मॉस्को : रशियाचे अध्यक्ष (President of Russia) व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांचा मृत्यू झालाचा दावा ब्रिटन गुप्तचर यंत्रणेने केला होता. या दाव्यामुळे जगभरात खळबळ माजली होती. परंतु रशियाकडून (Russia) या दाव्याचं खंडन करण्यात आले आहे. 'अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या मृत्यू चे वृत्त ही अफवा आहे,' असे रशियाचे परराष्ट्रमंत्री (Minister of Foreign Affairs) सर्जेई लाव्हरोव्ह यांनी स्पष्ट केले आहे. पुतिन यांना कोणताही आजार झालेला नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
लाव्हरोव्ह यांनी रविवारी फ्रान्समधील वृत्तवाहिनी 'टीएफ वन'शी बोलताना पुतिन यांच्या प्रकृतीबाबत पसरलेली वृत्ते म्हणजे अफवा असल्याचे म्हटले आहे. 'पुतिन रोज टीव्हीवर दिसतात. तुम्ही त्यांना पाहू शकता, ऐकू शकता,' याकडेही लाव्हरोव्ह यांनी लक्ष वेधल्याचे रशियन परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. पुतिन यांना कर्करोग झाला असून, काही दिवसांपूर्वीच त्यांच्यावर पोटातील पाणी काढून टाकण्यासाठी शस्त्रक्रिया झाली होती, असे वृत्त माध्यमांत प्रसृत झाले होते.
'पुतिन यांचा मृत्यू झाला आहे आणि सध्या दिसणारे पुतिन हा तोतया आहे,' असा दावा ब्रिटिश गुप्तहेरांनी केला आहे. त्या दाव्याचे रशियाकडून खंडन करण्यात आले आहे. दरम्यान, पुतिन यांची दृष्टी जात आहे. ते आणखी तीन वर्षे जिवंत राहू शकतात, असे डॉक्टरांनी सांगितल्याचा दावा एका रशियन गुप्तहेराने केल्याचे वृत्त ब्रिटनमधील 'द इंडिपेंडंट'ने दिले आहे.
या रशियन हेराने ही माहिती रशियाचे माजी गुप्तहेर असलेले बोरिस कारपिचकोव्ह यांना कळवले होते. ते ब्रिटनमध्ये राहतात. 'पुतिन यांना डोकेदुखीचा त्रास आहे. टीव्हीवर काय बोलायचे हे देखील त्यांना कागदावर लिहून द्यावे लागते. ते इतक्या मोठ्या अक्षरांत लिहावे लागते, की एका कागदावर जेमतेम दोन ओळीच लिहिता येतात. त्यांची दृष्टी अधू होत आहे,' असे रशियन हेराने कारपिचकोव्ह यांना कळवले होते.