माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांना कोविड-१९ची लागण, उपचारासाठी एम्समध्ये दाखल

लोकल ते ग्लोबल
Updated Apr 19, 2021 | 20:00 IST | टाइम्स नाऊ मराठी

Manmohan Singh Health News:देशाचे माजी पंतप्रधान आणि कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते डॉ. मनमोहन सिंह यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. उपचारांसाठी डॉ. मनमोहन सिंहांना दिल्लीतील एम्सच्या इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.

Dr. Manmohan Singh gets corona positive, admitted in AIIMS for treatment
डॉ. मनमोहन सिंह यांना कोविड-१९ची लागण, एम्समध्ये झाले दाखल 

थोडं पण कामाचं

  • माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांना कोरोनाचा संसर्ग
  • उपचारासाठी प्रसिद्ध एम्सच्या हॉस्पिटलमध्ये दाखल
  • कोरोनाशी लढण्यासाठी पंतप्रधान मोदींना सुचवले होते पाच उपाय

नवी दिल्ली : भारताचे माजी पंतप्रधान आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. मनमोहन सिंह यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. (Manmohan Singh Health News) डॉ. मनमोहन सिंह कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. त्यामुळे डॉ. मनमोहन सिंहांना उपचारासाठी दिल्लीतील प्रसिद्ध ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस (एआयआयएमएस) म्हणजेच एम्सच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. माजी पंतप्रधानांना कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर ते लवकरात लवकर बरे व्हावेत म्हणून नागरिकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. मनमोहन सिंह यांनी अलीकडेच कोरोना महामारीला तोंड देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाच सूचना केल्या होत्या. एका पत्राद्वारे मनमोहन सिंह यांनी कोरोनाशी लढण्यासाठी पाच उपाय पंतप्रधान मोदींना सुचवले होते. या पत्रात मनमोहन सिंह यांनी कोरोना महामारीशी लढण्यासाठी लसीकरण आणि औषधांचा पुरवठा वाढवणे महत्त्वाचे असल्याचे म्हटले होते.

मनमोहन सिंहांचे मोदींना पत्र


पंतप्रधान मोदींना लिहलेल्या पत्रात डॉ. मनमोहन सिंह यांनी म्हटले होते की लसीकरणाची फक्त एकूण संख्याच पाहायला नको, तर किती टक्के लोकसंख्येचे लसीकरण झाले आहे हेदेखील पाहिले पाहिजे. याशिवाय औषध निर्माण कंपन्यांना अनिवार्य लायसेन्सिंगच्या तरतूदी लागू केल्या पाहिजेत आणि विविध राज्यांमधील लसीकरणासाठी विविध गटातील नागरिकांची वर्गवारी करताना अधिकाधिक नागरिकांपर्यत लसीकरण पोहचेल हे पाहायला हवे, त्यामुळे ४५ वर्षांपेक्षा कमी वयोगटातील नागरिकांदेखील लस घेता येईल, अशीही सूचना मनमोहन सिंह यांनी केली होती. 

हर्षवर्धन यांची टीका


मनमोहन सिंह यांच्यावर टीका करताना केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी आरोप केला होता की जागतिक महामारी असलेल्या कोरोनाची दुसरी लाट येण्यास कॉंग्रेसशासित राज्य सरकारे जबाबदार आहेत. कॉंग्रेसशासित राज्ये नागरिकांच्या लसीकरणाऐवजी त्याच्याविषयी संभ्रम पसरवण्यातच व्यस्त होती. हर्षवर्धन यांनी मनमोहन सिंह यांना ट्विट करताना दिलेल्या पत्रात दावा केला होती की, 'डॉ. मनमोहन सिंहजी, तुमच्या सकारात्मक साहाय्याच्या सूचनेला आणि मूल्यवान सल्ल्याला अशा कठीण प्रसंगी जर तुमच्या कॉंग्रेस नेत्यांनीच ऐकले तर इतिहास तुमचा आभारी राहील.' 

कोरोनावरून आरोप प्रत्यारोप

कोरोना महामारीला आळा घालण्यासाठीच्या उपाययोजना आणि लसीकरण यावरून मागील काही दिवसात बरीच चर्चा होते आहे. अनेक राजकीय पक्ष यावरून एकमेकांवर टीका करत आहेत. भाजप आणि कॉंग्रेसनेदेखील एकमेकांवर आरोप केले आहेत. केंद्र सरकार आणि राज्य सरकारांमध्येही कोरोनाच्या उपाययोजनांसंदर्भात आणि लसीकरणासंदर्भात तणाव निर्माण झालेला पाहायला मिळतो आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभर थैमान घातले असून दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या संख्येने वाढते आहे. त्यामुळे देशातील आरोग्य यंत्रणेसमोर प्रचंड मोठे आव्हान निर्माण झाले आहे. देशभर ऑक्सिजन आणि औषधांचादेखील तुटवडा जाणवतो आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने अलीकडेच रेमडेसिविर इंजेक्शनच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. त्याशिवाय फार्मा कंपन्यांशी चर्चा करून सरकारने रेमडेसिविर इंजेक्शनच्या किंमतीदेखील कमी केल्या आहेत. त्यामुळे आगामी काळात रेमडेसिविरचा पुरवठा सुरळीत होण्याची अपेक्षा आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी