रेल्वेत कुल्हडमध्ये मिळेल चहा कॉफी

पर्यावरण रक्षणसाठी रेल्वे मंत्रालयाने एक मोठा निर्णय घेतला. रेल्वेत पेपरग्लास, थर्माकोलचे ग्लास आणि प्लॅस्टिकग्लास यावर बंदी घालण्यात आली आहे.

kulhad replace plastic tea cups at railway stations
रेल्वेत कुल्हडमध्ये मिळेल चहा कॉफी 

थोडं पण कामाचं

  • रेल्वेत कुल्हडमध्ये मिळेल चहा कॉफी
  • रेल्वेत पेपरग्लास, थर्माकोलचे ग्लास आणि प्लॅस्टिकग्लास यावर बंदी
  • टप्प्याटप्प्याने कुल्हड योजना देशभर राबवणार - रेल्वे मंत्री

नवी दिल्ली: पर्यावरण रक्षणसाठी रेल्वे मंत्रालयाने एक मोठा निर्णय घेतला. या निर्णयानुसार रेल्वेत पेपरग्लास, थर्माकोलचे ग्लास आणि प्लॅस्टिकग्लास यावर बंदी घालण्यात आली आहे. चहा, कॉफी, दूध पिण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून मातीचे कुल्हड दिले जातील, अशी माहिती रेल्वे मंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) यांनी दिली. (Environment friendly kulhad replace plastic tea cups at railway stations)

लालू प्रसाद यादव रेल्वे मंत्री असताना त्यांनी कुल्हडमधून चहा कॉफी देण्याची घोषणा केली होती. पण काही वर्षांनंतर रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीचा विचार करुन पेपरग्लासला परवानगी दिली होती. अनेक ठिकाणी गुपचूप प्लॅस्टिकच्या तसेच थर्माकोलच्या ग्लासमधूनही चहा कॉफी दिली जात होती. आता पुन्हा एकदा पर्यावरण रक्षणसाठी रेल्वे मंत्रालयाने पेपरग्लास, थर्माकोलचे ग्लास आणि प्लॅस्टिकग्लास यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. मातीच्या कुल्हडमधून चहा, कॉफी, दूध देण्याचा निर्णय झाला आहे. 

राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातल्या ढिगवाडा रेल्वे स्टेशन येथे इलेक्ट्रिफाइड ढिगवाडा-बांदीकुई सेक्शनच्या (electrified Dhigawara-Bandikui section) उद्घाटनप्रसंगी रेल्वे मंत्री गोयल यांनी कुल्हड पुन्हा सुरू करत असल्याचे जाहीर केले. सध्या भारतातील ४०० रेल्वे स्टेशनवर मातीच्या कुल्हडमधून चहा, कॉफी, दूध पिण्याचा पर्याय उपलब्ध आहे. प्रवासी पेपरग्लास आणि कुल्हड यामधून त्यांना हवा तो पर्याय निवडू शकतात. मात्र लवकरच संपूर्ण देशात कुल्हडमधून चहा, कॉफी, दूध दिले जाईल. टप्प्याटप्प्याने कुल्हड योजना देशभर राबवणार असल्याचे रेल्वे मंत्री म्हणाले.

हलक्या वजनाचे, प्रवासात हाताळण्यासाठी सोयीचे, न गळणारे दर्जेदार कुल्हड मोठ्या संख्येने उपलब्ध व्हावेत यासाठी रेल्वे प्रशासन देशातील कुशल कारागिरांची मदत घेणार आहे. या निमित्ताने मातीच्या वस्तू तयार करणाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळेल, असे रेल्वेमंत्र्यांनी सांगितले. वापरताना फुटलेल्या कुल्हडचे व्यवस्थापन, रेल्वेची मोठी दैनंदिन मागणी या सर्व मुद्यांचा विचार करुन कुल्हड निर्मिती आणि पुरवठा यासाठी कुशल कारागिरांची मदत घेणार असल्याची माहिती रेल्वेमंत्र्यांनी दिली.

भारतीय रेल्वे पर्यावरणपूरक व्हावी यासाठी मोठ्या प्रमाणावर काम सुरू आहे. मर्यादीत पाण्यात रेल्वेच्या बोगी स्वच्छ धुणे, पाण्याचा शुद्धीकरण करुन पुनर्वापर करणे, सौरऊर्जेद्वारे चार्ज केलेल्या बॅटरी वापरुन रेल्वे स्टेशनवर यांत्रिक उपकरणे कार्यरत ठेवणे, कचऱ्याचे व्यवस्थापन असे अनेक उपक्रम सुरू आहेत. कुल्हड हा प्रयोग राबवताना पर्यावरणाचा तसेच प्रवाशांच्या सोयीचा विचार करुन कुल्हडच्या रचनेत आवश्यकतेनुसार बदल केले जातील, यासाठी अनुभवी कारागिरांची मदत घेतली जाईल, असे संकेत रेल्वेमंत्र्यांनी दिले.

रेल्वे नियमितपणे सर्व स्टेशनांचे सर्व्हे करत आहे. यातील काही सर्व्हे अनपेक्षित स्वरुपाचे आहेत. या सर्व्हेंद्वारे स्टेशनवरील सोयीसुविधांचा दर्जा, स्वच्छता, पर्यावरण जपण्यासाठी स्टेशन प्रशासन करत असलेले काम याची नोंद घेतली जाते. याआधारे दरवर्षी स्टेशनांचे रँकिंग निश्चित केले जाते. सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या स्टेशनना पुरस्कार दिला जातो. या उपक्रमाद्वारे स्टेशनांवरील परिस्थितीत सुधारण्याचे काम सुरू आहे. 

आधुनिक वीजेची उपकरणे वापरुन वीजेचा अपव्यय टाळण्यावर रेल्वे प्रशासन भर देत आहे. शक्य त्या ठिकाणी सौरऊर्जेचा वापर सुरू आहे. पेपरग्लासवर बंदी घालून कुल्हड उपक्रमाद्वारे रेल्वे प्रशासन पर्यावरण रक्षणासाठी आणखी एक पाऊल उचलत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी