Corona Update : राज्यात 15 जूनला शाळा सुरु होणार, पण...! शिक्षणमंत्र्यांच्या विधानानंतर चर्चेला सुरुवात

राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर ठरलेल्या वेळेत राज्यातील शाळा सुरू होणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. याचं उत्तर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलं आहे.

Corona Updates about Schools
राज्यातील शाळा वेळेत सुरू होणार? 
थोडं पण कामाचं
  • महाराष्ट्रात 15 जून रोजी शाळा सुरू होणार पण कोरोनाचे निर्बंध पाळून
  • आरोग्य विभागाशी चर्चा करूनच शाळा सुरू होण्याबाबत निर्णय
  • शाळांसाठी नवी एसओपी (कार्यपद्दती) जाहीर करणार

Corona Update | महाराष्ट्रात (Maharashtra) पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या (Corona Patients) संख्येत वाढ होऊ लागली आहे. उन्हाळ्याची सुट्टी (Summer Holiday) संपून पुढच्या आठवड्यापासून शाळा सुरू होणार आहेत. मात्र त्या सुरू होण्यापूर्वीच कोरोना रुग्णसंख्येत वाढ होऊ लागल्यामुळे ठरलेल्या वेळेत शाळा सुरू होणार की नियोजनात काही बदल होणार, असा प्रश्न पडला आहे. या प्रश्नाचं उत्तर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलं आहे. ठरल्याप्रमाणे राज्यातील शाळा 15 जून रोजी सुरू होतील, मात्र कोरोनाचे सर्व निर्बंध पाळूनच शाळा सुरू राहतील, असं संकेत शिक्षणमंत्र्यांनी दिले आहेत. 

काय म्हणाल्या शिक्षणमंत्री?

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे शाळा ठरलेल्या वेळेत सुरू होणार असल्या तरी आम्ही आरोग्य विभागाचा सल्ला घेणार आहोत, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी माध्यमांना दिली आहे. कोरोना आटोक्यात आल्यानंतर ज्यावेळी शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, त्यावेळी एक एसओपी (स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर) तयार करण्यात आली होती. यावेळीदेखील तशीच एसओपी म्हणजेच कार्यपद्धती निश्चित केली जाणार आहे. त्यातील निकषांचा आणि नियमांचा आधार घेऊन शाळा सुरु ठेवता येऊ शकतील. मात्र अगोदर चर्चा केली जाईल आणि त्यानंतर शाळांबाबतचा निर्णय जाहीर केला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली आहे. 

मास्कची सक्ती नाही

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी मास्कबाबत कुठलीही सक्ती नसेल, असं शिक्षणमंत्री गायकवाड यांनी म्हटलं आहे. शाळेत मास्क वापरण्याचा सल्ला देण्यात येईल, मात्र सध्या तरी ही बाब बंधनकारक नसेल, असे संकेत त्यांनी दिले आहेत. रविवारी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीदेखील असेच संकेत देत नागरिकांना स्वयंप्रेरणेनं मास्क वापरण्याचं आवाहन केलं होतं.  

विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान नको

कुठल्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची काळजी घेतली जाईल, असं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे. गेल्या दोन वर्षांत कोरोनामुळे शाळा बंद होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. हे नुकसान भरून काढण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून अधिक नुकसान होऊ नये, या दृष्टीनेच धोरण आखलं जाईल, असं शिक्षणमंत्री गायकवाड यांनी म्हटलं आहे. विद्यार्थ्यांचं नुकसान टाळण्यासाठी सर्वतोपरी काळजी घेऊन शाळा सुरू करणं ही आपणा सर्वांची जबाबदारी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 

अधिक वाचा - Remarks On Prophet: प्रेषितप्रकरणी अरब देशांत पडसाद; नूपुर शर्मा आणि नवीन जिंदलवर कारवाईनंतरही वाद सुरुच, मुस्लिम संघटनांची अटकेची मागणी

राज्यात वाढतेय कोरोनाची रुग्णसंख्या

महाराष्ट्रात गेल्या चार दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ नोंदवली जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून कोरोना रुग्णांचा दैनंदिन आकडा हा एक हजाराच्या खाली नोंदवला जात होता. मात्र गेल्या चार दिवसांपासून चार आकडी रुग्णसंख्या नोंदवली जात असून सातत्याने एक हजारपेक्षा अधिक रुग्ण आढळत आहेत. शनिवारी हा आकडा 1300 च्याही वर नोंदवला गेला होता. 

अधिक वाचा - Khelo India : खेलो इंडिया युथ गेम्स मध्ये फडकला महाराष्ट्राचा झेंडा, तिसऱ्या दिवशी पटकावले ९ सुवर्ण पदके

राज्य सरकार ‘अलर्ट’ मोडवर

राज्यातील रुग्णसंख्येत वाढ होऊ लागल्यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. राज्यात मास्कची सक्ती करण्यात आली नसली तरी गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. विशेषतः राज्याच्या शहरी भागात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. मुंबई, ठाणे, पुणे आणि पालघर भागात सध्या सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. या पार्श्वभूमीवर रेल्वे, बस, कार्यालये आणि इतर गर्दीच्या ठिकाणी मास्क लावण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. कोरोना रुग्णसंख्येतील वाढ अशीच सुरु राहिली, तर शाळा सुरु करण्याच्या निर्णयावर त्याचा परिणाम होईल की काय, याची साशंकता निर्माण झाली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी