इराकच्या पंतप्रधानांच्या घरावर ड्रोन हल्ला

इराकचे पंतप्रधान (Iraq PM Mustafa al-Kadhimi) मुस्तफा अल कधिमी यांच्या घरावर (अधिकृत सरकारी निवासस्थान) ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न झाला. स्फोटकांनी भरलेले ड्रोन पंतप्रधानांच्या घरावर कोसळवण्यात आले.

Drone attack on Iraq PM House
इराकच्या पंतप्रधानांच्या घरावर ड्रोन हल्ला 
थोडं पण कामाचं
  • इराकच्या पंतप्रधानांच्या घरावर ड्रोन हल्ला
  • हल्ल्यातून इराकचे पंतप्रधान वाचले
  • हल्ल्याचा तपास सुरू

Drone attack on Iraq PM House । बगदाद : इराकचे पंतप्रधान (Iraq PM Mustafa al-Kadhimi) मुस्तफा अल कधिमी यांच्या घरावर (अधिकृत सरकारी निवासस्थान) ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न झाला. स्फोटकांनी भरलेले ड्रोन पंतप्रधानांच्या घरावर कोसळवण्यात आले. या हल्ल्यातून पंतप्रधान वाचले. इराकच्या पंतप्रधानांनी ट्वीट करुन ड्रोन हल्ल्यातून वाचलो असून सुखरुप आहे; असे सांगणारे ट्वीट केले. पंतप्रधानांनी नागरिकांना शांत राहण्याचे आणि संयम राखण्याचे आवाहन केले. 

इराकच्या पंतप्रधानांच्या घरावर झालेल्या ड्रोन हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही देशाने अथवा दहशतवादी संघटनेने घेतलेली नाही. ड्रोन हल्ला कोणी केला याविषयी इराक सरकारने अधिकृरित्या कोणाचेही नाव घेऊन संशय व्यक्त केलेला नाही. हल्ला प्रकरणी तपास सुरू आहे. 

इराकमध्ये १० ऑक्टोबर २०२१ रोजी इराणचे समर्थन करणाऱ्यांनी आधुनिक शस्त्रे हाती घेऊन रस्त्यावर उभे राहून आंदोलन केले होते. हे आंदोलन इराकमधील ग्रीन झोन परिसराच्या जवळ झाले होते. इराकच्या ग्रीन झोन परिसरात पंतप्रधान तसेच मंत्र्यांची सरकारी घरे तसेच अनेक सरकारी कार्यालये आहेत. यामुळे ड्रोन हल्ल्यामागे इराण समर्थकांचा हात असल्याची चर्चा आहे. पण इराक सरकारने अद्याप कोणाचेही नाव घेऊन संशय व्यक्त केलेला नाही. फक्त तपास सुरू असल्याचे सांगितले आहे. यामुळे तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

याआधी २०१९ मध्ये व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो सैनिकांना उद्देशून कराकस येथे सभा घेत होते. यावेळी सभा स्थानावर ड्रोन हल्ला झाला होता. स्फोटकांनी भरलेले ड्रोन कोसळवण्यात आले होते. या हल्ल्यातून व्हेनेझुएलाचे अध्यक्ष वाचले होते. या हल्ल्यात सात सैनिक जखमी झाले होते. ड्रोन हल्ल्यानंतर व्हेनेझुएलामध्ये मोठे अटकसत्र सुरू झाले होते. अध्यक्ष निकोलस मादुरो यांनी कोलंबियावर हल्ल्याचा आरोप केला होता. पण कोलंबियाने हा आरोप फेटाळला होता.

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार आधुनिक स्फोटके कमी वजनाची असली तरी मोठा विनाश करू शकतात. ही स्फोटके ड्रोनवर ठेवून ड्रोन विशिष्ट ठिकाणी पाडणे हे कमी खर्चिक आणि सोपे आहे. या पद्धतीच्या हल्ल्यात हल्लेखोर स्वतःची कमीत कमी हानी होईल अशी काळजी घेऊन विरोधकाचे नुकसान करू शकतो. यामुळेच ड्रोन हल्ल्यांमध्ये वाढ होऊ लागली आहे. 

सौदी अरेबियात तेल कंपनीवर ड्रोनने हल्ला झाला. इस्रायलमध्येही ड्रोन हल्ल्याच्या घटना घडल्या. भारतात पाकिस्तानमधून आलेल्या ड्रोनद्वारे घातपाताचे काही प्रयत्न झाले. भारतीय सुरक्षा पथकांनी यातील अनेक ड्रोन हल्ल्यांचे प्रयत्न परतवून लावले. पण या घटनांमुळे सुरक्षातज्ज्ञ ड्रोनकडे एक वेगळ्या दृष्टीने बघत आहेत.

एकाचवेळी मोठ्या संख्येने ड्रोन विशिष्ट दिशेने, विशिष्ट मार्गाने उडवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा अर्थात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा (Artificial Intelligence - AI) वापर करावा लागेल. टोकियोत ऑलिम्पिकमध्ये मनोरंजनाच्या निमित्ताने १८२४ ड्रोन एकाचवेळी आकाशात उडत होते. या ड्रोननी आकाशात विशिष्ट स्थितीत स्थिरावून ऑलिम्पिकच्या मुख्य मैदानात आकर्षक रोषणाई केली. जर याच पद्धतीने कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करुन एकाचवेळी अनेक ड्रोनच्या मदतीने वेगवेगळ्या ठिकाणांना निश्चित करुन मोठा हवाई हल्ला करता आला तर हे एक नवे आव्हान असेल. अनेक लहान ड्रोन हे कमी उंचीवर उडू शकतात. हे ड्रोन रडारला चकवू शकतात. यावर मार्ग काढण्यासाठी ड्रोन शोधणारे रडारचे जाळे तयार करुन प्रत्येक देशाला स्वतःच्या सुरक्षेची व्यवस्था करावी लागेल. 

छोटे ड्रोन नष्ट करण्यासाठी महागडे क्षेपणास्त्र वापरणे हे अव्यवहारिक आहे. यामुळे अनेकदा ड्रोनवर गोळीबार करण्याचा पर्याय वापरला जातो. पण अनेक ड्रोन एकाचवेळी उडत असतील तर त्यांना झटपट नष्ट करण्यासाठी आकाशात फुटून एकाचवेळी अनेक ड्रोन नष्ट करणारी क्षेपणास्त्र मोठ्या प्रमाणावर विकसित करावी लागतील. लढाऊ विमानांपेक्षा ड्रोन हे मोठे आव्हान ठरू शकते. कारण ड्रोन नष्ट झाला तरी ते हाताळणारी यंत्रणा आणि त्या यंत्रणेला नियंत्रित करणारी माणसं सुरक्षित असतात. स्वतःची जीवितहानी टाळून शत्रुच्या देशात जीवितहानी आणि वित्तहानी करण्यासाठी ड्रोन हा विमानांच्या तुलनेत व्यावहारिक आणि प्रभावी पर्याय आहे. यामुळे ड्रोनने सुरक्षा यंत्रणेसमोर नवे प्रश्न उभे केले आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी