Europe Quit Russian Fuel Pakistan । नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेन यांच्यात संघर्ष सुरू आहे. या लढाईत युक्रेनला पाठिंबा जाहीर करणाऱ्या युरोपमधील देशांनी रशियाची कोंडी करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. या प्रयत्नांमुळे पाकिस्तान काळोखात जाण्याचा धोका वाढला आहे. थेट रशियाकडून गॅस आणि इंधन खरेदी करणाऱ्या युरोपच्या देशांनी ही खरेदी कमी केली आहे. युरोपमधील देश त्यांच्या इतर मित्र देशांकडून गॅस आणि इंधन खरेदी करत आहेत. रशियाची कोंडी करण्यासाठी युरोपच्या देशांनी ही खेळी केली आहे. ही खेळी युरोपच्या देशांनी आणखी तीव्रतेने खेळायला सुरुवात केली आहे. पण युरोपच्या या खेळीमुळे पाकिस्तानची पंचाईत झाल्याचे चित्र आहे.
रशिया-युक्रेनच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर युरोपने रशियाला शिक्षा देण्यासाठी इंधनापासून दूर राहण्याची मोहीम आणखी तीव्र केली आहे. रशियाला यामुळे आर्थिक फटका बसत आहे तसेच त्याचे परिणाम हजारो किलोमीटर दूर पाकिस्तानपर्यंत दिसून येत आहेत. युरोपच्या या डावामुळे पाकिस्तानला अंधारात दिवस काढण्याचा धोका आहे. त्यामुळे इम्रान खान यांच्या जागी सत्तेवर आलेल्या शाहबाज शरीफ यांच्या नव्या सरकारच्या अडचणीत मोठी वाढ झाल्याची पाहायला मिळत आहे. (European countries' game against Russia threatens to plunge Pakistan into darkness).
अधिक वाचा : 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये दयाबेनची जोरदार एंट्री
दरम्यान, एका दशकापूर्वी, अचानक वाढणाऱ्या आणि कमी होणाऱ्या तेलाच्या किमतींपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी पाकिस्तानने एलएनजीमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली होती. यासाठी इटली आणि कतारसोबत मोठ्या कालावधीसाठी गॅस पुरवठा करार केला होता. यातील काही पुरवठादारांनी पाकिस्तानला गॅस देण्याऐवजी युरोपला पुरवठा सुरू केला आहे. त्यामुळे पाकिस्तानची आता तीच अवस्था झाली आहे, जी टाळण्यासाठी त्यांनी गॅसकडे मोर्चा वळवला होता.
पाकिस्तान सरकारने मागील महिन्यात ईदच्या दिवशी अंधारापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी १० कोटी डॉलर्सची गुंतवणूक केली होती. जेणेकरुन एलएनजीने भरलेले जहाज बाजारातून मागवता येईल. तेही जेव्हा पाकिस्तान गरिबीच्या कठीण परिस्थितीचा सामना करत आहे. यावर्षी जुलैमध्ये आर्थिक वर्ष संपेपर्यंत देशाचा एकूण एलएनजी खर्च ५ अब्ज डॉलर्स पर्यंत पोहोचू शकतो, जो एका वर्षापूर्वीच्या किंमतीच्या दुप्पट आहे. लक्षणीय बाब म्हणजे यानंतर आता आयएमएफने ऊर्जा आणि विजेवर दिली जाणारी सबसिडी बंद करण्यासाठी सरकारवर दबाव आणला आहे.
आता पाकिस्तानची परिस्थिती अशी झाली आहे की, देशातील अनेक भागात १२ तास वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे कडाक्याच्या उन्हात नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यामुळे इम्रान खान आता शाहबाज सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत आणि वाढती महागाई आणि वीज कपातीबाबत प्रचंड मोर्चे काढत आहेत. यामुळे शाहबाज शरीफ यांच्या सरकारच्या स्थिरतेला देखील धोका निर्माण झाला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे जनता सध्या संकटकाळातून जात असल्याचे त्यांनी मान्य केले आहे. आता शाहबाज सरकारने आंतरराष्ट्रीय बाजारातून महागडा गॅस खरेदी करण्याचे आदेश दिले आहेत. एलएनजीच्या किमती वाढत असताना युरोपातील श्रीमंत देश ते खरेदी करत आहेत.