Ancient Statues : दुष्काळामुळे झालं बुद्धदर्शन! नदीखाली सापडल्या सहा शतकांपूर्वीच्या बुद्धांच्या मूर्ती

चीनमध्ये नैऋत्य भागात भीषण दुष्काळ पडला आहे. इथल्या एका नदीपात्रातील पाणी पूर्ण सुकल्यामुळे तिथं उत्खनन करत असताना गौतम बुद्धांच्या तीन मूर्ती आढळून आल्या आहेत.

Ancient Statues
दुष्काळामुळे झालं बुद्धदर्शन  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • चीनमध्ये सापडल्या प्राचीन बुद्धांच्या मूर्ती
  • दुष्काळ पडल्यामुळे नदीपात्रात सापडल्या मूर्ती
  • चीनला बुद्धांच्या तत्त्वज्ञानाची मोठी परंपरा

Ancient Statues : चीनच्या (China) काही भागात यंदा भयानक दुष्काळ (Drought) पडला आहे. अद्यापही पाऊस झाला नसल्यामुळे नद्या, नाले आटले असून सर्वत्र अन्नधान्याची टंचाई (Food Scarcity) निर्माण होण्याची शक्यता आहे. वाढतं तापमान आणि दुष्काळ यामुळे चीनमधील यांग्त्जे नदीची पातळी खालावली असून अनेक ठिकाणी नदीचं पात्र अक्षरशः कोरडं पडलं आहे. चीनमधील चोंगकिंग नावाच्या शहरालगत असणाऱ्या नदीपात्रात गौतम बुद्धांच्या तीन (Buddhist Statues) पुरातन मूर्ती आढळून आल्या आहेत. या मूर्ती सुमारे 600 वर्षांपूर्वीच्या असल्याची माहिती समोर आली आहे. दुष्काळात नदीपात्र कोरडं पडल्यामुळे या ठिकाणी उत्खनन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यावेळी नदीपात्रात काही पुरातन मूर्ती असल्याची चाहूल लागली होती. त्यानंतर उत्खनन प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आणि बुद्धाच्या मूर्ती बाहेर काढण्यात आल्या. 

काय आहे इतिहास

चीनवर गौतम बुद्धांच्या तत्त्वज्ञानाचा गाढा प्रभाव आहे. त्यामुळे चीनमध्ये ठिकठिकाणी बुद्धांच्या मूर्ती दिसून येतात. वर्षानुवर्षांच्या परंपरेनुसार जागोजागी अशा मूर्ती तयार करण्यात येत होत्या. त्यापैकी सध्या आढळून आलेल्या मूर्ती मिंग आणि किंग राजसत्तेच्या काळातील असल्याची माहिती पुरातत्व संशोधकांनी दिली आहे. सापडलेल्या मूर्तींपैकी एका मूर्तीत गौतम बुद्ध हे कमळाच्या फुलावर बसल्याचं साकारण्यात आलं आहे. भयंकर दुष्काळामुळे सध्या चीनमधील अनेक नद्या आटून गेल्या आहेत. 

अधिक वाचा - चंडीगढला निघालेली Sonali Phogat गोव्याला कशी पोहोचली? स्वीय सहाय्यकाने केला घात? 

चीन आणि गौतम बुद्ध

गौतम बुद्धांच्या तत्त्वज्ञानाचा ज्या ज्या आशियायी देशांवर प्रभाव आहे, त्यापैकी चीन हा एक प्रमुख देश. गेल्या कित्येक शतकांपासून गौतम बुद्धांच्या विचारांचा आणि शिकवणुकीचा पगडा चिनी संस्कृतीवर आहे. गौतम बुद्धांचे तत्वज्ञान हाच खरं तर चीनच्या निर्मितीतील एक प्रमुख ड्रायव्हिंग फोर्स असल्याचं इतिहासात नोंदवलं गेलं आहे. सध्याचं चीनमधील सरकार बुद्धांच्या तत्त्वज्ञानाचा किती विचार करतं, हा वेगळा प्रश्न असला तरी सामान्यतः सर्वसामान्यांच्या आयुष्यात गौतम बुद्धांच्या तत्वज्ञानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. 

अधिक वाचा - Heart Attack : खेळताना ह्रदयविकाराचा झटका आल्याने तरुण व्यावसायिकाचा मृत्यू

नैऋत्य चीनमध्ये दुष्काळ

नैऋत्य चीनमध्ये सध्या दुष्काळाने थैमान घातले आहे. त्यात या भागातील तापमानात गेल्या काही वर्षांपासून सातत्याने वाढ होत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे ठिकठिकाणचे जलाशय आटत चालले आहेत. त्याचा जीवसृष्टीवर परिणाम होत आहे. या भागातील अनेक पक्ष्यांनी स्थलांतर केलं असून त्यातील काही प्रजाती परतच येत नसल्याचा अनुभव गेल्या काही वर्षातील निरीक्षणातून नोंदवला जात आहे. जुलै महिन्यातनंतर आतापर्यंत या भागात सरासरीच्या केवळ 45 टक्के पाऊस पडला आहे. पुढील काही महिने पाऊस पडला, तर या वर्षापुरतं दुष्काळाचं संकट दूर होऊ शकतं, मात्र जोरदार पावसाची कुठलीही लक्षणं सध्या तरी दिसत नसल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. पुढील एक ते दोन आठवडे तापमान चढंच राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी