'मी पळ काढणार नाही, 'ती' जबाबदारी माझीच,' अमित शाहा कशाविषयी म्हणाले असं?

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाहा यांनी झारखंडच्या पराभावाची जबाबदारी स्वत: स्वीकारली आहे. यावेळी त्यांनी पराभवावर चिंतन करु असंही म्हटलं आहे. 

defeat bjp jharkhand assembly elections amit shah accepts responsibility
मी पळ काढणार नाही, 'ती' जबाबदारी माझीच: अमित शाहा  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • अमित शाहांनी स्वीकारली झारखंडच्या पराभवाची जबाबदारी
  • अमित शाहा यांनी केली काँग्रेसवर टीका
  • महाराष्ट्रात काँग्रेसने विचारांना तिलांजली दिल्याची अमित शाहा यांची टीका

नवी दिल्ली: '२०१९ हे वर्ष भाजपसाठी खूप चांगलं होतं. देशातील जनतेने ३०० हून अधिक जागा देत नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान केलं. पण याच वर्षी झालेल्या झारखंडमध्ये आमचा पराभव झाला. त्या पराभवाची संपूर्ण जबाबदारी ही माझीच आहे. कारण की, मी भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे. त्यामुळे माझीच जबाबदारी आहे. मी त्यापासून पळ काढणार नाही. ज्याप्रमाणे विजयाचं श्रेय मला दिलं जातं. त्याचप्रमाणे पराभवाची जबाबदारी देखील माझीच आहे.'  असं वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाहा यांनी केलं आहे. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते.

'महाराष्ट्रात काँग्रेसने विचारांना तिलांजली दिली'

'हरियाणात आम्ही सरकार बनविल्यानंतर आम्हाला अनेक प्रश्न विचारले जात आहे. पण मी तुम्हाला प्रश्न विचारतो की, महाराष्ट्रात शिवसेना ज्या दोन पक्षांविरोधात लढली त्यांच्यासोबतच त्यांनी सत्ता स्थापन केली. महाराष्ट्रात युतीला स्पष्ट बहुमत होतं. तिथे भाजप सर्वात मोठा पक्ष होता. पण जेव्हा सरकार बनविण्याचा प्रश्न उपस्थित झाला तेव्हा चौथ्या क्रमांकावर असलेल्या काँग्रेसने आपल्या विचारांना तिलांजली देऊन थेट सत्तेत सहभागी होणं पसंत केलं.' असं म्हणत अमित शाहा यांनी  काँग्रेसवर टीका केली. 

'फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील हेच सांगितलं होतं'

'महाराष्ट्रात आमचा पराभव झाला नाही. पण आम्ही सरकार स्थापन करु शकलो नाही. हा झारखंडमध्ये आमचा पराभव झाला ही खरी गोष्ट आहे. त्यामुळे झारखंड हा आमच्यासाठी आत्मचिंतनाचा विषय आहे. त्याविषयी आम्ही नक्कीच विचार करु. महाराष्ट्रात आम्ही शिवसेनेसोबत लढलो. यावेळी फडणवीस यांच्या नेतृत्वात आम्ही निवडणूक लढलो. त्यावेळी फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील हे आम्ही पहिल्या दिवसापासून सांगत होतो. पण तेव्हा शिवसेनेने कुठेही आक्षेप घेतला नव्हता.' असं म्हणत अमित शाहा यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवरच निशाणा साधला. 

'सीएएविषयी विरोधकांकडून जनतेची दिशाभूल'

याचवेळी अमित शाहा यांनी सीएए आणि एनआरसी कायद्यांविषयी देखील भाष्य केलं. 'सीएएला जो काही विरोध झाला तो राजकीयदृष्ट्या झाला. याला हिंसक विरोध होईल असं आम्हाला वाटलं नव्हतं. आम्हाला अपेक्षा नव्हती की, विरोधक एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांची दिशाभूल करतील ते. सीएए हा कायदा कुणाचंही नागरिकत्व हिरावून घेणारं नसून तो नागरिकत्व देणारा कायदा आहे. सीएए हे संसदेत मंजूर झालं आहे. पण एनआरसीबाबत कुठेही चर्चा नाही. एनआरसी सध्या तरी येणार नाही.' असंही शाहा यावेळी म्हणाले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी