दिल्लीत कडाक्याची थंडी

Delhi records coldest November morning in at least 14 years दिल्लीत कडाक्याची थंडी पडली आहे. एरवी डिसेंबर महिन्यात पारा घसरतो पण यंदा नोव्हेंबरमध्येच कडाक्याची थंडी जाणवत आहे.

Delhi records coldest November morning in at least 14 years
दिल्लीत कडाक्याची थंडी 

थोडं पण कामाचं

  • दिल्लीत कडाक्याची थंडी
  • संध्याकाळपासून ते सकाळी ७-८ वाजेपर्यंत थंडीचा जोर
  • शनिवारच्या रात्रीपर्यंत थंडीच्या लाटेचा नेमका अंदाज वर्तवणे शक्य होईल

नवी दिल्ली: दिल्लीत कडाक्याची थंडी पडली आहे. एरवी डिसेंबर महिन्यात पारा घसरतो पण यंदा नोव्हेंबरमध्येच कडाक्याची थंडी जाणवत आहे. संध्याकाळपासून ते सकाळी ७-८ वाजेपर्यंत थंडीचा जोर जास्त असतो. नंतर ऊन आणि दैनंदिन कामांची लगबग यामुळे थंडीचा त्रास सहन करता येतो. (Delhi records coldest November morning in at least 14 years)

हवामान विभागाच्या नोंदीनुसार दिल्लीत २९ नोव्हेंबर २००६ रोजी तापमान ७.३ अंश सेल्सिअस होते. यानंतर दिल्ली पुन्हा पारा इतका घसरला नव्हता. पण या वर्षी पुन्हा एकदा पारा घसरण्याची शक्यता आहे. पुढील दोन-तीन दिवसांत दिल्लीसह उत्तर भारतात थंडीची लाट येईल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

साधारणपणे सलग दोन दिवस मैदानी भागांमध्ये १० अंश सेल्सिअस तापमान राहणार असेल आणि सामान्य तापमान चार ते पाच अंशांनी कमी झाले असेल तर हवामान विभाग उत्तर भारतात थंडीची लाट आहे, असा इशारा देतो. यंदा हा इशारा देण्यात आला आहे. यामुळे संपूर्ण देशात थंडी जाणवेल, असा अंदाज आहे.

दिल्लीसह उत्तर भारतातील तापमानाच्या शुक्रवारी घेण्यात आलेल्या नोंदी बघता थंडीची लाट येणार असल्याचा इशारा हवामान विभागाने व्यक्त केला. थंडीची लाट येणार की नाही यावर शनिवारच्या नोंदींद्वारे शिक्कामोर्तब करणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले. दिल्लीत नोव्हेंबर २०१९ मध्ये एकदा वर्षभरातले सर्वात कमी म्हणजे ११.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले. तसेच २०१८ मध्ये १०.५ अंश सेल्सिअस तर २०१७ मध्ये एकदा ७.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले. दिल्लीत आतापर्यंत सर्वात कमी तापमान १९३८ मध्ये नोंदवण्यात आले. दिल्लीत १९३८ मध्ये पारा ३.९ अंश सेल्सिअसवर होता.

साधारणपणे दिल्लीसह उत्तर भारताच्या मैदानी भागांमध्ये डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात थंडीची लाट जाणवते. पण यंदा नोव्हेंबरमध्येच कडाक्याच्या थंडीची शक्यता आहे. लॉकडाऊन काळात प्रदूषणमुक्त वातावरण होते. या कालावधीत दिल्लीच्या वातावरणातील उष्णता बऱ्याच अंशी हवेसोबत वाहून गेली. हिमालयाच्या पर्वत रांगांमध्ये यंदा थंडीच्या सुरुवातीच्या दिवसांतच मोठ्या प्रमाणावर हिमवृष्टी झाली आहे. या हिमवृष्टीमुळे थंड वारे मैदानी भागांच्या दिशेने वाहू लागले आहे. या वाऱ्यांमुळे तीव्र थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. शनिवारच्या रात्रीपर्यंत थंडीच्या लाटेचा नेमका अंदाज वर्तवणे शक्य होईल, असे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 

हिमाचल प्रदेशमध्ये थंडीची लाट आली आहे. केलांग आणि काल्पा या थंड हवेच्या ठिकाणी पारा शून्याच्या खाली गेला आहे. सिमल्यात पारा शून्याखाली पाच अंशांवर (उणे पाच अंश सेल्सिअस) गेला आहे. राजस्थानच्या अनेक भागांमध्ये रात्री थंडी जाणवू लागली आहे, पारा घसरला आहे. माऊंट अबू या राजस्थानमधील एकमेव हिल स्टेशनवर पारा दोन अंशांनी घसरला आहे. पुढच्या २४ तासांमध्ये रात्रीच्या तापमानात आणखी घसरण अपेक्षित आहे. हरयाणा आणि पंजाबमध्ये कमाल आणि किमान तापमानाचा पारा घसरेल, सामान्यपेक्षा कमी तापमानाची नोंद होईल, अशी शक्यता हवामान तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी