Pakistan News | कराची : पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याक समाजाला आणि त्यांच्या पाकिस्तानातील आस्थेला धक्का पोहचवण्याचे कृत्य नवीन नाही. पाकिस्तान मधून हिंदू मंदिरे पाडण्याच्या आणि विटंबनेच्या घटना नेहमी समोर येत असतात. आता कराचीतील एका हिंदू मंदिराच्या तोडफोडीचे प्रकरण समोर आले आहे. येथे अतिरेक्यांनी मंदिरातील मूर्तींची विटंबना केली आहे. तसेच मंदिरावरील हल्ल्याची ही घटना बंदर शहरातील कोरंगी क्रमांक ५ परिसरात घडली आहे. (Demolition of Hindu temple in Karachi, Attack on priest's house).
अधिक वाचा : सीएनजी झाला महाग,सीएनजी गाड्यांच्या विक्रीत 12 टक्क्यांची घट
एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी अतिरेक्यांनी श्री मारी माता मंदिरावर हल्ला केला. मंदिरावरील हल्ल्यानंतर तेथील स्थानिक हिंदू समाजातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. जमावाच्या एका गटाने मंदिराच्या पुजाऱ्याच्या घरावर हल्ला करून मूर्तींची विटंबना केल्याचे सांगण्यात येत आहे. मंदिर हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही. काही दिवसांपूर्वी पुजाऱ्यांनी या मूर्ती आणल्या होत्या आणि या मूर्ती बांधकाम सुरू असलेल्या मंदिरात ठेवल्या जाणार होत्या. असे सांगण्यात येत आहे.
'द एक्स्प्रेस ट्रिब्यून'ने दिलेल्या माहितीनुसार एका स्थानिक हिंदू नागरिकाने सांगितले की, "हल्लेखोर कोण होते आणि मंदिराला का लक्ष्य केले गेले याबद्दल आम्हाला काहीच माहिती नाही." मोटारसायकलवरून आलेल्या सहा ते आठ जणांनी मंदिर परिसरात हल्ला केल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे.
कोरंगी पोलिस स्टेशनचे एसएचओ फारूक संजरानी यांनी सांगितले की, पाच ते सहा अज्ञात संशयितांनी मंदिरात प्रवेश केला आणि तोडफोड करून पळ काढला. मागील ऑक्टोबरमध्ये सिंधमधील कोत्री भागात एका ऐतिहासिक मंदिराची देखील अज्ञातांनी तोडफोड केली होती. मानवाधिकार संघटनांचे म्हणणे आहे की पाकिस्तानमध्ये ज्या प्रकारे अल्पसंख्याक समुदायावर हल्ले केले जात आहेत आणि त्यांना लक्ष्य केले जात आहे, त्यामुळे देशातील मानवाधिकारांची स्थिती अत्यंत वाईट आहे.