DGCA New Rules: ‘या’ लोकांना विमान प्रवास करता येणार नाही, DGCA चा निर्णय, विमान प्रवाशांसाठी मोठी बातमी

एखाद्या प्रवाशाला विमानात बसण्यापासून रोखण्याची मनमानी आता विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांना करता येणार नाही. DGCA नं आता नवा नियम तयार केला आहे. त्यानुसार डॉक्टरांकडून प्रवाशाची तपासणी केल्यावरच त्याला विमानात प्रवेश देण्याबद्दलचा निर्णय विमान कंपन्या घेऊ शकणार आहेत.

DGCA New Rules
डीजीसीएचा नवा नियम  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांची मनमानी बंद
  • विमानात प्रवेश नाकारण्याचा निर्णय केवळ वैद्यकीय तपासणीच्या आधारेच
  • DGCA ने केला नवा नियम

DGCA New Rules | डीजीसीएकडून (DGCA) विमान प्रवासाबाबतच्या (Air Travel) नियमांत काही बदल (Changes in rules) करण्यात आले आहेत. यापुढे एखाद्या प्रवाशाला विमानातून प्रवास करण्याची परवानगी द्यायची की नाही, याबाबतचा निर्णय विमान कंपन्या (Airline companies) करू शकणार नाही. यापुढे केवळ डॉक्टरच हा निर्णय घेऊ शकणार आहेत. एखादी व्यक्ती विमानाने प्रवास करण्यासाठी शारीरिकदृष्ट्या फिट आहे की नाही, याचा निर्णय पूर्णतः डॉक्टरांच्या तपासणीवर अवलंबून असणार आहे. जर डॉक्टरांकडून त्या प्रवाशाला विमान प्रवासासाठी मनाई करण्यात आली, तरच विमान कंपन्या त्या प्रवाशाला विमानात चढण्यापासून रोखू शकतात. अन्यथा, कुठल्याही प्रवाशावर विमान प्रवासासाठी कंपन्या बंधनं घालू शकणार नाहीत. 

काय आहे प्रकरण?

हा निर्णय घेण्याला एका घटनेची पार्श्वभूमी आहे. रांची विमानतळावर नुकत्याच घडलेल्या एका घटनेनंतर DGCA कडून ही पावलं उचलण्यात आली असून नवे नियम निश्चित करण्यात आले आहेत. रांची विमानतळावर इंडिगो कंपनीच्या विमानात चढण्यापासून एका दिव्यांग व्यक्तीला रोखण्यात आलं होतं. विमान कर्मचाऱ्यांनी आयत्या वेळी या दिव्यांग प्रवाशाला विमानात प्रवेश द्यायला नकार दिला होता. त्यानंतर इंडिगो विमान कंपनीवर जोरदार टीका सुरू झाली होती. DGCA नं इंडिगो विमान कंपनीला 5 लाख रुपयांचा दंडही ठोठावला होता. 

इंडिगोचा दावा, पालकांची तक्रार

इतर प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करूनच आम्ही दिव्यांग मुलाला विमानात प्रवेश न देण्याचा निर्णय घेतला होता, असं इंडिगो कंपनीकडून सांगण्यात आलं होतं. प्रत्यक्षात हा मुलगा घाबरला होता आणि विमान कर्मचाऱ्यांच्या उद्धट वर्तणुकीमुळे त्याच्या मनावर परिणाम होत होता, अशी तक्रार त्याच्या आईवडिलांनी केली. या तक्रारीची दखल घेत DGCA कडून इंडिगो कंपनीवर दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. 

अधिक वाचा - Viagra Overdose : नवविवाहित तरुणाने व्हायग्राचा घेतला ओवरडोस, बायको वैतागून गेली माहेरी, करावी लागली शस्त्रक्रिया

घटनेनंतर नियमात बदल

या घटनेनंतरच DGCA नं नियमात बदल केले आहेत. नव्या नियमानुसार प्रत्येक विमान कंपनीला जर एखाद्या प्रवाशाला प्रवासापासून रोखायचं असेल किंवा विमानात प्रवेश द्यायचा नसेल, तर त्या व्यक्तीची डॉक्टरांकडून तपासणी करून घेणं बंधनकारक असेल. विमान कंपन्यांना प्रवाशाच्या प्रवास करण्याच्या क्षमतेविषयी शंका आली,तर कंपनीनं स्वतः डॉक्टरांकडून त्या प्रवाशाची तपासणी करून घ्यावी, असं नव्या नियमात म्हटलं आहे. जर तपासणीत काही दोष आढळला आणि विमान प्रवास करण्यास तो प्रवाशी सक्षम नसल्याचा निष्कर्ष डॉक्टरांनी दिला, तरच विमान कंपन्या त्या प्रवाशाला प्रवासापासून रोखू शकतील. अन्यथा सर्व प्रवाशांना विमानात प्रवेश देणं, हे बंधनकारक असणार आहे. केवळ कर्मचाऱ्यांना वाटलं, म्हणून कुठल्याही प्रवाशाला यापुढे बोर्डिंगपासून अडवता येणार नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी