delegation of US lawmakers is visiting Taiwan : वॉशिंग्टन डी. सी. : अमेरिकेच्या पाच लोकप्रतिनिधींचे शिष्टमंडळ तैवानच्या दौऱ्यावर आहे. या शिष्टमंडळाचे नेतृत्व मॅसाच्युसेट्स (Massachusetts) येथील डेमोक्रॅटिक सिनेटर एड मार्के करत आहेत. शिष्टमंडळ रविवार (१४ ऑगस्ट २०२२) आणि सोमवार (१५ ऑगस्ट २०२२) असा दोन दिवसांचा तैवान दौरा करत आहे.
याआधी बारा दिवसांपूर्वी अमेरिकेच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हच्या स्पीकर नॅन्सी पेलोसी यांनी तैवानचा दौरा केला होता. या दौऱ्याचा चीनने निषेध केला होता. नाराजी व्यक्त करण्यासाठी चीनने तैवानच्या भोवतालच्या परिसरात ठिकठिकाणी लष्करी कवायतींचे आयोजन केले होते. या कवायतींच्या निमित्ताने अनेक लढाऊ विमानांची उड्डाणं झाली. चीनच्या अनेक लढाऊ विमानांनी तैवानच्या हवाई हद्दीचे उल्लंघन करून थोड्या वेळाने पुन्हा चीनमध्ये प्रवेश केला. चीनने विमानवेधी शस्त्रांच्या कवायती मोठ्या प्रमाणावर केल्या. अनेक चिनी युद्धनौका तैवान जवळच्या समुद्रात उभ्या होत्या.
चीनच्या दमदाटीला उत्तर देण्यासाठी अमेरिकेने चीनचा शेजारी असलेल्या जपानमध्ये मोठी लष्करी जमवाजमव केली. जपानमधील अमेरिकेच्या लष्करी तळावर लढाऊ विमानांचा मोठा ताफा युद्ध सज्ज होता. यातील निवडक विमानांनी नॅन्सी पेलोसी यांच्या विमानाला तैवानमध्ये उतरेपर्यंत हवाई संरक्षण दिले होते. प्रशांत (पॅसिफिक) महासागरात अमेरिकेच्या विनाशिका (डिस्ट्रॉयर), युद्धनौका आणि विमानवाहक नौका (एअरक्राफ्ट कॅरिअर) युद्धसज्ज होत्या.
तैवानमध्ये लोकशाही व्यवस्था आहे. अमेरिका लोकशाहीचे रक्षण करेल. यासाठी प्रसंगी योग्य ती कृती केली जाईल; अशा स्वरुपाची वक्तव्य नॅन्सी पेलोसी यांनी तैवान दौऱ्यावर असताना वारंवार केली होती. पेलोसी यांच्या दौऱ्याला दोन आठवडे पूर्ण होण्याआधीच अमेरिकेच्या पाच लोकप्रतिनिधींचे शिष्टमंडळ तैवानच्या दौऱ्यावर आले असल्याचे जाहीर करण्यात आले. हे शिष्टमंडळ तैवान सरकारच्या प्रमुख प्रतिनिधींची भेट घेणार आहे. या दौऱ्यावर चीनची काय प्रतिक्रिया येते याकडे अनेकांचे लक्ष आहे.
आशिया खंडाच्या पूर्व भागात, चीनच्या दक्षिण तटावर तैवान नावाचे बेट आहे. या बेटावरील सरकारची सत्ता तैवान आणि आसपासच्या लहान बेटांवर आहे. चीन सरकार या सर्व बेटांना स्वतःचा भूभाग समजते तर १९४९ पासून तैवानने स्वतःला स्वतंत्र देश म्हणून जाहीर केले आहे. कम्युनिस्ट पार्टी चीनची ओळख पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना अशी करुन देते तर तैवान स्वतःची ओळख तैवान रिपब्लिक ऑफ चायना करुन देतो. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत ज्यावेळी आशिया खंडातील एका देशाचा समावेश करायचा होता त्यावेळी तैवानचे नाव पुढे आले होते. मात्र भारताने आशियातील भौगोलिकदृष्ट्या सर्वात मोठा देश म्हणून चीनचे नाव पुढे केले. भारताच्या या निर्णयाचा गैरफायदा घेत चीनने संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत नकाराधिकार मिळवला आणि १९६२ मध्ये भू विस्तारासाठी भारतावर युद्ध लादले. तैवान सरकारशीही चीनचे खटके उडू लागले. कोरोना संकटानंतर तर चीनने तैवान आणि भारतासह अनेक शेजारी देशांशी मतभेद ओढवून घेतले आहेत.
चीनमधील किंग राजवट उलथवून तिथे लोकशाही राजवट आणण्याचे श्रेय चीनच्या राष्ट्रीय पक्षाच्या सन यत सेन यांच्याकडे जाते. त्यांनी १९३७ मध्ये ही कामगिरी केली. मात्र दुसऱ्या महायुद्धात चीनवर जपानने आक्रमण केले, यात चीनची अभूतपूर्व हानी झाली, १९३९च्या अखेरपर्यंत सुमारे एक कोटी चिनी या युद्धात मारले गेले, असा अंदाज आहे. यानंतर झालेल्या गृहयुद्धात १९४९ मध्ये चीनची सत्ता चिनी साम्यवादी अर्थात कम्युनिस्ट पक्षाने बळकावली. चिनी लोकशाहीवादी राष्ट्रीय पक्षाचे अस्तित्व केवळ तैवान बेटांपुरते मर्यादित राहिले. उर्वरीत चीनवर कम्युनिस्ट पक्षाने ताबा मिळवला. याच कारणामुळे तैवानचे सरकार चीनचे अधिकृत प्रतिनिधी असल्याचा दावा करते. कम्युनिस्ट पक्षाने नंतर बौद्धांसाठी पवित्र असलेल्या तिबेटचा १९५१ मध्ये घास गिळला. या नंतर १९६२ मध्ये कम्युनिस्ट चिनी पक्षाच्या सरकारने भारताविरोधात युद्ध पुकारले. अक्साई चीन बळकावला. पाकिस्तानची कायम साथ दिली पण उईघुर मुस्लिम (uighur muslim) अल्पसंख्यांकांचा अमानवी छळ केला. हा छळ आजही सुरू आहे. इंग्रजांकडून हाँगकाँग बेटांचा ताबा १९९७ मध्ये चीनला मिळाला. हा ताबा मिळाल्यानंतर चीनने हाँगकाँगमधील लोकशाही व्यवस्था नष्ट करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. कोरोना संकटासाठी जगातील अनेक देशांनी चीनला दोषी ठरवायला सुरुवात केली आहे. यानंतर चीनने सर्व शेजारी देशांना त्रास देण्याचे आणि विस्तारवादी धोरण अवलंबिण्याचे सत्र सुरू केले आहे.