कर्नाटकमध्ये ५५ रूपये आणि पश्चिम बंगालमध्ये ५४ रूपये एवढा कर द्यावा लागतो. तसेच पंजाबमध्ये १०० रूपयांच्या इंधनासाठी जवळपास ५३ रूपये, बिहार-झारखंडमध्ये ५२ रूपये, जम्मू-कश्मीरमध्ये ५० रूपये, उत्तर प्रदेशमध्ये ४८ रूपये आणि गुजरातमध्ये ४६ रूपये कर द्यावा लागतो. यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या दोघांच्याही करांचा समावेश आहे. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी