3D Operation Successful | अमेरिकेत (US) वैद्यकशास्त्रातील (Medical Science) एक नवा प्रयोग (New Experiment) यशस्वी झाला आहे. एका तरुणीला थ्रीडी प्रिंटिंग (3D Printing) तंत्रज्ञानाचा वापर करत नवा कान बसवण्यात डॉक्टरांना यश आलं आहे. अशा प्रकारची ही जगातील पहिली शस्त्रक्रिया आहे. आजवर अनेक वस्तूंच्या निर्मितीसाठी थ्रीडी प्रिंटिंग तंत्रज्ञानाचा वापर केला जात होता. मात्र पहिल्यांदा मानवी अवयव तयार कऱण्यासठी या तंत्रज्ञानाचा वापर यशस्वी झाला आहे.
डॉक्टरांनी मार्च महिन्यात ही सर्जरी केली होती. आता तीन महिन्यांनी या तरुणीच्या शरीरानं त्या कानाचा स्वीकार करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे ऑपरेशन यशस्वी झाल्याचं सिद्ध झालं आहे. आतापर्यंत या ऑपरेशनची बातमी गुप्त ठेवण्यात आली होती. मात्र ते यशस्वी झाल्याचं सिद्ध झाल्यामुळे आता ही बाब जाहीर करण्यात आली आहे.
आजवर एका व्यक्तीचा कान दुसऱ्या व्यक्तीला लावण्याच्या अनेक शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या आहेत. कृत्रिम कान बसवण्याच्या शस्त्रक्रियाही अनेक ठिकाणी केल्या जातात. मात्र मुलीच्याच शरीरातील पेशीचा वापर करून आणि थ्रीडी प्रिटिंग तंत्रज्ञानाच्या वापराने कान तयार करण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे. अशा ऑपरेशनमध्ये शरीराकडून कानाचा स्वीकार केला जाईल का, याची डॉक्टरांना शंका होती. मात्र आता ही शंका दूर झाली आहे.
जेव्हा एका व्यक्तीचा कान दुसऱ्या व्यक्तीला बसवला जातो, त्यावेळी अनेकदा ते ऑपरेशन यशस्वी होत नाही. पेशंटचं शरीर दात्याच्या शरीरातील पेशींचा स्वीकार करायला नकार देतं. त्यामुळे ज्या व्यक्तीचं ऑपरेशन आहे, त्याच व्यक्तीच्या शरीरातील पेशींपासून अवयव तयार करण्याची कल्पना डॉक्टरांना सुचली होती. त्यानुसार या मुलीच्याच शरीरातील पेशीचा वापर करून हा कान तयार करण्यात आला होता.
या मुलीच्या जन्मापासून तिचा कान वाकडातिकडा होता. अत्यंत बेढब असणाऱ्या या कानाने तिला ऐकूही येत नव्हतं. आता त्या जागी अत्यंत आखीव-रेखीव आणि सुबक कान बसला आहे. त्यामुळे ही मुलगी आणि तिचे कुटुंबीय आनंदात आहेत. वीस वर्षांच्या या मुलीचे कानाचं ऑपरेशन करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. या नव्या प्रयोगाला सामोरं जाण्याचा धोका पत्करावा की नाही, असाही प्रश्न तिच्यापुढे होता. मात्र तिने धाडस करण्याचा निर्णय घेतला. आपला निर्णय योग्य ठरला, याचा कमालीचा आनंद सध्या तिच्या चेहऱ्यावर दिसतो.
थ्री डी प्रिटिंगचं तंत्रज्ञान काही नवं नाही. एखाद्या गोष्टीची हुबेहूब प्रतिकृती तयार करण्यासाठी याचा वापर केला जातो. मात्र आतापर्यंत वेगवेगळ्या वस्तू तयार करण्यासाठी त्याचा वापर होत असे. मानवी अवयव तयार करण्यासाठी पहिल्यांदाच याचा वापर करण्यात आला असून तो यशस्वी झाला आहे. हा कान तयार करणाऱ्या कंपनीनं सध्या त्याची पद्धत आणि तंत्रज्ञान याची माहिती गुप्त ठेवणं पसंत केलं आहे. मात्र योग्य त्या कायदेशीर मार्गानेच ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली, याची ग्वाही त्यांनी दिली आहे.
हे तंत्रज्ञान पूर्णपणे यशस्वी झालं, तर जगभरातील दिव्यांगांसाठी ही फार मोठी दिलासादायक बाब ठरणार आहे. अनेक अवयव या तंत्रज्ञनाच्या मदतीनं बदलणं शक्य होणार आहे.