Cyclone Nivar: तामिळनाडू-पुद्दुचेरीच्या किनारपट्टी भागात चक्रीवादळाने घातले थैमान

लोकल ते ग्लोबल
Updated Nov 26, 2020 | 11:19 IST | टाइम्स नाऊ मराठी

चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीला हाताळण्यासाठी तामिळनाडू आणि पुद्दुचेरीच्या अधिकाऱ्यांनी अनेक उपाययोजना केल्या आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून किनारपट्टी भागातून एक लाखाहून अधिक लोकांना हलविण्यात आले.

Cyclone Nivar
निवार चक्रिवादळ  |  फोटो सौजन्य: PTI

थोडं पण कामाचं

  • भारतीय हवामानशास्त्र विभाग (आयएमडी) म्हणतो की चक्रीवादळ वायव्येकडे सरकले आणि पुढच्या २ तासांत चक्रीवादळ अशक्त झाले
  • पुद्दुचेरीमध्ये पावसाचा जोर कायम आहे. चक्रीवादळाचे केंद्र २५ नोव्हेंबरला रात्री ११.३० पासून २६ नोव्हेंबरला पहाटे २.३० च्या दरम्यान पुद्दुचेरीच्या किनाऱ्यावर थडकले.
  • बुधवारी जोरदार वाऱ्यासह तामिळनाडू आणि पुद्दुचेरीच्या काही भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली

चेन्नई/ पुडुचेरी : भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) गुरुवारी सांगितले की, अत्यंत धोकादायक चक्रीवादळाने पुद्दुचेरीजवळील किनाऱ्याला ओलांडले आहे आणि आता ते अशक्त झाले आहे. चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीला हाताळण्यासाठी तामिळनाडू आणि पुद्दुचेरीच्या अधिकाऱ्यांनी अनेक उपाययोजना केल्या आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून किनारपट्टी भागातून एक लाखाहून अधिक लोकांना हलविण्यात आले असून या भागातील वीजपुरवठा खंडीत करण्यात आला आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभाग (आयएमडी) म्हणतो की चक्रीवादळ वायव्येकडे सरकले आणि पुढच्या २ तासांत चक्रीवादळ अशक्त झाले. पुद्दुचेरीमध्ये पावसाचा जोर कायम आहे.
चक्रीवादळाचे केंद्र २५ नोव्हेंबरला रात्री ११.३० पासून २६ नोव्हेंबरला पहाटे २.३० च्या दरम्यान पुद्दुचेरीच्या किनाऱ्यावर थडकले. २६ नोव्हेंबर रोजी सकाळी २.३० वाजेपर्यंत तीव्र चक्रीवादळ कमकुवत झाले. त्यानंतर पुढील ३ तासात त्याचा वेग मंदावला आणि ६५-७० किमी प्रति तास झाला. 

बुधवारी जोरदार वाऱ्यासह तामिळनाडू आणि पुद्दुचेरीच्या काही भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली. भारतीय हवामान खात्याने बुधवारी सांगितले की, तीव्र चक्रीवादळ किनाऱ्यावर आदळण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि लवकरच ते किनाऱ्यावर येईल. आयएमडीने आपल्या ट्विटर हँडलवर म्हटले आहे की, अत्यंत तीव्र चक्रीवादळ सध्या पुद्दुचेरीच्या दक्षिण-पूर्व ४० किलोमीटर दूर असलेल्या कुडलोरपासून ५० किमी आहे. चक्रीवादळ जवळ येण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पुढील ३ तासात पुद्दुचेरीजवळील किनारपट्टी ते पार करेल.

यापूर्वी बुधवारी मुसळधार पाऊसाने जोरदार वाऱ्यासह दोन्ही राज्यांच्या कित्येक भागात हजेरी लावली, त्यानंतर एक लाखाहून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवण्यात आले आहे. हवामान खात्याने सांगितले आहे की दक्षिण-पश्चिम बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या निवार चक्रीवादळ वायव्य दिशेने वाटचाल करीत अतिशय तीव्र स्वरुपाचे रूप धारण केले आहे आणि  चेन्नईपासून १६० किमी आणि पुद्दुचेरीपासून ८५ किमी दूर किनाऱ्यावर आदळणार आहे. 

दरम्यान, चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर जनतेचे रक्षण करण्यासाठी तामिळनाडूचे मुख्यमंत्री के पलानीस्वामी यांनी गुरुवारी चेन्नई, वेल्लोर, कुडलोर, विलुपुरम, नागापट्टिनम, तिरुवारूर, चेंगलपेट, कांचीपुरम यासह १३ जिल्ह्यांमध्ये सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. बुधवारी सुट्टी जाहीर करण्यात आली होती.

दरम्यान, जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात हिमवृष्टीमुळे उत्तर भारतात थंडी वाढली आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्ली आणि त्याच्या आसपासच्या शहरांमध्ये वाऱ्याचा वेग कमी झाल्यामुळे हवेची गुणवत्ता खालावली आहे आणि गंभीर गटात पोहोचली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी