कोणत्याही एटीएममधून पैसे काढता येणार, शुल्क लागणार नाही! 

अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी अत्यंत महत्त्वाचे निर्णय जाहीर केले आहेत. त्यापैकीच एक म्हणजे आता कोणत्याही एटीएममधून पैसे काढता येणार आहेत. 

debit card holders who withdraw cash from any bank's atm can do it free of charge 
कोणत्याही एटीएममधून पैसे काढता येणार, शुल्क लागणार नाही!   |  फोटो सौजन्य: Times Now

नवी दिल्ली: देशात सध्या कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे सर्व व्यवहार जवळपास ठप्प पडले आहे. ज्याचा दूरगामी परिणाम हा देशाच्या अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो. हीच गोष्ट लक्षात घेऊन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. यावेळी नागरिकांना दिलासा देणारे निर्णयही अर्थमंत्र्यांकडून जाहीर करण्यात आले. अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी आज (मंगळवार) जाहीर केलं की, आता नागरिकांना कोणत्याही एटीएममधून पैसे काढता येणार आहेत. त्यासाठी त्यांना कोणताही चार्ज लागणार नाही. ही सुविधा पुढील तीन महिन्यांसाठी लागू असणार असल्याचं देखील अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केलं. 

याआधी डेबिट कार्डधारकांना कोणत्याही एटीएममधून पैसे काढण्यासाठी काही निर्बंध घालण्यात आले होते. ज्या बँकेचं डेबिट ग्राहकांकडे आहे त्या बँकेच्या एटीएममधून पैसे काढल्यास ग्राहकाला कोणताही चार्ज लागत नव्हता. मात्र, त्या व्यतिरिक्त इतर बँकेच्या एटीएममधून तीन पेक्षा अधिक वेळा पैसे काढल्यास ग्राहकांना चार्ज लागत होता. हाच चार्ज हटविण्याचा निर्णय आता घेण्यात आला आहे. त्यामुळे यापुढील तीन महिने डेबिटधारकांना कोणत्याही एटीएममधून विनाशुल्क पैसे काढता येणार आहे. त्यामुळे देशातील नागरिकांसाठी हा अत्यंत दिलासादायक असा निर्णय आहे. 

दरम्यान, कोरोना व्हायरससंबंधी काही सरकारी उपाययोजना केल्या आहेत. तसंच काही आर्थिक धोरणं देखील बदलली आहेत. याचविषयी अर्थमंत्र्यांनी आज माहिती दिली. यातील सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे यंदाचं आर्थिक वर्ष हे ३१ मार्च ऐवजी ३० जूनला संपणार आहे. त्यामुळे २०१८-१९ साठी इन्कम टॅक्स रिटर्न (प्राप्तिकर विवरण पत्र) भरण्याची मुदत ही वाढविण्यात आली असून आता आपण ३० जूनपर्यंत रिटर्न भरु शकतात. दरम्यान, उशिरा रिटर्न भरल्यास पूर्वी जो १२ टक्के अधिकचा चार्ज लागत होता तो ९ टक्केच आकारण्यात येणार आहे. याशिवाय मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यांच्या जीएसटी रिटर्नसाठी ३० जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे. 

५ कोटींपर्यंत टर्नओव्हर असलेल्या कंपन्यांना जीएसटी रिटर्न भरण्यासाठी उशीर झाल्यास दंड आकारण्यात येणार नसल्याचंही अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, टीडीएसवरचा व्याज हा १८ टक्क्यांवरुन ९ टक्के करण्यात आला आहे. तसंच आधार आणि पॅन लिंकची तारीख देखील वाढविण्यात आली असून ती ३० जूनपर्यंत करण्यात आली आहे. यासारखे अनेक महत्त्वाचे निर्णय आज निर्मला सीतारमन यांनी घेतले आहेत. ज्याचा फायदा देशातील अनेक लोकांना होणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...