....तर लसीकरणानंतरही कोरोनाचा धोका

भारतात काही ठिकाणी कोरोना प्रतिबंधक लसचा पहिला डोस घेतल्यानंतर काही दिवसांत संबंधित व्यक्तीला कोरोना सदृश लक्षणे आढळली आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जनजागृती सुरू केली आहे.

everyone should follow covid protocol till the end of covid 19
....तर लसीकरणानंतरही कोरोनाचा धोका 

थोडं पण कामाचं

  • ....तर लसीकरणानंतरही कोरोनाचा धोका
  • भारतात ३६ दिवसांत १ कोटी ८ लाख ३८ हजार ३२३ नागरिकांचे लसीकरण
  • कोरोना विषाणूचे वेगवेगळे अवतार सक्रीय, यापैकी काही अवतारांवर भारतीय लस प्रभावी

नवी दिल्ली: भारतात काही ठिकाणी कोरोना प्रतिबंधक लसचा पहिला डोस घेतल्यानंतर काही दिवसांत संबंधित व्यक्तीला कोरोना सदृश लक्षणे आढळली आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नागरिकांच्या मनातील शंका दूर करण्यासाठी जाहिरात आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती सुरू केली आहे. (everyone should follow covid protocol till the end of covid 19)

भारतात सध्या कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध आहेत. यातील कोणत्याही एका लसचा पहिला डोस दिल्यानंतर दुसरा डोस २८ दिवसांनी द्यावा लागतो. लसचे दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तीच्या शरीरात दुसरा डोस घेतल्यापासून एक ते दोन आठवड्यात कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी पुरेशी रोगप्रतिकारक क्षमता विकसित होते. काही व्यक्तींच्या बाबतीत रोगप्रतिकारक क्षमता विकसित होण्याचा कालावधी दुसरा डोस घेतल्यानंतर दोन आठवडयांपेक्षा थोडा जास्त असू शकतो. प्रत्येक व्यक्तीच्या प्रकृतीनुसार हा फरक पडू शकतो. याच कारणामुळे लसचा पहिला डोस घेतला किंवा दोन्ही डोस घेतले म्हणून कोविड प्रोटोकॉलचे उल्लंघन करत विना मास्क सार्वजनिक ठिकाणी फिरणे, सोशल डिस्टंस न राखणे असा हलगर्जीपणा करणे हिताचे नाही. 

भारतात १६ जानेवारीपासून लसीकरण सुरू झाले. २० फेब्रुवारीपर्यंत म्हणजे ३६ दिवसांत १ कोटी ८ लाख ३८ हजार ३२३ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. यातही आरोग्य सेवेतील ८ लाख ७३ हजार ९४० जणांनाच लसचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. अद्याप आरोग्य सेवेतील ६३ लाख ५२ हजार ७१३ जणांचा तसेच फ्रंटलाइन वर्कर्स श्रेणीतील ३६ लाख ११ हजार ६७० जणांचा दुसरा डोस घेऊन व्हायचा आहे. 

जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार कोरोना प्रतिबंधक लस सर्वात आधी आरोग्य सेवेशी संबंधित नागरिकांना नंतर फ्रंटलाइन वर्कर्सना यानंतर ज्येष्ठ नागरिक मग ५० पेक्षा जास्त वयाचे नागरिक अशा उतरत्या क्रमाने दिली जात आहे. भारतात १८ पेक्षा जास्त वयाच्या नागरिकांची लोकसंख्या ९० कोटींपेक्षा जास्त आहे. सध्याच्या गतीने लसीकरण सुरू राहिले तर तरुण पिढीला लससाठी दीर्घ काळ वाट बघावी लागेल. या वास्तवाचे भान राखून नागरिकांनी सहकार्य करणे आवश्यक आहे. विशिष्ट वयोगटासाठी लसीकरण सुरू होताच लस घ्यावी. पण लस घेतली तरी कोविड प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन करावे. मास्क वापरावा, सोशल डिस्टंस राखावा, वैयक्तिक स्वच्छतेच्या नियमांचे पालन करावे, आरोग्याची काळजी घ्यावी, अधूनमधून हात साबण आणि शुद्ध पाण्याने धुवावे अथवा सॅनिटायझर वापरुन स्वच्छ करावे; असे आवाहन केंद्रीय आरोग्य मंत्रालायने नागरिकांना केले आहे.

कोरोना विषाणूचे वेगवेगळे अवतार जगभर सक्रीय आहेत. यापैकी काही अवतारांवर भारतीय लस प्रभावी ठरल्या आहेत. पण आपल्या आसपास कोरोना विषाणूचा नक्की कोणता अवतार सक्रीय आहे हे सामान्य व्यक्ती ओळखू शकत नाही. याच कारणामुळे लस घेतली तरीही कोविड प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन केंद्रीय आरोग्य मंत्रालायाकडून नागरिकांना करण्यात आले आहे.

लसच्या माध्यमातून कोरोनाचा मृतावस्थेतील (निष्क्रीय) विषाणू शरीरात सोडला जातो. शरीर विषाणूच्या प्रवेशाची जाणीव होताच त्याला विरोध करण्यासाठी प्रयत्न करते. या प्रक्रियेत रोगप्रतिकारक क्षमता विकसित होते. ही प्रक्रिया सुरू असताना काही जणांच्या शरीराचा प्रतिसाद त्यांनाच त्रासदायक ठरतो. यालाच लस घेतल्यानंतर होणारा त्रास किंवा 'साइड इफेक्ट' म्हणतात. काही जणांना लस घेतल्यानंतर हा त्रास होण्याची शक्यता असते. ही बाब समजून घेऊन लस घेतल्यानंतर त्रास झाल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

लसचा पहिला डोस घेतल्यानंतर त्रास झाला तर वैद्यकीय सल्ला घ्यावा. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तब्येतीची काळजी घेत लसचा दुसरा डोस घ्यावा. पण फक्त एक डोस घेतला किंवा दुसरा डोस घेऊन लसीकरण केंद्राबाहेर आलो म्हणजे लगेच कोरोनाला प्रतिबंध करणारी क्षमता विकसित झाल्याचा गैरसमज कोणीही करुन घेऊ नये, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले. 

कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी लस हा एक टप्पा आहे. हे अंतिम उत्तर नाही. आजही भारतात १ लाख ४५ हजारांपेक्षा जास्त कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तसेच जगात २ कोटी २३ लाखांपेक्षा कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. याच कारणामुळे कोरोनाचे संकट संपेपर्यंत नागरिकांनी लस घेतली असो वा नसो कोविड प्रोटोकॉल पाळावा, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी