Fake Kidnapping : महागड्या बाईकसाठी घेतलं मित्राकडून कर्ज, उधारी फेडण्यासाठी रचला स्वतःच्याच अपहरणाचा बनाव

स्वतःच्या अपहरणाचा बनाव रचणाऱ्या तरुणाचा डाव पोलिसांनी हाणून पाडला आहे. मात्र या घटनेने कुटुंबीयांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला.

Fake Kidnapping
उधारी फेडण्यासाठी स्वतःच्याच अपहरणाचा बनाव  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • बाईकसाठी मित्राकडून घेतली उधारी
  • पैसे फेडण्यासाठी रचला स्वतःच्या अपहरणाचा बनाव
  • पोलिसांनी नंबर ट्रॅक करत केला पर्दाफाश

Fake Kidnapping | अनेकांना आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कर्ज काढून वस्तू खरेदी करण्याची सवय असते. मात्र ही सवय कशी महागात पडू शकते, याचं उदाहरण नुकतंच समोर आलं आहे. केवळ एखादी गोष्ट घेण्याचा मूड आला किंवा एखादी वस्तू आपल्याकडे आहे हे दाखवून सामाजिक प्रतिष्ठा वाढवायची इच्छा झाली, तर अनेकजण कर्ज घेतात. मात्र ते फेडण्याची आपली क्षमता आहे की नाही, याचा विचार केला जात नाही. दिल्लीतील एका तरुणानं त्याच्या आवडीची स्पोर्ट्स बाईक घेण्यासाठी मित्राकडून पैसे उधार घेतले होते. मात्र त्यानंतर घडलेला घटनाक्रम सर्वांनाच जबर धक्का देणारा होता.

मित्राकडून घेतले पैसे

दिल्लीत राहणाऱ्या करण गोयल नावाच्या तरुणाला स्पोर्ट्स बाईक घेण्याची इच्छा होती. त्यासाठी त्याने मित्राकडून अडीच लाख रुपये उधार घेतले. आपल्या कमाईतून ही बाईक घेतल्याचं त्याने घरच्यांना सांगितलं आणि बाईकवरून फिरण्याचा आनंद घ्यायला सुुरुवात केली. काही दिवसांनी मित्राने आपल्या पैशांबाबत विचारणा केली. करणकडे मित्राची उधारी भागवण्यासाठी पैसे नव्हते. त्यामुळे तो उधारी फेडू शकत नव्हता. अशा परिस्थितीत हा प्रश्न कसा सोडवायचा याचा विचार तो करू लागला. त्याच्या डोक्यात एक कल्पना आली आणि त्याने त्याची अंमलबजावणी करायचं ठऱवलं. 

स्वतःच्या अपहरणाचा बनाव

करण घरी कुणालाही न सांगता एक दिवस राजस्थानमध्ये त्याच्या मित्राकडे निघून गेला. तिथून त्याने घरी फोन केला आणि आपणच अपहरणकर्ता असल्याचा बनाव रचून करणचे अपहरण झाल्याचं सांगितलं. करणला जिवंत सोडण्यासाठी अडीच लाख रुपयांची खंडणी त्याने मागितली. घरच्यांनी तातडीने पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी करण बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली आणि तपासाला सुरुवात केली. 

अधिक वाचा -  200 मीटर दरीत कोसळली बस; 16 जणांचा मृत्यू, बसमध्ये होते शाळकरी मुलं

असा लागला शोध

पोलिसांनी अगोदर फोन नंबरची तपासणी केली. ज्या नंबरवरून खंडणीसाठी फोन आला होता, तो नंबर पोलिसांनी तपासला. हा नंबर ॲक्टिव्ह असल्याचं पोलिसांना समजलं. त्या नंबरचं लोकेशन शोधलं असता राजस्थानमधील एका गावाचं लोकशन असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांचंं एक पथक तातडीने लोकेशनवर पोहोचलं आणि ज्याच्या नावावर हा नंबर होता, त्याला ताब्यात घेतलं. ही व्यक्ती म्हणजे करणच्या मित्राचे वडील. आपल्याला पोलिसांनी का पकडलंय, हे त्यांनाही कळेना. पोलिसांनी प्रकऱणाची माहिती दिल्यावर त्यांनाही धक्का बसला.

अधिक वाचा - पॅरोलवरील राम रहीम खरा की खोटा; याचिका दाखल, न्यायाधीश म्हणाले कोरोनाच्या काळात काल्पनिक चित्रपट पाहिल्याचा परिणाम

करणला आणलं परत

करण हा आपल्या मुलाचा मित्र असून तो सुट्टीसाठी आपल्या गावी आला असल्याचं मित्राच्या वडिलांनी पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी करणला शोधून ताब्यात घेतलं आणि आपल्यासोबत दिल्लीला आणून कुटुंबीयांच्या ताब्यात दिलं. आपल्या मित्राची उधारी फेडण्यासाठी आपणच आपल्या अपहरणाचा डाव रचल्याचं करणनं मान्य केलं. या प्रकारामुळे करणच्या कुटुंबीयांना धक्का तर बसला आहेच, मात्र मोठा मनस्तापही सहन करावा लागला आहे. पोलीस या प्रकऱणी अधिक तपास करत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी