Sextortion च्या जाळ्यात अडकतायेत तरुण, पाहा कसे स्वत:ची सुटका कशी करायची

सायबर गुन्ह्यांच्या जगात हा नवीन प्रकार वेगाने वाढतो आहे. हा गुन्हा मुख्यत: व्हिडिओ कॉलशी (Video call)निगडीत आहे आणि यात ब्लॅकमेलिंग करून लोकांकडून मोठ्या रकमा वसूल केल्या जातात.

Cyber crime
सायबर क्राईम 

थोडं पण कामाचं

  • देशभरात सायबर गुन्ह्यांमध्ये प्रचंड वाढ
  • सेक्सटॉर्शन हा वाढत चाललेला गुन्हा
  • ब्लॅकमेलिंग करून लोकांकडून मोठ्या रकमा वसूल केल्या जातात

देहरादून: अलीकडच्या काळात देशभरात सायबर गुन्ह्यांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. त्यातच नवीन पद्धतीने सायबर गुन्हे (Cyber crime)केले जात आहेत. सायबर गुन्ह्यांच्या या जगतात एक अशाप्रकारचा गुन्हा वाढत चालला आहे ज्यात तुम्ही अडकलात तर जीवावर बेतू शकते. हा गुन्हा म्हणजे सेक्सटॉर्शन (Sextortion). सायबर गुन्ह्यांच्या जगात हा नवीन प्रकार वेगाने वाढतो आहे. हा गुन्हा मुख्यत: व्हिडिओ कॉलशी (Video call)निगडीत आहे आणि यात ब्लॅकमेलिंग करून लोकांकडून मोठ्या रकमा वसूल केल्या जातात. यात सामाजिक प्रतिष्ठेला धक्का किंवा बदनामी होण्याच्या भीतीने अनेकजण पोलिसांकडे तक्रारदेखील करत नाहीत. (Youth being trapped in Sextortion, see how to avoid such trap)

उत्तराखंड मध्ये १० केस नोंदवल्या

उत्तराखंडमध्ये अलीकडेच यासंदर्भातील १० प्रकरणे नोंदवली गेली आहेत. अर्थात यात शक्यता अशी आहे की ८० टक्के प्रकरणात लोक बदनामीमुळे पोलिसांकडे जात नाहीत. उत्तराखंड येथील हे मोठे रॅकेट संपूर्ण उत्तराखंडमध्ये हातपाय पसरते आहे. यात विशेषकरून तरुणवर्ग जाळ्यात सापडतो आहे. त्यांना कष्टाने कमावलेले पैसे गमवावे लागत आहेत.

ब्लॅकमेलिंगचा मोठा धंदा, असे ओढतात जाळ्यात

सेक्सटॉर्शनचा हा मोठा धंदा नेमका कसा होतो ते जाणून घेऊया. यात आधी सोशल साइट्सवर मुलीं बनून तरुणांशी चॅट सुरू होते. सायबर क्रिमिनल मुलींच्या नावाने बनावट खाते सुरू करतात. त्यानंतर सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणाऱ्या तरुणांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतात. त्यानंतर गुन्हेगार फेसबुकवर चॅटिंग करतात. मग व्हॉट्सअप नंबर शेअर करत अश्लील व्हिडिओ कॉल करण्यास सांगतात. जेव्हा एखादी व्यक्ती व्हिडिओ कॉल करते तेव्हा तिला अश्लील व्हिडिओ दाखवला जातो आणि त्या व्यक्तीलादेखील तसेच करण्यास सांगितले जाते. यानंतर हा व्हिडिओ कॉल रेकॉर्ड केला जातो आणि मग तो शेअर केला जाण्याची भीती दाखवत ब्लॅकमेल केले जाते. अश्लील व्हिडिओ इंटनरेटवर टाकू असे धमकावत मोठ्या प्रमाणात पैसे वसूल केले जातात.

या ट्रॅपला कसे टाळाल

या प्रकारच्या सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकण्यासाठी तरुणांनी जागरुक असणे गरजेचे आहे. अशा लोकांकडून फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका जे तुमच्या ओळखीचे नाहीत. त्याचप्रमाणे अनोळखी व्यक्तीशी व्हिडिओ कॉलवर बोलू नका. कोणत्याही भूलधापांना बळी पडू नका. तुम्ही जर अडकलात तरी पोलिसांशी संपर्क करा. लोकांनी तक्रार केली तर या प्रकारच्या रॅकेटला समोर आणता येईल असे पोलिसांचे म्हणणे आहे. सेक्सटॉर्शनचे रॅकेट पकडणे पोलिसांसाठीदेखील सोपे नसते. सायबर सेल यासंदर्भात काम करत असते. मात्र अशी प्रकरणे वाढत चालली आहेत. 

अलीकडच्या काळात सायबर गुन्हे हे पोलिसांसमोरील एक मोठे आव्हान आहे. त्यासाठी सायबर सेल आहेत मात्र तरीही गुन्हेगार नवीन मार्ग आणि पद्धती शोधून लोकांना फसवत असतात. अशावेळी सर्वसामान्य माणसाने जागरुकता दाखवणे गरजेचे आहे.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी