टूलकिटशी संबंधित पुरावे १२० जीबी डेटामध्ये सुरक्षित

भारत सरकार विरोधात वातावरण तापवण्यासाठी काय करायचे याचे धोरण सांगणारे टूलकिट चर्चेत आहे. हे टूलकिट तयार करणाऱ्यांशी संबंधित चर्चेची तसेच विचारविनिमयाची मुद्देसूद माहिती १२० जीबीच्या डेटामध्ये आहे.

Delhi Police Checking Aroung 120 Gb Data In Toolkit Case
टूलकिटशी संबंधित पुरावे १२० जीबी डेटामध्ये सुरक्षित 

थोडं पण कामाचं

  • टूलकिटशी संबंधित पुरावे १२० जीबी डेटामध्ये सुरक्षित
  • दिशा रवी आणि निकिता जेकबच्या घरातून अनेक इलेक्ट्रॉनिक गॅजेट जप्त
  • डिजिटल स्वरुपात साठवलेल्या अनेक फाइलची तपासणी सुरू

नवी दिल्ली: भारत सरकार विरोधात वातावरण तापवण्यासाठी काय करायचे याचे धोरण सांगणारे टूलकिट चर्चेत आहे. हे टूलकिट तयार करणाऱ्यांशी संबंधित चर्चेची तसेच विचारविनिमयाची मुद्देसूद माहिती १२० जीबीच्या डेटामध्ये सुरक्षित लपवली आहे. ही माहिती टप्प्याटप्प्याने उलगडण्याचे काम दिल्ली पोलिसांचे सायबर तज्ज्ञ करत आहेत. या कामात त्यांना यश मिळत असल्याचे वृत्त आहे. (Delhi Police Checking Aroung 120 Gb Data In Toolkit Case)

दिल्ली पोलिसांनी दिशा रवी आणि निकिता जेकब यांच्या घरातून अनेक इलेक्ट्रॉनिक गॅजेट जप्त केली आहेत. यात, लॅपटॉप, मोबाइल, हार्ड ड्राइव्ह, पेन ड्राइव्ह अशा वस्तूंचा समावेश आहे. या गॅजेटची तपासणी सुरू आहे. अनेक इ-मेल, व्हॉट्सअॅप चॅट, टेलिग्राम चॅट, काढलेल्या नोट्स, फोटो, व्हिडीओ अशा बऱ्याच कंटेंटचे विश्लेषण बारकाईने सुरू आहे. डिजिटल स्वरुपात साठवलेल्या अनेक फाइलची तपासणी होत आहे. इलेक्ट्रॉनिक गॅजेटमधील डीलीट केलेला डेटा रिस्टोअर करुन त्याचीही तपासणी केली जात आहे.

पर्यावरण क्षेत्रात काम करण्याचा दावा करणाऱ्यांनी खलिस्तान समर्थकांसाठी टूलकिट विकसित केले आहे. शेतकरी आंदोलन, सोशल मीडिया, रस्त्यावर उतरुन आंदोलनाच्या नावाखाली कायदा हाती घेणे, भारताच्या दूतावासांसमोर आंदोलन करणे, सार्वजनिक संपत्तीची नासधूस करणे, कायदा-सुवस्था उधळून लावणे, भारत सरकार विरोधात वातावरण तापवणे यासाठी टूलकिटमधील धोरणाची अंमलबजावणी सुरू आहे. हे टूलकिट तयार करणाऱ्यांमध्ये मुंबईत वकिली करणारी निकिता जेकब, इंजिनिअर म्हणून पुण्यात काम केलेला आणि मागील काही दिवस दिल्लीत सक्रीय असलेला शंतनू मुळूक, बंगळुरूत पर्यावरण क्षेत्रात काम करणारी दिशा रवी यांचा समावेश आहे. 

दिशा रवी स्वीडनच्या ग्रेटा थनबर्ग हिला ओळखते. थनबर्गची पर्यावरण क्षेत्रातील कामामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठी प्रतिमा निर्माण झाली आहे. या प्रतिमेचा वापर करुन घेण्यासाठी दिशामार्फत टूलकिट ग्रेटाला पाठवण्यात आले. दिशा ग्रेटाच्या संपर्कात राहून तिला भारतातील आंदोलाविषयी ठराविक माहिती पुरवत होती. ग्रेटाचे भारत सरकार विरोधी मत तयार करत होती. भारताविरोधात ग्रेटा काही बोलली तर टूलकिट यशस्वी होईल या विश्वासातून प्रयत्न सुरू होते; अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली.

टूलकिटसाठी खलिस्तान समर्थक पोएटिक जस्टिस फाउंडेशनचा संस्थापक एमओ धालिवाल याने कॅनडातील एका महिलेच्या माध्यमातून दिशा, निकिता आणि शंतनू यांच्याशी संपर्क साधला. पुढे निकिता पोएटिक जस्टिस फाउंडेशनचा इ-मेल अकाउंट वापरुन सहकाऱ्यांच्या संपर्कात राहू लागली. टूलकिट बाबतच्या चर्चेसाठी दिशाने एक व्हॉट्सअॅप ग्रुप आणि एक टेलिग्राम ग्रुप तयार केला होता. व्हॉट्सअॅप ग्रुपवर दहापेक्षा जास्त सदस्य होते. टूलकिटच्या फाइलची निर्मिती सर्वात आधी शंतनूने केली. या फाइलमध्ये नमूद मुद्दे निश्चित करण्याचे आणि त्यांची नोंद करण्याचे काम निकिता, शंतनू आणि दिशा यांनी केले. 

प्रजासत्ताक दिनी दिल्लीत ट्रॅक्टर रॅली झाली. ही रॅली होण्याआधी खलिस्तान समर्थक पोएटिक जस्टिस फाउंडेशनचा संस्थापक एमओ धालिवाल याने टूलकिटवर काम करणाऱ्यांशी झूमवरुन व्हिडीओ कॉन्फरन्स करुन चर्चा केली होती. या कॉन्फरन्समध्ये दिशा, निकिता आणि शंतनू सहभागी झाले होते, असे दिल्ली पोलिसांनी सांगितले. 

टूलकिटवर काम करणारी निकिता खलिस्तान समर्थक पीटर फ्रेडरिक याच्याही संपर्कात होती. पीटर हा खलिस्तान समर्थक आहे, तसेच तो पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयशी जवळीक असणाऱ्यांपैकी एक आहे. यामुळेच दिशाला अटक झाल्यानंतर भारत सरकार विरोधात नाराजी व्यक्त करणारे तसेच दिशाच्या सुटकेची मागणी करणारे काही ट्वीट झाले. यात पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच्या पक्षाच्या अधिकृत हँडलवरुन झालेले एक ट्वीट होते. या व्यतिरिक्त काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांकडून काही ट्वीट झाले.

टूलकिट प्रकरणाशी संबंधित अनेक बाबी हळू हळू उलगड आहे. सध्या दिशा रवी दिल्लीत पोलिसांच्या कोठडीत आहे. टूलकिट प्रकरणामध्ये दिल्ली पोलिसांनी मुंबईत वकिली करणाऱ्या निकिता जेकब आणि इंजिनिअर असलेल्या शंतनू विरोधात अजामीनपात्र वॉरंट काढले होते. हे वॉरंट दिल्लीतील कोर्टातून काढण्यात आले होते. पण मुंबईच्या उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने शंतनूला दहा दिवसांचा तर मुंबई उच्च न्यायालयाने (bombay high court) निकिताला तीन आठवड्यांचा अटकपूर्व जामीन (प्री अरेस्ट ट्रान्झिट बेल) दिला. या जामिनाविरोधात दिल्ली पोलीस अपिलात जाणार की नाही हे अद्याप समजलेले नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी