Explosion on INS Ranveer : मुंबई : नेव्हल डॉकयार्ड (Naval Dockyard) येथून एक दुर्देवी घटना समोर आली आहे. नौदलाचे (Navy) मोठं आणि जंगी जहाज अशी ख्याती असलेलं आयएनएस रणवीर (INS Ranveer) या जहाजात अचानक स्फोट (Explosion) झाला आहे. या अपघातात तीन जवान शहीद (Martyr) झाल्याची बातमी समोर आली आहे. ही घटना नेमकी का आणि कशामुळे घडली याची चौकशी केली जाणार आहे. जहाजाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ प्रतिसाद देत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.
या घटनेत दहा जवान जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमी जवानांवर कोलाबा नेवी नगर येथील INHS अश्विनी येथे दाखल करण्यात आले आहे. संबंधित घटनेनंतर जहाज चालवणाऱ्या कर्मचाऱ्यांनी तातडीने परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेत बचावकार्याला सुरुवात केली. अखेर त्यांना काही काळाने परिस्थितीवर नियंत्रण मिळवता आली. पण तोपर्यंत तीन जवानांचा मृत्यू झालेला होता. खरंतर आयएनएस रणवीर हे जहाज नोव्हेंबर 2021 पासून पूर्व नौदल कमांडकडून क्रॉस कोस्ट ऑपरेशनल तैनातीवर होतं आणि लवकरच बेस पोर्टवर परत येणार होतं. पण या दरम्यान घडलेल्या घटनेने नौदलात खळबळ उडाली आहे.
INS रणवीर हे जहाज भारतीय नौदलातील राजपूत श्रेणीच्या 5 सर्वात ताकदवार जहाजांपैकी चौथ्या क्रमांकाचे जहाज मानले जाते. या जहाजाला 1986 मध्ये नौदलात समाविष्ट करण्यात आले होते. भारतीय नौदलाने आपल्या अधिकृत फेसबुक अकाउंटवर 2017 साली INS रणवीर जहाजाच्या वैशिष्ट्याविषयी माहिती जाहीर केली होती. रणवीर श्रेणीतील हे पहिलं विध्वंसंक जहाज असल्याचे नौदलाकडून सांगण्यात आले होते. हे जहाज 21 एप्रिल 1986 रोजी भारतीय नौदलात दाखल झाले होते. या जहाजाचे विस्थापन 5,000 टन, लांबी 146 मीटर, बीम 15.8 मीटर आहे. त्यामुळे ते जास्त वेगात सक्षम मानले जाते. या जहाजात 30 अधिकारी आणि 310 खलाशांचा ताफा असतो. तसेच ते शस्त्रे आणि सेन्सर्सच्या श्रेणीने सुसज्ज असतात. यामध्ये जमिनीवरुन जमिनीवर तसेच जिमिनीवरुन हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे, तोफांचा समावेश असतो, अशी माहिती नौदलाकडून याआधी सांगण्यात आले आहे.