दारू पिण्यास मनाई केल्याने ३३ वर्षापूर्वी आईची हत्या, आता मुलालाही केले ठार

लोकल ते ग्लोबल
Updated May 20, 2020 | 18:40 IST | टाइम्स नाऊ मराठी

१९८७मध्ये त्याने आपली आई माया देवीची गोळी घालून हत्या केली होती. या गुन्ह्यासाठी त्यांना शिक्षाही झाली होती. तो शिक्षा पूर्ण करून आला होता.

murder
प्रातिनिधीक फोटो 

थोडं पण कामाचं

  • नवी दिल्ली परिसरात धक्कादायक घटना घडली आहे
  • एका बापाने मुलाची हत्या केली आहे
  • या आधी या व्यक्तीने आपल्या आईलाही ठार केले होते

नवी दिल्ली: दिल्लीच्या रोहिणी परिसरात ६० वर्षीय व्यक्तीने आपल्या मुलाची गोळी मारून हत्या केली. याच आरोपीने ३३ वर्षांपूर्वी आपल्या आईलाही गोळी घालून ठार केले होते. पोलिसांनी आरोपी ओम पाल याला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ६० वर्षांचे ओम पाल आपली पत्नी पवित्रा देवी आणि पाच मुलांसह रिठाला भागात राहत होते. ते पेशाने प्रॉपर्टी डीलर आहेत आणि बंगल्याचा बराचसा भाग त्यांनी भाड्याने दिला आहे. दुसऱ्या नंबरचा मुलगा बलबीर पेशाने विमा एजंट आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री कुटुंबातील सर्वजण घराबाहेर बसले होते. यावेळी ओम पाल दारू पीत होते. अधिक दारू प्यायल्याने त्यांची पत्नी पवित्रा देवी यांनी त्यांना घरात येण्यास सांगितले. यावर ओमपाल यांनी आपल्या पत्नीला शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. यावेळी बलबीरला त्याचा राग आला. आईला अपशब्द बोलल्याने बलबीरला राग आला. यावरून वडिल आणि मुलामध्ये जुंपली. दोघांमधील वाद इतका टोकाला गेला की ते हाणामारी करू लागले. या दरम्यान रागाच्या भरात ओमपाल यांनी घरात असलेली लायसन्स पिस्तुल आणत मुलावर फायरिंग केली.

आरोपीचा स्वभाव होता रागीट

असं सांगितलं जात की, ओमपाल रागीट स्वभावाचे होते. त्यांना फार आधीपासून दारूचे व्यसन लागले होते. दारू पिण्यास मनाई केल्यास त्यांना प्रचंड राग येत असे. १९८७मध्ये त्यांनी आपली आई माया देवीची गोळी घालून हत्या केली होती. या गुन्ह्यासाठी त्यांना शिक्षाही झाली होती. ते शिक्षा पूर्ण करून आले होते. माया देवी यांनी ओमपाल यांना दारू पिण्यास मनाई केली होती. त्याचमुळे त्यांनी आईला ठार केले होते. आजूबाजूचे लोकही ओमपाल यांच्यापासून दूरच राहत. दरम्यान, पोलिसांनी आरोपीची पिस्तुल जप्त केली आहे.

पोलिसांना रुग्णालयातून मिळाली माहिती

या घटनेनंतर आरोपी तेथून फरार झाला. घरातील उपस्थित व्यक्तींनी रक्ताने माखलेल्या बलबीरला सरोज रुग्णालयात नेले मात्र उपचारादरम्यान तेथे त्याचा मृत्यू झाला. रुग्णालयाकडून सूचना मिळाल्याने पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. एसएचओ बुद्ध विहार खेमेंद्र पाल सिंहच्या टीमने आरोपी वडिलांना अटक केली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी