Delhi Rape Case : महिलेवर फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये बलात्कार, डेटिंग ॲपवर भेटलेल्या इसमानं घेतला गैरफायदा

दोन दिवसांपूर्वी डेडिंग ॲपवर ओळख झालेल्या व्यक्तीला भेटण्यासाठी ती गेली. मात्र त्या व्यक्तीने तिचा गैरफायदा घेत गुंगीचं औषध देऊन बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे.

Rape in Delhi
दिल्लीत महिलेवर बलात्कार  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • दिल्लीत महिलेवर बलात्कार
  • फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये घडली घटना
  • डेटिंग ॲपवर भेटलेल्या इसमाने घेतला गैरफायदा

Delhi Rape Case | दिल्लीत (Delhi) एका महिलेवर (Woman) बलात्कार (Rape) झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे. एका डेटिंग ॲपवर ओळख झालेल्या पुरुषाला भेटण्यासाठी ही महिला आली होती. मात्र महिलेचा गैरफायदा घेत या इसमाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले आणि नंतर पोबारा केला. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असून लवकरच आरोपीला अटक केली जाईल, असं आश्वासन दिलं आहे. 

अशी घडली घटना

दिल्लीतील एका 28 वर्षांच्या महिलेची मोहक गुप्ता नावाच्या पुरुषासोबत एका ऑनलाईन डेटिंग ॲपवर ओळख झाली. 27 मे दिवशी आपण पहिल्यांदा मोहकला टिंडर ॲपवर भेटल्याचं तिने पोलिसांना सांगितलं. दोघांच्या गप्पा वाढत गेल्या आणि त्यांनी एकमेकांना भेटायचं ठरवलं. त्यासाठी मोहकने महिलेला एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये येण्याचं निमंत्रण दिलं. ठरल्यानुसार 30 मे रोजी ही महिला मोहकला भेटण्यासाठी त्या हॉटेलमध्ये दाखल झाली. 

गुंगीचं औषध देऊन केले अत्याचार

हॉटेलमध्ये भेटायला आलेल्या या महिलेला मोहकनं एक ड्रिंक प्यायला दिलं. महिलेनं त्याच्यावर विश्वास ठेवत ते ड्रिंक घेतलं. मात्र त्यात गुंगीचं औषध होतं. ड्रिंक प्यायल्यानंतर महिलेला चक्कर आल्यासारखं वाटलं आणि ती गुंगीत गेली, असं वृत्त ‘द इंडियन एक्स्पेस’नं दिलं आहे. बेशुद्धावस्थेत असताना मोहकने तिच्यावर लैगिक अत्याचार केले. दुसऱ्या दिवशी म्हणजेच 31 मे रोजी तो महिलेला मेट्रो रेल्वे स्टेशनवर घेऊन गेला आणि तिला ट्रेनमध्ये बसवून गायब झाला.

महिलेने केली तक्रार

मोहकला या महिलेने फोन करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा फोन लागत नसल्याचं लक्षात आल्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. घटनेच्या दुसऱ्या दिवसापासून महिलेने त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा मोबाईल नंबर स्विच्ड ऑफ येत होता. आपली फसवणूक झाल्याचं महिलेच्या लक्षात आल्यावर तिने पोलिसांत या घटनेची तक्रार करण्याचा निर्णय घेतला. 

अधिक वाचा - Bridge Collapsed : कार्यक्रम सुरू असतानाच कोसळला पूल, उद्घाटन करणारे नेते सपत्निक गटारात, VIDEO होतोय व्हायरल

आरोपीवर गुन्हा दाखल

पोलिसांनी महिलेनं दिलेल्या वर्णनानुसार गुन्हा दाखल करून घेतला आहे. भारतीय दंडविधानाच्या कलम 376 (बलात्कार) आणि कलम 328 (विषबाधा) नुसार मोहक नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिल्लीच्या द्वारका पोलीस स्थानकात गुन्ह्याची नोंद झाली असून तपासाला सुरुवात करण्यात आली आहे. 

पोलीस तपासयात सीसीटीव्ही फुटेज

ज्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये ही घटना घडली, तिथलं सीसीटीव्ही फूटेज पोलीस सध्या तपासत आहेत. महिलेच्या मदतीनं आरोपीची ओळख पटल्यानंतर त्याला अटक करणं पोलिसांना सोपं जाणार आहे. या घटनेतील सर्व पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न पोलीस करत असून लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल, असं आश्वासन त्यांनी दिलं आहे. मात्र एका सुशिक्षित महिलेसोबत फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये घडलेल्या या प्रकारामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी