ED Summons Rahul Sonia | ईडीकडून राहुल, सोनिया गांधीना समन्स; पुन्हा उघडली National Heraldची फाईल

ED Summons Rahul, Sonia in National Herald Case । 2015 साली बंद करण्यात आलेली नॅशनल हेराल्ड प्रकरणाची फाईल आता ईडीने पुन्हा उघडली असून या प्रकरणी काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्ष सोनिया गांधी आणि नेते राहुल गांधी यांना समन्स बजावले आहे.

ED Summons Rahul, Sonia in National Herald Case
'नॅशनल हेराल्ड'प्रकरणी सोनिया, राहुल गांधीना समन्स  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • ईडीकडून सोनिया आणि राहुल गांधींना समन्स
  • बंद झालेली फाईल पुन्हा उघडणार
  • हा तर तपास यंत्रणांचा गैरवापर - काँग्रेसचा आरोप

नवी दिल्ली : सक्तवसुली संचालनालयाने (ED) नॅशनल हेराल्ड प्रकरणात (National Herald Case) काँग्रेसच्या (Congress) अंतरिम अध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि काँग्रेस नेेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना समन्स (Summon) बजावलं आहे. विशेष म्हणजे ईडीचे या प्रकरणाचा तपास 2015 साली बंद करण्याचा निर्णय घेतला होता. आता पुन्हा एकदा जुन्या फाईल्स उघडण्यात आल्या आहेत.

काँग्रेसचा पलटवार

नॅशनल हेराल्ड प्रकरणाचे निमित्त करून काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्यांना विनाकारण त्रास देण्यात येत असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी केला आहे. ज्या प्रकरणात काहीही तथ्य न आढळल्यामुळे ते 2015 साली बंद करण्यात आले होते. आता पुन्हा जाणीवपूर्वक आणि राजकीय सूडबुद्धीने ते बाहेर काढण्यात येत असून अशा प्रकारांना काँग्रेस घाबरणार नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. या प्रकरणी ईडीला सर्व सहकार्य करणार असून त्यांना हवी असणारी माहिती उपलब्ध करून दिली जाईल, अशी माहिती सिंघवी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. 

काय आहे नॅशनल हेराल्ड प्रकरण?

नॅशनल हेराल्ड हे वृत्तपत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सुरू केले होते. भारताच्या स्वातंत्र्यलढ्याशी संलग्न असणारे हे वृत्तपत्र 2008 सालापर्यंत काँग्रेसशी संलग्न होते. 1 एप्रिल 2008 साली हे वृत्तपत्र तात्पुरते बंद करण्यात येत असल्याची घोषणा करण्यात आली. 2009 मध्ये हे वृत्तपत्र कायमचे बंद करण्यात येत असल्याची घोषणा काँग्रेसच्या तत्कालीन अध्यक्ष सोनिया गांधींनी केली 

व्यवहाराबाबत संशय

भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी नॅशनल हेराल्ड प्रकरणात आर्थिक फेरफार झाल्याची तक्रार केली होती. या वृत्तपत्राची मालकी असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड (एजेएल) या संस्थेकडे होती. या संस्थेकडून यंग इंडिया लिमिटेड या संस्थेने वृत्तपत्राचा ताबा घेतला. या संस्थेत सोनिया गांधी व राहुल गांधी यांची प्रत्येकी 38 टक्के मालकी आहे. या व्यवहार 90 कोटी रुपयांना झाला. वास्तविक, हजारो कोटींची मालमत्ता असलेल्या या वृतपत्राचा व्यवहार केवळ 90 कोटीत झाल्याला आक्षेप घेत सुब्रमण्यम स्वामी यांनी न्यायालयात धाव घेतली होती. 

हा होता आक्षेप

ऑल इंडिया काँग्रेस कमिटीनं नॅशनल हेराल्डची मालकी असणाऱ्या एजेएल संस्थेला 90 कोटी रुपयांचं कर्ज दिलं. त्यानंतर मालकी हस्तांतरित करताना यंग इंडिया लिमिटेड या कंपनीच्या नावे त्यातील 50 लाख रुपये कर्ज हस्तांतरित करण्यात आलं. कर चुकवण्यासाठी हा आर्थिक व्यवहार करण्यात आल्याचा आरोप भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केला होता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी