नवी दिल्ली : तिहार तुरुंग (tihar jail) देशातील सर्वात मोठा तुरुंग आहे. या तुरुंगातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तुरुंगातील कैद्यांमध्ये हिंसक हाणामारी झाली असून यात 15 कैदी (Prisoner) जखमी झाले आहेत. यातील काहींवर अजूनही उपचार सुरू आहेत. कारागृहातील (Prison) कैद्यांमधील वर्चस्वाच्या लढाईत ही घटना घडली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. कैद्यातील हाणामारीची घटना साधरण दोन दिवसाआधी घडली असून कारागृह प्रशासनाने या संपूर्ण घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
तिहार प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, तुरुंगातील हिंसक संघर्षाची ही घटना 2 दिवसांपूर्वी घडली होती. यात कारागृह क्रमांक 8 आणि 9 मधील कैद्यांमध्ये हाणामारी झाली होती आणि यात 15 कैदी जखमी झाले आहेत. काही कैद्यांना प्राथमिक उपचारानंतर पुन्हा कारागृहात हलविण्यात आले आहे. तर उर्वरित जखमी कैद्यांवर कारागृहातच उपचार सुरू आहेत.
तिहार तुरुंगात कैद्यांमध्ये हाणामारी होण्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात तिहार तुरुंगात कैद्यांच्या दोन गटांमध्ये हाणामारी झाली होती. या घटनेत सहायक कारागृह अधीक्षक आणि वॉर्डरही जखमी झाले होते. या झटापटीत चार कैदी गंभीर जखमी झाले होते. ही घटना कारागृह क्र. 4मध्ये झाली होती. यावेळी कैद्यांमध्ये सुरू असलेल्या भांडणात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करताना सहायक कारागृह अधीक्षक जखमी झाले होते.