Uddhav Thackeray MLC : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अजूनही आमदार? नव्याने समोर आलेल्या यादीमुळे उत्सुकता शिगेला

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतानाच आमदारकीही सोडण्याची घोषणा केली होती. मात्र अजूनही त्यांचं नाव विधानपरिषद आमदारांच्या यादीत असल्याचं स्पष्ट झालं आहे.

Uddhav Thackeray MLC
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अजूनही आमदार?  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • उद्धव ठाकरेंचं नाव अजूनही आमदारांच्या यादीत
  • आमदारकीच्या राजीनाम्याची घोषणा, पण राजीनामा नाहीच
  • उद्धव ठाकरे आमदारकी राखणार की सोडणार?

Uddhav Thackeray MLC : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (EX CM Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा (Resignation) दिला असला तरी अद्यापही ते विधानपरिषदेचे आमदार (MLC) असल्याचं दिसून आलं आहे.  उद्धव ठाकरेंनी 29 जून रोजी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्याचवेळी आपण आपल्या आमदारकीचाही राजीनामा देत असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं. त्यामुळे उद्धव ठाकरे एकाच वेळी मुख्यमंत्रीपदाचा आणि त्यांच्या विधानपरिषदेच्या आमदारकीचा राजीनामा देतील, अशीच सर्वांची अपेक्षा होती. प्रत्यक्षात मात्र तसं झालेलं दिसत नाही. कारण उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर काही दिवसांनी जाहीर झालेल्या विधानपरिषद आमदारांच्या यादीत उद्धव ठाकरे यांचं नाव असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी आमदारकीचा राजीनामा दिला की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

काय करणार उद्धव ठाकरे?

वास्तविक, राज्याच्या मुख्यमंत्रीपदी बसणाऱ्या व्यक्तीला विधानसभा किंवा विधानपरिषद यापैकी कुठल्या ना कुठल्या सभागृहाचा सदस्य असणं बंधनकारक असतं. ज्या राज्यात विधानपरिषद नसते, त्या राज्यात विधानसभेचा सदस्य होणं बंधनकारक असतं. पदाची शपथ घेतल्यापासून पुढच्या सहा महिन्यांत हे सदस्यत्व घेणं बंधनकारक असतं. त्यानुसार महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर शिवसेनेच्या कोट्यातून पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून देण्यात आलं होतं.

अधिक वाचा - Maharashtra Cabinet Expansion Live: शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा सुरु

मात्र सरकार कोसळल्यानंतर केवळ आमदार राहण्यात उद्धव ठाकरेंना रस नसल्याचं त्यांच्या फेसबुक लाईव्हमधून दिसून आलं होतं. त्यांनी केलेल्या घोषणेनुसार त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतानाच विधानपरिषदत सदस्यत्वाचाही राजीनामा दिला होता. मात्र त्यानंतर 8 जुलै रोजी जाहीर झालेल्या यादीतही उद्धव ठाकरे हे विधान परिषदेचे सदस्यच असल्याचं दिसून आलं आहे. म्हणजेच राजीनामा दिल्याच्या घोषणेनंंतर 9 दिवसांनी प्रसिद्ध झालेल्या यादीत उद्धव ठाकरे यांचं नाव असल्याचं दिसून आलं आहे. 

औपचारिकता शिल्लक असेल?

सरकार कोसळल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राजीनामा देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार मुख्यमंत्रीपदाचा राजीनामाही त्यांनी दिला. मात्र या गडबडीत आमदारकीचा राजीनामा देण्याची औपचारिकता कदाचित पूर्ण झाली नसावी, असा अंदाज राजकीय वर्तुळात वर्तवला जात आहे. या यादीत उद्धव ठाकरेंसोबत आमशा पडवी, नीलम गोऱ्हे, सचिन अहीर, सुनील शिंदे, विप्लव बाजोरिया, अंबादास दानवे, दुष्यंत चतुर्वेदी, अनिल परब आणि मनिषा कायंदे यांची नावं आहे. या यादीत उद्धव ठाकरेंचा कार्यकाल 14 मे 2020 ते 13 मे 2026 असा दाखवण्यात आला आहे. 

अधिक वाचा - हिंगोलीच्या सभेत CM शिंदेंनी टाकलं आश्वासनच हिंग; विविध विभागांतील 80 हजार पदे भरणार, शेतकऱ्यांना सर्वाधिक मदत देणार

उद्धव ठाकरे आमदार राहणार?

महाराष्ट्रात झालेल्या राजकीय सत्तानाट्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आमदार राहणार का, हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. उद्धव ठाकरेंनी आमदारकीचा राजीनामा देण्याचा मागे घेतला की काय, अशीही चर्चा सुरू आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या आमदारकीबाबत आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी