Egypt Sun Temple: इजिप्तची राजधानी कैरोपासून दक्षिण दिशेला अबुसीर येथे राजा नुसेरेच्या मंदिराखाली साडेचार हजार वर्षांपूर्वीच्या सूर्यमंदिराचे अवशेष आढळले. वाळवंटात येणाऱ्या धुळीच्या वादळांमुळे वाळूत गाडल्या गेलेल्या आणि अनेक वर्षांपासून गायब असलेल्या चार प्राचीन मंदिरांपैकी एक हेच सूर्यमंदिर असावे अशी शक्यता व्यक्त होत आहे. इजिप्तचे तज्ज्ञ मंदिराच्या अवशेषांचा अभ्यास करत आहेत. आतापर्यंतच्या अभ्यासातून त्यांनी अवशेष साडेचार हजार वर्षांपूर्वीच्या सूर्यमंदिराचे असल्याचे सांगितले. । मंदिर
अवशेष एका मातीच्या विटांपासून तयार केलेल्या सूर्यमंदिराचे आहेत. हे मंदिर अबू सरच्या उत्तरेला अबू घोराब येथे राजा नुसेरेच्या मंदिराखाली आढळले. राजा नुसेरेच्या मंदिराचा अभ्यास करत असलेल्या तज्ज्ञांनी मंदिर परिसरात उत्खनन केले त्यावेळी साडेचार हजार वर्षांपूर्वीच्या सूर्यमंदिराचे अवशेष आढळले. इटली आणि पोलंडचे तज्ज्ञ संयुक्तपणे अवशेषांचा अभ्यास करत आहेत.
इजिप्तवर पाचव्या राजवंशाने ईसवी सन पूर्व २४६५ ते ईसवी सन पूर्व २३२३ दरम्यान राज्य केले. या काळात मातीच्या वीटांचा वापर करून चार सूर्यमंदिरांची निर्मिती करण्यात आली. यातल्याच एका मंदिराची मोडतोड करून पुढे त्या जागेवर इजिप्तवर राज्य करणाऱ्या पाचव्या राजवंशातील सहाव्या राजाने स्वतःचे मंदिर बांधले.
मंदिराचे अवशेष तपासताना तज्ज्ञांना मातीच्या वीटा तसेच त्यावेळच्या राजांचे चित्र उमटविलेल्या निवडक मातीच्या वीटा पण सापडल्या आहेत. मंदिरात विशिष्ट ठिकाणी राजाचे चित्र कोरलेल्या वीटा वापरल्या असाव्यात असा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. मंदिरात वापरली जाणारी मोजकी भांडी पण सापडली आहेत. उत्खननाचे काम अद्याप सुरू आहे.
इजिप्तमध्ये किमान सात सूर्यमंदिरं होती असं सांगतात. यापैकी एक सूर्यमंदिर १९व्या शतकात सापडले. यानंतर थेट २१व्या शतकात दुसऱ्या सूर्यमंदिराविषयी माहिती मिळण्यास सुरुवात झाली आहे.