Droupadi Murmu : द्रौपदी मुर्मू सोमवारी राष्ट्रपतीपदाची शपथ घेणार, मुर्मू यांचा दिवसभराचा कार्यक्रम

Droupadi Murmu : द्रौपदी मुर्मू भारताच्या राष्ट्रपती म्हणून सोमवार २५ जुलै २०२२ रोजी शपथ घेणार आहेत. शपथ घेताच द्रौपदी मुर्मू देशातील सर्वोच्च घटनात्मक पदाची जबाबदारी सांभाळण्यास सुरुवात करतील.

Droupadi Murmu
द्रौपदी मुर्मू सोमवारी राष्ट्रपतीपदाची शपथ घेणार  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
 • द्रौपदी मुर्मू सोमवारी राष्ट्रपतीपदाची शपथ घेणार
 • शपथ घेताच सर्वोच्च घटनात्मक पदाची जबाबदारी सांभाळण्यास सुरुवात करतील
 • मुर्मू यांचा दिवसभराचा कार्यक्रम

Droupadi Murmu : द्रौपदी मुर्मू भारताच्या राष्ट्रपती म्हणून सोमवार २५ जुलै २०२२ रोजी शपथ घेणार आहेत. शपथ घेताच द्रौपदी मुर्मू देशातील सर्वोच्च घटनात्मक पदाची जबाबदारी सांभाळण्यास सुरुवात करतील. शपथविधी सोमवारी सकाळी दहा वाजता संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात (सेंट्रल हॉल) येथे होणार आहे. सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा हे द्रौपदी मुर्मू यांना शपथ देतील. द्रौपदी मुर्मू यांना शपथ घेतल्यानंतर २१ तोफांची सलामी दिली जाईल. यानंतर द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती म्हणून त्यांचे पहिले भाषण करतील. 

भारताचे राष्ट्रपती

द्रौपदी मुर्मू यांचा सोमवार २५ जुलै २०२२ रोजीचा दिवसभराचा कार्यक्रम

 1. दिल्लीतील हंगामी निवासस्थान उमा शंकर दीक्षित लेन येथून सकाळी ८.१५ वाजता राजघाटाच्या दिशेने निघणार
 2. सकाळी ८.३० वाजता राजघाटावर
 3. सकाळी ८.४० वाजता घरी परतणार
 4. सकाळी ९.२२ वाजता राष्ट्रपती भवन येथे पोहचणार
 5. पाऊस पडला नाही तर सकाळी ९.४२ वाजता राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात समारोह, पाऊस झाला तर प्रांगणातील कार्यक्रम रद्द करणार
 6. द्रौपदी मुर्मू यांना घेऊन राष्ट्रपतींचा ताफा सकाळी ९.५० वाजता राष्ट्रपती भवन पहिला औपचारिक प्रवास सुरू करेल
 7. सकाळी १० वाजता द्रौपदी मुर्मू संसद भवन गेट क्रमांक ५ येथे पोहोचणार
 8. पंतप्रधान, लोकसभाध्यक्ष, राज्यसभेचे सभापती द्रौपदी मुर्मू यांना संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात (सेंट्रल हॉल) घेऊन येणार
 9. द्रौपदी मुर्मू संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात (सेंट्रल हॉल) येताच राष्ट्रगीत
 10. शपथ ग्रहण सोहळा सकाळी १०.१५ वाजता सुरू होणार, सरन्यायाधीश शपथ देणार
 11. शपथ घेतल्यानंतर द्रौपदी मुर्मू रजिस्टरमध्ये सही करणार
 12. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सकाळी १०.२३ वाजता मध्यवर्ती सभागृहात (सेंट्रल हॉल) उपस्थित असलेल्यांसमोर राष्ट्रपती म्हणून पहिले भाषण करतील
 13. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा ताफा सकाळी १०.५७ वाजता राष्ट्रपती भवन येथे परतणार
 14. शपथ ग्रहण सोहळ्याआधी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि निवडणूक जिंकलेल्या द्रौपदी मुर्मू संसदेत येणार. उपराष्ट्रपती आणि राज्यसभा सभापती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्री, राज्यपाल, मुख्यमंत्री, राजदूत, संसद सदस्य, सरकारचे प्रमुख प्रशासकीय अधिकारी, सैन्याच्या तिन्ही दलांचे प्रमुख यांना भेटणार. शपथ सोहळा झाल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद राष्ट्रपती भवन येथे पोहोचणार. राष्ट्रपतींच्या सुरक्षा रक्षकांचा ताफा नव्या राष्ट्रपतींना 'गार्ड ऑफ ऑनर' देणार आणि माजी राष्ट्रपतींना राजशिष्टाचारानुसार निरोप दिला जाणार. 

द्रौपदी मुर्मू २५ जुलै रोजी शपथ घेणाऱ्या दहाव्या राष्ट्रपती

द्रौपदी मुर्मू या २५ जुलै रोजी शपथ घेणाऱ्या भारताच्या दहाव्या राष्ट्रपती होणार आहेत. भारतात १९७७ पासून नव्या राष्ट्रपतींनी २५ जुलै रोजी शपथ घेण्याची परंपरा निर्माण झाली आहे. याआधी राजेंद्र प्रसाद यांनी भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून २६ जानेवारी १९५० रोजी शपथ घेतली. भारतात राष्ट्रपतीपदासाठी १९५२ मध्ये पहिल्यांदा निवडणूक झाली आणि ही निवडणूक जिंकल्यानंतर राजेंद्र प्रसाद हे मे १९६२ पर्यंत भारताचे राष्ट्रपती होते. 

सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी १३ मे १९६२ रोजी राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली आणि ते १३ मे १९६७ पर्यंत राष्ट्रपती होते. झाकिर हुसेन आणि फखरुद्दीन अली अहमद हे दोन राष्ट्रपती त्यांचा कार्यकाळ पूर्ण करू शकले नाही कारण त्यांचे पदावर असताना निधन झाले. भारताचे सहावे राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी यांनी २५ जुलै १९७७ रोजी शपथ घेतली, तेव्हापासून २५ जुलै रोजी नव्या राष्ट्रपतींना शपथ देण्याची परंपरा निर्माण झाली. 

ज्ञानी झैलसिंह, आर. वेंकटरमण, शंकरदयाळ शर्मा, के.आर. नारायणन, ए.पी.जे. अब्दुल कलाम, प्रतिभा पाटील, प्रणब मुखर्जी आणि रामनाथ कोविंद यांनी २५ जुलै रोजी राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली. 

सर्वात लहान वयाच्या राष्ट्रपती

द्रौपदी मुर्मू या भारतातील सर्वात लहान वयाच्या राष्ट्रपती आहेत. मुर्मू यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विरोधकांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचा पराभव केला. मुर्मू यांना ६४ टक्के मतमूल्य मिळाले. त्यांनी मोठ्या फरकाने निवडणूक जिंकली. द्रौपदी मुर्मू या भारताच्या पंधराव्या राष्ट्रपती म्हणून सोमवार २५ जुलै २०२२ रोजी शपथ घेणार आहेत. द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत ६ लाख ७६ हजार ८०३ मतमूल्य मिळाले तर यशवंत सिन्हा यांना ३ लाख ८० हजार १७७ मतमूल्य मिळाले. निवडणूक जिंकून देशातील सर्वात लहान वयाच्या राष्ट्रपती आणि देशाच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती होण्याचा मान द्रौपदी मुर्मू यांना मिळाला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी