राज्यसभेच्या १८ जागांसाठी १९ जूनला निवडणूक

लोकल ते ग्लोबल
Updated Jun 01, 2020 | 19:34 IST | टाइम्स नाऊ मराठी

राज्यसभेच्या १८ जागांसाठी १९ जून रोजी निवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाने ही घोषणा केली आहे. कोरोना संकटामुळे ही निवडणूक रखडली होती.

rajyasabha
राज्यसभा 

थोडं पण कामाचं

  • राज्यसभेच्या १८ जागांसाठी १९ जूनला निवडणूक
  • गुजरात, आंध्र, राजस्थान, मध्य प्रदेश, झारखंड, मणिपूर आणि मेघालयमध्ये निवडणूक
  • ३७ जागांवर बिनविरोध निवड

नवी दिल्ली: राज्यसभेच्या १८ जागांसाठी १९ जून रोजी निवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाने ही घोषणा केली आहे. कोरोना संकटामुळे ही निवडणूक रखडली होती. आधी ही निवडणूक २६ मार्चला होणार होती. मात्र लॉकडाऊन जाहीर झाल्यामुळे निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय झाला होता. 

'लॉकडाऊन' शिथील होताच जाहीर झाली निवडणूक

केंद्र सरकारने १ जूनपासून देशात 'अनलॉक-१' जाहीर केले आणि 'लॉकडाऊन'चे अनेक नियम शिथील केले आहेत. 'कंटेनमेंट झोन'मध्ये सर्वाधिक बंधनं आहेत. त्यापेक्षा कमी बंधनं 'रेड झोन'मध्ये आहेत. इतर झोनची अनेक बंधनं शिथील करण्यात आली आहेत. 'लॉकडाऊन' शिथील झाल्यामुळे निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. राज्यसभेची निवडणूक जाहीर झाल्यामुळे टप्प्याटप्प्याने देशातील अनेक रखडलेल्या निवडणुकांचे कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. 

राज्यसभेच्या १८ जागांसाठी निवडणूक, ३७ जागांवर बिनविरोध निवड

राज्यसभेच्या ५५ जागांसाठी निवडणुकीची प्रक्रिया सुरू होती. अर्ज मागे घेण्याची मुदत १८ मार्चला संपली. मुदत संपली त्यावेळी ५५ पैकी ३७ जागांसाठी प्रत्येकी १ उमेदवारी अर्ज आला होता तर १८ जागांसाठी एकापेक्षा जास्त उमेदवारी अर्ज आले होते. निवडणूक आयोगाने अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर ३७ जागांसाठी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले आणि १८ जागांसाठी निवडणूक जाहीर केली. ही निवडणूक २६ मार्चला होणार होती पण आता ही निवडणूक १८ जून रोजी होणार आहे. 

गुजरात, आंध्र, राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये राज्यसभेची निवडणूक

राज्यसभेच्या गुजरात आणि आंध्र प्रदेशमधील प्रत्येकी ४, राजस्थान आणि मध्य प्रदेशमधील प्रत्येकी ३, झारखंडमधील २, मणिपूर आणि मेघालयमधील प्रत्येकी एका जागेसाठी १९ जून रोजी मतदान होणार आहे. 

महाराष्ट्रात बिनविरोध झालेली राज्यसभेची निवडणूक

महाराष्ट्रातील सात जागांसाठी राज्यसभेची निवडणूक होणार होती. मात्र सर्व सात जागांसाठी प्रत्येकी एक उमेदवारी अर्ज आल्यामुळे राज्यातील सर्व जागांवर बिनविरोध निवड झाली. निवडणूक आयोगाने ही घोषणा उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर जाहीर केली. त्यामुळे 'लॉकडाऊन' जाहीर होण्याआधीच महाराष्ट्रातील राज्यसभेच्या निवडणुकीचा 'सस्पेंस' संपला होता. 

बिनविरोध निवड झालेल्या ३७ जागा

महाराष्ट्राव्यतिरिक्त तामीळनाडूतील ६, हरयाणातील २, छत्तीसगडमधील २, तेलंगणामधील २, ओडिशातील ४, बिहारमधील ५, पश्चिम बंगालमधील ५, आसाममधील ३, हिमाचल प्रदेशमधील एका जागेवर बिनविरोध निवड झाली होती. अण्णाद्रमुकचे एम थम्बीदुरई, तामीळ मनिला काँग्रेसचे अध्यक्ष जी. के. वासवन, ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ केटीएस तुलसी, काँग्रेसचे दीपेंद्रसिंह हुड्डा यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली होती. 

महाराष्ट्रातून बिनविरोध निवड होऊन राज्यसभेवर गेलेले प्रतिनिधी - 

  1. उदयनराजे भोसले, भाजप (BJP)
  2. भागवत कराड, भाजप (BJP)
  3. रामदास आठवले, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI)
  4. शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस (NCP)
  5. फौजिया खान, राष्ट्रवादी काँग्रेस (NCP)
  6. प्रियांका चतुर्वेदी, शिवसेना (SS)
  7. राजीव सातव, काँग्रेस (INC)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी