Agnipath Scheme : अग्निपथ योजना मान्य नसेल, तर सैन्यात भरती होऊ नका! हे काही दुकान किंवा कंपनी नाही; केंद्रीय मंत्र्यांचा इशारा

सैन्यात येण्याचा आग्रह कुणीही केलेला नाही. ज्यांना नवे नियम मान्य नाहीत, त्यांनी सैन्यात येऊ नये, असं मत केंद्रीय मंत्री जनरल व्ही. के. सिंह यांनी व्यक्त केलं आहे.

Agnipath Scheme
अग्निपथ मान्य नसेल तर दूर राहा - व्ही. के. सिंह  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • "अटी मान्य नसतील तर सैन्यात येऊ नका"
  • केंद्रीय मंत्री जनरल व्ही. के. सिंह यांचा आंदोलनकांना इशारा
  • काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींवर टीका

Agnipath Scheme | अग्निपथ योजना मान्य नसेल तर सैन्यात भरती होऊ नका. सैन्यात येण्याची तुम्हाला कुणीही सक्ती केलेली नाही. सैन्यात यावं असा आग्रह कुणालाही सरकारनं केलेला नाही, अशी टीका केंद्रीय मंत्री आणि माजी सैनाप्रमुख व्ही. के. सिंह यांनी केलं आहे. अग्निपथ योजनेविरोधात आंदोलन कऱणाऱ्यांना त्यांनी इशारा दिला असून या योजनेला सुरु असलेला विरोध हा नाहक असल्याचं म्हटलं आहे. सैन्यदलात नोकरी करायची की नाही, हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय आहे. सरकारनं भरती प्रक्रियेची पद्धत बदलली आहे. ती मान्य नसेल तर नोकरी न करण्याचा पर्याय तरुणांसमोर आहेच. सैन्यभरती म्हणजे काही रोजगार हमी योजना नाही. ते कुठलं दुकान नाही किंवा एखादी कंपनी नाही, असं म्हणत त्यांनी विरोधकांना जोरदार टोला लगावला आहे. 

कुणावरही जबरदस्ती नाही

सैन्यात सामील होण्याची सक्ती कुणावरही असू शकत नाही. जर एखाद्याला देशसेवेच्या भावनेनं सैन्यात दाखल व्हायचं असेल तर त्याच्यासाठी नेहमीच सैन्यदलाचे दरवाजे खुले आहेत. मात्र सरकार त्यासाठी कुणालाही जबरदस्ती करू शकत नाही. जर तुम्हाला नव्या योजनेतील अटी मान्य नसतील, तर तुम्हाला सैन्यात येण्याची सक्ती कोण करतंय? असा सवाल जनरल सिंह यांनी केला आहे. 

अधिक वाचा - अग्निपथ : अनेक निर्णय राष्ट्र उभारणीत लाभदायक - पंतप्रधान

प्रियंका गांधींना प्रत्युत्तर

अग्निपथ योजनेवर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींनी जोरदार टीका केली होती. सरकारने ही योजना मागे घ्यावी, अशी मागणी प्रियंका गांधींनी केली आहे. सरकारला जाणीवपूर्वक टार्गेट करण्यासाठी काँग्रेसकडून या योजनेवर टीका करण्यात येत असल्याचा दावा व्ही. के. सिंह यांनी केला आहे. ईडीकडून राहुल गांधींची चौकशी सुरू आहे. या कारणामुळे काँग्रेस संतप्त असून त्याचा बदला घेण्यासाठीच या योजनेवर टीका करण्यात येत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. काँग्रेसकडून याच कारणासाठी अग्निपथ योजनेतील बारीकसारीक दोष काढले जात आहेत, असं त्यांनी म्हटलं आहे. 

अधिक वाचा - अग्निवीरांची भरती: आठवी उत्तीर्णांनाही करता येणार अर्ज

1999 सालची कल्पना

अग्निपथ योजनेची कल्पना ही 1999 साली कारगिल युद्धानंतर समोर आली होती. भारतातील प्रत्येक नागरिकाला सैनिकी प्रशिक्षण दिलं जायला हवं, अशी ती कल्पना होती. गेल्या तीस ते चाळीस वर्षांपासून या संकल्पनेवर विचार सुरू होता. एनसीसीच्या माध्यमातून काही प्रशिक्षण होत होतंच, मात्र तरुणांना सैनिकी प्रशिक्षण दिलं जावं, अशी मागणी वेगवेगळ्या स्तरावरून सातत्याने होत होती. प्रत्येकजण जर प्रशिक्षित झाला तर जगातील सर्वाधिक तरुण असणारा आपला देश हा जगातील बलशाली देश बनेल, यात काहीच शंका नसल्याचं केंद्रीय मंत्री जनरल. व्ही. के. सिंह यांनी म्हटलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी