Days after the security breach of PM Modi, BSF recovers an abandoned Pakistani boat near Ferozepur : नवी दिल्ली : पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत त्रुटी राहिल्याच्या घटनेला दोन दिवस उलटत नाहीत तोच आणखी एक धक्कादायक घटना घडली. फिरोझपूर जिल्ह्यातून सीमा सुरक्षा दलाच्या (BSF - Border Security Force) जवानांनी पाकिस्तानची बेवारस होडी जप्त केली. ही होडी रिकामी होती त्यात कोणतीही वस्तू अथवा व्यक्ती नव्हती. पण पाकिस्तानची बेवारस होडी आढळल्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
याआधी बुधवार ५ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी पंजाबमध्ये फिरोझपूर जिल्ह्यातील हुसैनीवाला येथे रस्ते मार्गाने जात असताना शेतकऱ्यांच्या एका गटाने आंदोलन करत ताफा अडवला. आंदोलक पंतप्रधान मोदी यांच्या वाहनांच्या दिशेने येऊ लागले. पंतप्रधानांच्या वाहनांच्या ताफ्यासाठी रस्ता मोकळा करणे आणि सुरक्षित ठेवणे ही स्थानिक पोलिसांची जबाबदारी होती. पण तसे झाले नाही. सुरक्षा रक्षकांनी बुधवारी आवश्यक ती खबरदारी घेऊन पंतप्रधानांना सुरक्षितरित्या भटिंडा विमानतळावर परत आणले. या प्रकरणाची चौकशी सुरू असतानाच पाकिस्तानची बेवारस होडी फिरोझपूर जिल्ह्यात आढळली.
फिरोझपूर जिल्हा हा पंजाबमधील भारत-पाकिस्तान सीमेवरील जिल्हा आहे. या जिल्ह्यातून वाहणारी सतलज नदी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधून वाहणारी बारमाही नदी आहे. यामुळे पाकिस्तानची बेवारस होडी भारतात आढळणे आणि पंतप्रधानांच्या सुरक्षेतील त्रुटी या दोन्ही बाबींकडे सुरक्षा यंत्रणा गंभीरपणे बघत आहेत. महत्त्वाचे म्हणजे भारत पंजाबमध्येच पहिली एस ४०० यंत्रणा कार्यरत करणार आहे. या संदर्भातले काम सुरू असतानाच पंजाबमध्ये सुरक्षेशी संबंधित धक्कादायक घटना घडली आहे.