Mumbai Underworld Gang: मुंबईत (Mumbai) डी-गँग संपल्याच्या दाव्यात एनआयएने (NIA) नुकत्याच टाकलेल्या छाप्यांमध्ये धक्कादायक बाब समोर आली आहे. मुंबईत अजूनही डी-गँगचे सदस्य (D-Gang Members) असून ते दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) आणि छोटा शकीलच्या (Chhota Shakeel) संपर्कात असल्याची माहिती मिळाली आहे. काही दिवसांपूर्वी एनआयएने मुंबईत अनेक ठिकाणी छापे टाकून २१ जणांची चौकशी केली होती. याच चौकशीत दाऊद आणि छोटा शकील अजूनही त्यांच्या मुंबईतील सदस्यांच्या संपर्कात असून ते परदेशात बसून त्यांचा व्यवसाय चालवत असल्याचे समोर आले आहे.
आरिफ शेख उर्फ आरिफ भाईजान आणि शब्बीर शेख यांना एनआयएने अटक केली असून त्यांच्याकडून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. दाऊद आपल्या सदस्यांच्या संपर्कात राहण्यासाठी आणि तपास यंत्रणांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी मुंबईतील विविध अॅप्लिकेशन्सच्या मदतीने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत असल्याची माहिती हाती आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे लोक अँड्रॉईड फोनसाठी न्यूमेरो, बोटीम, व्हायबर, टँगो सारखे मोबाईल अॅप्लिकेशन वापरत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अॅपल फोनमध्येही फेसटाइम अॅप्लिकेशन्सचा वापर केला जात आहे. सायबर तज्ज्ञांच्या मते, व्हायबर, टँगो आणि बोटीम ही व्हॉट्सअॅपसारखीच अॅप्लिकेशन्स आहेत. हे अॅप्लिकेशन्स ज्याला कॉल करणार आहोत त्यांच्या मोबाईल फोनमध्येही असतील तर ते कोणत्याही शुल्काशिवाय एकमेकांशी संवाद साधू शकतात. यासाठी टोळीचे सदस्य त्यांच्या ओळखीच्या पण त्याचा कोणताच या गोष्टींशी संबंध नाहीत अशा मित्रांचे सिमकार्ड वापरत आहेत.
आणखी एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे Numero नावाच्या अॅप्लिकेशनला खरेदी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सिम कार्ड आवश्यक आहे. डी गँगचे सदस्य सिम कार्ड खरेदी करण्यासाठी दूरच्या मित्राचे युनिव्हर्सल क्रेडिट कार्ड वापरतात. याचा फायदा म्हणजे तपास यंत्रणा असे क्रमांक शोधू शकत नाही. वेगवेगळ्या लोकांच्या नावाने घेतलेल्या सिमकार्डमुळे अशा लोकांचा शोध घेणे तपासकर्त्यांना अवघड होते आहे. यासोबतच मनी लॉन्ड्रिंग, हवाला रॅकेट, ड्रग्जचा पुरवठा आदींसाठी अशा क्रमांकांवरून खंडणी वसूल केली जात आहे.
सोमवारी ९ मे रोजी सकाळी NIA ने मुंबईतील २९ ठिकाणी एकाचवेळी छापे टाकले. त्यापैकी २४ अड्डे मुंबईत आणि ५ अड्डे मुंबईला लागून असलेल्या मीरा रोडवर आहेत. एनआयएने छोटा शकीलचा मेहुणा आरिफ शेख उर्फ आरिफ भाईजान आणि त्याचा भाऊ शब्बीर शेख यांना अटक केली होती. मुंबईच्या पश्चिम उपनगरात दाऊदच्या डी-कंपनीच्या बेकायदेशीर कामात सहभागी असल्याचा आणि दहशतवादाला प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक मदत केल्याचा आरोप दोघांवर आहे.