tremors felt in parts of Bihar : उत्तर भारतातील बिहार या राज्याच्या अनेक जिल्ह्यांना आज (रविवार ३१ जुलै २०२२) सकाळी ७.५८ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता ५.५ रिश्टर स्केल होती. भूकंपाचे केंद्र नेपाळची राजधीनी असलेल्या काठमांडूपासून १४७ किमी अंतरावर होते.
बिहार हे राज्य नेपाळच्या सीमेलगत आहे. याच कारणामुळे नेपाळमध्ये भूकंप झाला त्यावेळी बिहारच्या काही जिल्ह्यांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. बिहारची राजधानी पाटणा तसेच सहरसा, पूर्णिया, मधेपुरा, कटिहार, अररिया, दरभंगा, मधुबनी, सीतामढी, मोतिहारीसह अनेक जिल्ह्यांमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या भूकंपामुळे बिहारमध्ये जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. काही ठिकाणी नागरिकांना भूकंप झाला याची माहिती बातम्यांच्या माध्यमातून मिळाली. त्यांना भूकंप जाणवला नाही. तर काही भागांमध्ये भूकंपाची जाणीव नागरिकांना झाली. ज्या भागांमध्ये भूकंप झाल्याची जाणीव झाली त्या भागांमध्ये नागरिक भूकंप जाणवू लागताच घराबाहेर रस्त्यांवर आले. भूकंपानंतर सर्व काही स्थिरस्थावर याची खात्री पटल्यानंतरच नागरिक पुन्हा घरात गेले.
बिहारच्या अनेक भागांमध्ये शनिवार ३० जुलै २०२२ पासून पावसाचा जोर वाढला आहे. नद्यांच्या पाण्याची पातळी वाढू लागली आहे. या अशा वातावरणात भूकंप झाल्यामुळे प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली.
जगातील कोणत्याही संस्थेला खात्रीने विशिष्ट भागात विशिष्ट दिवशी विशिष्ट क्षमतेचा भूकंप येईल असा ठाम अंदाज व्यक्त करणे शक्य झालेले नाही. पावसाप्रमाणे भूकंपाविषयी विश्वासार्ह अंदाज व्यक्त करणे कठीण आहे.