'धनत्रयोदशीला अमित शहा खरेदी करणार आमदार'

लोकल ते ग्लोबल
Updated Oct 24, 2019 | 20:24 IST | टाइम्स नाऊ हिंदी

Election Results: हरियाणा आणि महाराष्ट्र या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. हरियाणात त्रिशंकू अवस्था निर्माण झाली आहे. दरम्यान लालूप्रसाद यादव यांच्या पक्षाने अमित शहांवर टीका केली आहे.

Amit Shah
अमित शहा (फाईल फोटो)  |  फोटो सौजन्य: PTI

थोडं पण कामाचं

  • हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल स्पष्ट झाले आहेत
  • हरियाणात त्रिशंकू परिस्थिती निर्माण होत असल्याचं दिसत आहे तर महाराष्ट्रात महायुती सरकार स्थापन करणार आहे
  • हरियाणा विधानसभा निवडणुकांचे निकाल येताच आयजेडीने भाजप अध्यक्ष अमित शहांवर टीका केलीय

पाटणा: हरियाणा आणि  महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून आता चित्र स्पष्ट झालं आहे. महाराष्ट्रात शिवसेना-भाजपच्या महायुतीने सर्वाधिक जागा मिळवत पुन्हा एकदा सत्ता स्थापन करणार आहे. मात्र, हरियाणामध्ये त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्याचं दिसत आहे. बातमी लिहिली तोपर्यंत हरियाणात काँग्रेसने २ जागांवर आघाडी मिळवली आहे तर २९ जागांवर विजय मिळवला आहे.

हरियाणात कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाहीये. काँग्रेस पक्षालाही बहुमत मिळवण्यात अपयश आलं आहे. जननायक जनता पक्षाने १० जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे आता सत्तेची चावी जननायक जनता पक्ष (जेजेपी)च्या हातात आली आहे. आता जेजेपी ज्या पक्षाला पाठिंबा देईल त्यांची सत्ता स्थापन होणार आहे. त्यामुळे भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी जेजेपी च्या नेत्यांसोबत संपर्क साधण्यास सुरुवात केली असल्याचं वृत्त आहे.

हरियाणात निर्माण झालेल्या या परिस्थिती संदर्भात लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाने ट्विट करुन अमित शहांवर टीका केली आहे. आरजेडीने ट्विट करत म्हटलं, "उद्या धनत्रयोदशी आहे, संपूर्ण देश धातूपासून बनवलेल्या वस्तू खरेदी करेल आणि अमित शहा MLA खरेदी करतील".

बिहारमध्ये विधानसभेच्या पाच जागांसाठी पोटनिवडणुकीसाठी २१ ऑक्टोबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती. यापैकी एका जागेवर ओवैसी यांच्या एमआयएमने विजय मिळवला आहे, दोन जागांवर आरजेडीने विजय मिळवला आहे. एका जागेवर अपक्ष उमेदवाराने विजय मिळवला तर एका जागेवर जेडीयू पुढे आहे.

तर महाराष्ट्रात शिवसेना-भारतीय जनता पक्षाने १५० हून अधिक जागा जिंकत बहुमत मिळवलं आहे. तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी १०० जागांच्या आसपास आहे. या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली असून अपक्ष सुद्धा मोठ्या प्रमाणात निवडून आले आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी