धुमसती दिल्ली, हिंसाचारात 17 जणांचा मृत्यू, शूट अॅट साईटचे आदेश

गेल्या दोन दिवसांपासून दिल्ली धूमसताना दिसत आहे. नागरिकता सुधारणा कायद्यावरुन (सीएए) दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरु आहे. या हिंसाचारात हिंसाचारात हेड कॉन्स्टेबलसह 17 जणांचा मृत्यू झाला आहे.

Delhi Violence
धुमसती दिल्ली, हिंसाचारात 17 जणांचा मृत्यू, शूट अॅट साईटचे आदेश  |  फोटो सौजन्य: AP

नवी दिल्लीः  गेल्या दोन दिवसांपासून दिल्ली धूमसताना दिसत आहे. नागरिकता सुधारणा कायद्यावरुन (सीएए) दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरु आहे. या हिंसाचारात हिंसाचारात हेड कॉन्स्टेबलसह 17 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 56 पोलिसांसह जवळपास 200 लोक जखमी झाले आहेत. उत्तर पूर्व दिल्लीमध्ये हिंसाचारानंतर जाफराबाद, मौजपूर, बाबरपूर आणि चांदबाग मध्ये कर्फ्यू लावण्यात आला आहे.

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल तणावाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी रात्री हिंसाचारग्रस्त भागात दाखल झाले. त्यांनी कारमध्ये बसून सीलमपूर, भजनपुरा, मौजपूर, यमुना विहार यासारख्या हिंसाचारग्रस्त भागातील परिस्थितीचा आढावा घेतला. दिल्लीमध्ये अनियंत्रित झालेल्या हिंसाचाराच्या परिस्थितीवर गेल्या 24 तासात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तीन बैठका घेतल्या आहेत. गृहमंत्र्यांच्या तिसऱ्या बैठकीत स्पेशल लॉ अँड ऑर्डर एसएन श्रीवास्तवसह दिल्ली पोलीस आणि गृह मंत्र्यालयाचे अनेक अधिकारी उपस्थित होते. जवळपास दीड तास चाललेल्या या बैठकीत एकदा पुन्हा सुरक्षा यंत्रणेवर चर्चा करण्यात आली. 

गोळ्या घालण्याचे आदेश

गृहमंत्रालयाने हिंसाचारग्रस्त भागात शूट अॅड साईटचे आदेश दिलेत. हिंसाचार घडवणाऱ्यांना बघताच क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात आलेत. रात्री आठ वाजता यमुना विहारमधील नूर-ए-इलाही चौकात पोलिसांनी इशारा दिला आहे. सध्या यमुना विहार परिसरात कलम 144 लागू करण्यात आले आहे.  हिंसाचार घडलेल्या भागांमध्ये ड्रोनने नजर ठेवली जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.   गृहमंत्री अमित शाह यांच्या आदेशानंतर हिंसाचारग्रस्त परिसरातील सुरक्षाव्यवस्थेत मोठी वाढ करण्यात आली आहे. 

शाळा आजही बंद 

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया नॉर्थ इस्ट परिसरातील शाळा बंद राहणार असल्याची माहिती ट्वीट करून दिली आहे. नॉर्थ ईस्ट भागातील शाळा आजही बंद राहणार आहे. काही परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत. CBSE च्या बोर्ड परीक्षाही स्थगित करण्यात आल्याचा निर्णय घेतला आहे, असं ट्विट त्यांनी केलं. 

या हिंसाचारानंतर सध्या  परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. पीआरओ एमएस रंधावा यांनी यांनी सांगितलं की,  अफवांवर विश्वास ठेवू नका तसेच कायदा हातात घेऊ नका. हिंसाचार झालेल्या भागांमध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे.

ईशान्य दिल्लीत उसळलेल्या या हिंसाचारामध्ये दिल्ली पोलिसांचे हेडकॉन्स्टेबल रतन लाल हे शहीद झाले असून त्यांच्या पार्थीवावर मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी