Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊस सोडले

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ जो बायडेन घेणार आहेत. या शपथविधी सोहळ्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊस सोडले आहे. व्हाईट हाऊस सोडताना त्यांच्यासोबत पत्नी मेलानिया सुद्धा उपस्थित होत्या.

Donald Trump
डोनाल्ड ट्रम्प   |  फोटो सौजन्य: AP

थोडं पण कामाचं

  • डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊस सोडले
  • आज जो बायडेन घेणार अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ
  • जो बायडेन यांच्या शपथविधी सोहळ्यात डोनाल्ड ट्रम्प उपस्थित राहणार नाहीत

अमेरिकेचे (America) मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Tump) यांनी व्हाईट हाऊस सोडले आहे. आता फ्लोरिडा येथील पाम बीच किनाऱ्यावरील मार-ए-लागो इस्टेट येथे राहणार आहेत. व्हाईट हाऊस सोडल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प हे पत्नीसह विमानाने फ्लोरिडासाठी रवाना झाले. नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या शपथविधी सोहळ्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प हे निघून गेले आहेत. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प हे जो बायडेन यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीयेत.

डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं, "४ वर्षे अविश्वसनीय होते. आम्ही एकत्र अनेक कामे केली. मी माझे कुटुंब, मित्र आणि आपल्या कर्मचाऱ्यांचे आभार मानू इच्छितो. तुम्ही केलेल्या प्रयत्नांबद्दल धन्यवाद. नागरिकांना माहिती नाही की, या कुटुंबाने किती मेहनत केली आहे. आपल्याकडे जगातील सर्वात मोठा देश आणि अर्थव्यवस्था आहे. आपल्याला महारोगराईचा मोठा फटका बसला. आपण असे काही केले जे वैद्यकीय चमत्कार मानले जाते आणि ते म्हणजे ९ महिन्यांत कोरोनावर लस विकसित केली."

ट्रम्प यांनी पुढे म्हटलं, मी तुमच्यासाठी नेहमीच लढत राहील. मी पाहत राहील, ऐकत राहील. नवीन प्रशासनाला माझ्या शुभेच्छा आणि यश मिळावे अशी माझी इच्छा आहे. मला असे वाटते की, खरोखर काहीतरी चांगले करण्याची त्यांच्याकडे योजना आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा पत्ता

डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊस सोडल्यानंतर आता ते फ्लोरिडा येथील पाम बीच किनाऱ्याजवळील त्यांच्या मार-ए-लागो इस्टेट येथे राहणार आहेत. न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, शेवटच्या दिवशी व्हाईट हाऊसमधून निघालेले ट्रक हे डोनाल्ड ट्रम्प यांच्या पाम बीच येथील मार-ए-लागो निवासस्थानाकडे जाताना दिसले. राष्ट्राअध्यक्ष म्हणून गेल्या चार वर्षांच्या कारकीर्दीत ट्रम्प यांनी मार-ए-लागो येथे बराच काळ घालवला. ज्याला विंटर व्हाईट हाऊस म्हणून देखील ओळखले जाते.

गेली अनेक वर्षे न्यूयॉर्कमध्ये वास्तव्य केलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी १९८५ मध्ये हे घर १ कोटी डॉलर्समध्ये खरेदी केले होते. त्यानंतर एका खासगी क्लबमध्ये त्याचे रूपांतर केले जेल्या गेल्या चार वर्षांत विंटर हाऊस म्हणून ठरले. २० एकर क्षेत्रात पसरलेल्या या इस्टेटमध्ये १२८ खोल्या आहेत. इस्टेट येथून अटलांटिक महासागराचे अद्भूत दृश्य सुद्धा दिसते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी