Food order in Train Journey : रेल्वे प्रवासात आपल्या आवडीचे पदार्थ ऑर्डर करण्याची सोपी पद्धत, एका क्लिकवर मिळेल मनपसंत मेन्यू

रेल्वे प्रवासात आपल्या आवडीचे, ताजे, गरमागरम पदार्थ खावेत असं अनेकांना वाटतं. त्या सर्वांसाठी हे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरलं आहे. एका क्लिकवर तुम्ही मनपसंत पदार्थ ऑर्डर करू शकता.

Food order in Train Journey
रेल्वे प्रवासात आपल्या आवडीचे पदार्थ ऑर्डर करण्याची सोपी पद्धत  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • रेल्वे प्रवासात ऑर्डर करा मनपसंत खाद्यपदार्थ
  • एका क्लिकवर तुमच्या सीटवर येईल ऑर्डर
  • प्रवाशांना आवडीचे आणि गरमागरम पदार्थ मिळणार

Food order in Train Journey | भारतात दररोज लाखो प्रवासी रेल्वेनं प्रवास करत असतात. विशेषतः लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी रेल्वेची निवड केली जाते. परवडणारा आणि सुखाचा प्रवास असल्यामुळे इतर कुठल्याही पर्यायाअगोदर रेल्वेचीच निवड सामान्य नागरिकांकडून केली जाते. जर रेल्वेचं बुकिंग मिळालं नाही, तरच नाईलाजाने इतर पर्यायांचा विचार केला जातो. त्यामुळे बहुतांश वेळा लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांचं बुकिंग कित्येक दिवस आधीच फुल्ल झालेलं पाहायला मिळतं. 

रेल्वेत मिळतं जेवण

बहुतांश लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांमध्ये जेवणाची सुविधा असते. प्रत्येक ट्रेनमध्ये एक पँट्री कार असते. तिथून सर्व प्रवाशांना जेवण पुरवलं जातं. राजधानी एक्सप्रेससारख्या काही रेल्वेगाड्यांमध्ये तर मोफत जेवणाची सुविधा पुरवण्यात येते. गेल्या काही वर्षात रेल्वेत मिळणाऱ्या जेवणाचा दर्जा सुधारला असून काहींना रेल्वेचं जेवणच प्रवासात करण्याची इच्छा असते. तर काहींना रेल्वेत मिळणारं जेवण आवडत नाही. त्यामुळे ते घरूनच आपल्या जेवणाचा डबा घेऊन येतात आणि प्रवासात भूक लागली की तो खातात. मात्र असेही अनेक प्रवासी असतात ज्यांना रेल्वेत गरमागरम पदार्थ खाण्याची इच्छा असते. रेल्वेच्या प्रवासाचा आनंद लुटत ताजे आणि आवडीचे पदार्थ खाण्याचाही आनंद लुटावा, अशी अनेकांची इच्छा असते. अशा प्रवाशांसाठी आता त्यांच्या आवडीचे पदार्थ ऑर्डर करणं सहज शक्य आहे. 

तिकीट असेल तर करता येईल ऑर्डर

आपल्या आवडीचे पदार्थ ऑर्डर करण्यासाठी तुमच्याकडे कन्फर्म किंवा वेटिंगचे तिकीट असणं अत्यावश्यक आहे. IRCTC च्या E Catering या ऑप्शनवर जाऊन तुम्ही मेन्यू कार्ड पाहू शकता. तुम्हाला ज्या स्टेशनवर हे पदार्थ मिळावेत, असं वाटतं, त्या स्टेशनचा पर्याय तुम्ही निवडू शकता. त्या स्टेशनवर तुम्हाला तुम्ही ऑर्डर केलेला पदार्थ तुमच्या जागेवर पोहोच केला जातो. यासाठी तुम्ही ऑनलाईन पेमेंट करू शकता किंवा कॅश ऑन डिलिव्हरीचा पर्यायही निवडू शकता. 

अधिक वाचा - IAS Success Story: आधी आयपीएस झाली मात्र पुन्हा दिली परीक्षा, नम्रता जैन झाली आयएएस...एका टॉपरची कहाणी

अशी करा ऑर्डर

  • IRCTC च्या वेबसाईटवर ई-कॅटरिंग या पर्यायात जा.
  • कॅश ऑन डिलिव्हरी किंवा ऑनलाईन पेमेंट यापैकी कुठलाही पर्याय निवडा. 
  • ही सेवा सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत सुरु असते.
  • मेन्यू कार्डमधील तुमचा आवडता पदार्थ ऑर्डर करा आणि कार्टमध्ये ॲड करा आणि पैसे भरा.
  • तुम्हाला एक डिलिव्हरी कोड दिला जाईल. हा कोड तुम्हाला फूड डिलिव्हरी करणाऱ्या व्यक्तीसोबत शेअर करावा लागेल.
  • जर काही कारणाने तुमची ऑर्डर डिलिव्हर होऊ शकली नाही, तर तुमचे पैसे तुमच्या खात्यात परत येतील. अनेकदा तुम्ही निवडलेलं स्टेशन येईपर्यंत ऑर्डर तयार होत नाही. अशा वेळी चिंता करण्याची गरज नाही. तुम्ही पुढच्या स्टेशनचा पर्याय निवडू शकता आणि पुन्हा त्याच पद्धतीने ऑर्डर करू शकता.
  • ई-कॅटरिंग वेबसाईट, फूड ऑन ट्रॅक मोबाईल ॲप आणि 1323 कॉलिंग सर्व्हिस या तीन पर्यायांपैकी कुठल्याही एकाची निवड करून तुम्ही आवडीचे पदार्थ ऑर्डर करू शकता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी