Encounter In Pulwama-Badgam : पुलवामा: जम्मू-कश्मीर (Jammu-Kashmir) मध्ये सुरक्षा दलाला (Security Forces) मोठं यश मिळालं आहे. सुरक्षादलाने येथे झालेल्या येथील चकमकीत (Encounter) 5 दहशतवाद्यांना ठार केलं आहे. सुरक्षादलाने पुलवामा (Pulwama) मध्ये 4 आणि बडगाम (Badgam) मध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा केला आहे. बडगाममधील दहशतवाद्यांकडून शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये चार जण हे जैश-ए-मोहम्मद (Jaish-e-Mohammed) आणि एक जण लष्कर-ए-तैयबा (Lashkar-e-Taiba) चा आहे.
अनंतनागमध्ये पोलिसांवर झालेल्या हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी शोध मोहीम सुरू केली आणि पुलवामाच्या नायरा भागात दहशतवाद्यांना घेरले. नायरा भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांना ठार केले. नायरा भागात दोन ते तीन दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला होता. या जानेवारी महिन्यात आतापर्यंत 22 दहशतवादी मारले गेले आहेत.
पुलवामाच्या नायरा गावात चकमक झाल्यानंतर काही वेळातच बडगाम जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये दुसरी चकमक सुरू झाली. बडगामच्या चरार-ए-शरीफ भागात सुरक्षा दलांनी केलेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला.
काश्मीर झोन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चरार-ए-शरीफ परिसरात शोध सुरू करण्यात आली, पंरतु शोध मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार सुरू केला. सुरक्षा दलांनी केलेल्या प्रत्युत्तरादाखल लष्कर-ए-तैयबाचा एक दहशतवादी ठार झाला आहे. ठार झालेल्या दहशतवाद्याकडून एक AK-56 रायफल जप्त करण्यात आली आहे. दरम्यान परिसरात सुरक्षा दलांची शोधमोहीम सुरू आहे.
जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटवल्यापासून दहशतवादी स्थानिक लोक आणि पोलिसांना लक्ष्य करत आहेत. दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात एक पोलीस शहीद झाला. बिजबेहारा भागातील हसनपोरा येथे दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीर पोलिसांचे हेड कॉन्स्टेबल अली मोहम्मद यांच्यावर गोळीबार केला. हेड कॉन्स्टेबलला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान हेड कॉन्स्टेबल अली मोहम्मद शहीद झाले. पोलिसांच्या निवेदनानुसार, शहीद हेड कॉन्स्टेबल अली मोहम्मद यांची त्यांच्या घराजवळ दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. अली मोहम्मद हे जम्मू-काश्मीरमधील कुलगाम पोलीस ठाण्यात तैनात होते.