Do Aliens Really exist? | एलियन्स खरोखरच असतात का, या प्रश्नाचं उत्तर मिळवण्याचा प्रयत्न गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. अद्याप याचं कुठलंही ठोस उत्तर मिळालेलं नाही. आतापर्यंत एलियन्स असल्याचं सिद्ध करणारे अनेक पुरावे मिळाले आहेत, मात्र प्रत्यक्ष एलियन्स असल्याच्या बाबीची खात्री होऊ शकलेली नाही. अनेक गोष्टी या एलियन्सली जोडल्या गेल्या आहेत. त्यावर अनेक चित्रपट आणि कलाकृतीही निर्माण झाल्या आहेत. मात्र एलियन्स खरोखरच अस्तित्वात असतात का, या प्रश्नाचं उत्तर अद्याप मिळालेलं नाही. नुकतंच नासाच्या प्रमुखांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे.
एलियन्स खरोखरच अस्तित्वात असू शकतात का, असा प्रश्न नासाचे प्रमुख बिल नेल्सन (Bill Nelson) यांना विचारण्यात आला होता. यावर त्यांनी मार्मिक उत्तर दिलं. ते म्हणाले, “एका शब्दात जर याचं उत्तर द्यायचं असेल तर ते होय, असं आहे. या जगात एलियन्स असू शकतात. ते असण्याच्या घटनांची काही वेळा पुष्टीही झाली आहे. नाताळाच्या दिवशी आम्ही एक दुर्बीण लॉन्च केली आहे. ब्रह्मांडातील कानाकोपऱ्याचा शोध घेण्यासाठी या दुर्बिणीचा उपयोग केला जात आहे. त्यातून एलियन्सच्या अस्तित्वाबाबत अधिक माहिती समोर येऊ शकते”, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
पृथ्वीप्रमाणे जगात इतरत्र कुठे ना कुठे जीवसृष्टी असू शकते. ही शक्यता आपल्याला नाकारता येणार नाही. आतापर्यंत त्याबाबत कुठलीही ठोस माहिती उपलब्ध झालेली नाही, याचा अर्थ जीवसृष्टी नसेलच असा असू शकत नाही. कदाचित मानवाप्रमाणे इतरही काही ग्रहांवर मेंदू असणारे प्राणी असू शकतील आणि त्यांचा वेगळ्याच पद्धतीने विकास झालेला असू शकेल. ज्यावेळी त्याचा शोध लागेल, त्यावेळीच त्याविषयी ठोस माहिती समोर येऊ शकेल. मात्र सध्या एलियन्स असण्याची शक्यता फेटाळून न लावता अविरत शोध घेणं, हेच धोरण योग्य असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
जेम्स वेब टेलिस्कोप नावाची दुर्बीण जगभर भ्रमंती करत आहे. या दुर्बिणीतून वेगवेगळे ग्रह, तिथली रचना, रासायनिक प्रक्रिया यासारख्या बारीकसारीक गोष्टींचा आढावा घेण्यात येत आहे. अंतरिक्षातील वातावऱणाचा अधिक सखोल अभ्यास या दुर्बिणीच्या माध्यमातून केला जात असून एलियन्सच्या अस्तित्वाविषयी त्यातून काही वस्तुस्थिती समोर येण्याची शक्यता आहे. जुलै महिन्यात ही दुर्बीण पहिला फोटो पृथ्वीवर पाठवणार आहे. मात्र त्यापूर्वीच अंतराळात या दुर्बिणीला एक दगड येऊन धडकल्यामुळे तिचं नुकसान झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
अधिक वाचा - जिनपिंग यांच्या तिसऱ्या टर्मला विरोध
काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ ए. व्ही. लोएब यांनी एलियन्सविषयी मोठं विधान केलं होतं. यापूर्वीच एलियन पृथ्वीवर येऊन गेल्याचा दावा त्यांनी केला होता. त्या पार्श्वभूमीवर नासा प्रमुखांचं हे विधान महत्त्वाचं मानलं जात आहे. प्रत्येक देशानं त्यांच्या सुरक्षासंबंधीच्या बजेटमध्ये अंतरिक्षातील जीवसृष्टीचा शोध घेण्याच्या कामासाठी वेगळ्या बजेटची तरतूद करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.